पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारी 2024 रोजी उत्तर प्रदेशाला भेट देणार आहेत.
पंतप्रधानांच्या हस्ते सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास संभल जिल्ह्यातील श्री कल्की धाम मंदिराची पायाभरणी केली जाणार आहे. पंतप्रधान या कार्यक्रमात श्री कल्की धाम मंदिराच्या प्रतिकृतीचे अनावरण करतील आणि उपस्थितांना संबोधितही करतील. श्री कल्की धाम निर्माण ट्रस्ट द्वारे श्री कल्की धाम बांधले जात आहे. आचार्य प्रमोद कृष्णम हे श्री कल्की धाम निर्माण ट्रस्ट’चे अध्यक्ष आहेत. या कार्यक्रमाला अनेक संत, धर्मगुरू आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
फेब्रुवारी 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2023 (UPGIS 2023) दरम्यान प्राप्त झालेल्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांवर आधारित प्रकल्पांच्या चौथ्या भूमीपूजन समारंभात, पंतप्रधान, 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या संपूर्ण उत्तर प्रदेशातील 14000 प्रकल्पांचे लोकार्पण दुपारी 1:45 च्या सुमारास करतील. हे प्रकल्प उत्पादन, नवीकरणीय ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा, अन्न प्रक्रिया, गृहनिर्माण आणि स्थावर मालमत्ता, आतिथ्य आणि मनोरंजन, शिक्षण, यासारख्या क्षेत्रांशी संबंधित आहेत. या कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योजक, आघाडीच्या जागतिक आणि भारतीय कंपन्यांचे प्रतिनिधी, राजदूत आणि उच्चायुक्त तसेच इतर प्रतिष्ठित पाहुण्यांसह सुमारे 5000 सहभागी उपस्थित राहणार आहेत.