पंतप्रधान 15 जुलै 2021 रोजी वाराणसीला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
सकाळी अकराच्या सुमाराला पंतप्रधान विविध सार्वजनिक प्रकल्प व कामांचे उद्घाटन करतील, ज्यात बीएचयूमधील 100 बेडचा एमसीएच विभाग , गोदौलिया येथील बहु स्तरीय पार्किंग सुविधा , गंगा नदीवर पर्यटन विकासासाठी रो-रो सेवा आणि वाराणसी गाझीपूर महामार्गावरील तीन पदरी उड्डाणपुलाचा यात समावेश आहे. सुमारे 744 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे यावेळी उद्घाटन केले जाईल. तसेच सुमारे 839 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांची आणि सार्वजनिक कामांची पायाभरणी ते करणार आहेत. यामध्ये सेंटर फॉर स्किल अँड टेक्निकल सपोर्ट ऑफ सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीआयपीईटी), जल जीवन मिशन अंतर्गत 143 ग्रामीण प्रकल्प आणि कार्खीयन मधील आंबा आणि भाजीपाला एकात्मिक पॅक हाऊसचा यात समावेश आहे.
दुपारी 12:15 च्या सुमाराला पंतप्रधान जपानच्या मदतीने बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार आणि अधिवेशन केंद्र - रुद्राक्षचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास ते बीएचयूच्या माता आणि बाल आरोग्य विभागाची पाहणी करतील. कोविड सज्जतेचा आढावा घेण्यासाठी ते अधिकारी आणि वैद्यकीय व्यावसायिकांनाही भेटणार आहेत.