पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबर 2023 रोजी उत्तराखंडला भेट देणार आहेत.
सकाळी सुमारे 8:30 वाजता, पंतप्रधान पिथोरागढ जिल्ह्यातील जोलिंगकाँग येथे पंतप्रधान पोहोचणार आहेत. या ठिकाणी ते पार्वती कुंड येथे पूजा करून दर्शन घेणार आहेत. पंतप्रधान या ठिकाणी पवित्र आदि-कैलासाचे आशीर्वादही घेणार आहेत. या परिसराला असलेले आध्यात्मिक महत्त्व आणि तेथील नैसर्गिक सौंदर्यासाठी हा भाग प्रसिद्ध आहे.
पंतप्रधान सकाळी 9:30 वाजता पिथोरागढ जिल्ह्यातील गुंजी गावात पोहोचतील, यावेळी ते इथल्या स्थानिक लोकांशी संवाद साधतील आणि स्थानिक कलात्मक वस्तू तसेच उत्पादनांच्या प्रदर्शनाला भेट देतील. पंतप्रधान लष्कर, इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) आणि सीमा रस्ते संघटना (बीआरओ) यांच्या जवानांबरोबर संवाद साधणार आहेत.
दुपारी सुमारे 12 वाजता पंतप्रधान अल्मोडा जिल्ह्यातील जागेश्वर येथे पोहोचणार आहेत. या जागेश्वर धाम येथे ते पूजा करून दर्शन घेतील. सुमारे 6200 फूट उंचीवर असलेल्या जागेश्वर धाममध्ये दगडी बांधकाम केलेली जवळपास 224 मंदिरे आहेत.
त्यानंतर, पंतप्रधान दुपारी 2:30 वाजता पिथोरागढला पोहोचतील. या क्षेत्रातील सुमारे 4200 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल. तसेच काही प्रकल्पांचे ते उद्घाटन करून राष्ट्राला समर्पित करतील. यामध्ये ग्रामीण विकास, रस्ते, वीज, सिंचन, पेयजल, यांच्याबरोबरच फलोत्पादन, शिक्षण, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विकास कामांचा समावेश आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि राष्ट्राला समर्पित करण्यात येणा-या प्रकल्पांमध्ये पीएमजीएसवाय अंतर्गत ग्रामीण भागातील 76 रस्ते आणि 25 पुलांचा समावेश आहे. 9 जिल्ह्यांमध्ये बीडीओ कार्यालयांच्या 15 इमारती; कौसानी बागेश्वर रस्ता, धारी-दौबा-गिरीचीना रस्ता आणि नागाळा-किच्चा रस्ता या केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत बांधण्यात आलेल्या तीन रस्त्यांच्या सुधारणा कामांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अल्मोडा पेटशाल - पनुवानौला - दन्या (एनएच 309बी) आणि टनकपूर - चालठी (एनएच 125) या दोन रस्त्यांचे अद्यतन करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याशी संबंधित तीन प्रकल्पांचे काम केले आहे. यामध्ये 38 पंपिंग पिण्याच्या पाण्याच्या योजना, 419 गुरुत्वाकर्षणावर आधारित पाणीपुरवठा योजना आणि तीन कूपनलिकांवर आधारित पाणीपुरवठा योजना; पिथोरागढमधील थरकोट येथे कृत्रिम तलाव, 132 केव्ही पिथोरागढ-लोहाघाट (चंपावत) ‘पॉवर ट्रान्समिशन लाइन’ ; संपूर्ण उत्तराखंड राज्यात जागतिक बँकेच्या वित्तीय मदतीतून 39 पूल बांधण्यात आले आहेत. डेहराडूनमधील उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (यूएसडीएमए) इमारतीचे काम, तसेच उत्तराखंड आपत्ती पुनर्प्राप्ती प्रकल्पांतर्गत बांधकाम याच निधीतून केले आहे.
ज्या प्रकल्पांची पायाभरणी केली जाईल त्यामध्ये 21,398 पॉली-हाऊस बांधण्याच्या योजनेचा समावेश आहे, यामुळे फुले आणि भाजीपाला उत्पादन वाढण्यास आणि त्यांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल; घनदाट मोठ्या प्रमाणातील सफरचंद बागांच्या लागवडीची योजना; राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांच्या सुधारणांसाठी पाच प्रकल्प; राज्यात आपत्तीसाठी सज्जता आणि प्रतिरोधासाठी अनेक पावले उदा. पुलांचे बांधकाम, डेहराडून मधील राज्य आपत्कालीन परिचालन केंद्राची सुधारणा; बालियानाला, नैनिताल येथे भूस्खलन रोखण्यासाठी पावले आणि अग्नि, आरोग्य आणि जंगलाशी संबंधित इतर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा; राज्यातील 20 आदर्श पदवी महाविद्यालयात वसतिगृहे आणि संगणक प्रयोगशाळा विकसित करणे; सोमेश्वर, अल्मोडा येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय; चंपावतमध्ये 50 खाटांचा रुग्णालय विभाग ;हल्द्वानी स्टेडियम, नैनिताल येथे अॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदान;रुद्रपूर येथील वेलोड्रोम स्टेडियम;जागेश्वर धाम (अलमोडा), हाट कालिका (पिथौरागढ)आणि नैना देवी (नैनिताल) या मंदिरांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मानसखंड मंदिर माला अभियान योजना ;हल्दवणीमध्ये पिण्याच्या पाण्याची तरतूद करण्यासाठी प्रकल्प; उधम सिंह नगर.सितारगंज,येथील 33/11 केव्ही उपकेंद्राचे बांधकाम या प्रकल्पांचीही पायाभरणी केली जाणार आहे.