पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 16 नोव्हेंबर 2021 रोजी उत्तर प्रदेशाला भेट देऊन दुपारी दीड वाजता सुलतानपूर जिल्ह्यातील करवाल खेरी येथे पूर्वांचल द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन करणार आहेत.
उद्घाटन समारंभ झाल्यानंतर पंतप्रधान सुलतानपूर जिल्ह्यात द्रुतगती मार्गावर बांधण्यात आलेल्या धावपट्टीचा वापर करून होणाऱ्या हवाई कसरती देखील बघतील. आपत्कालीन परिस्थितीत भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांचे उड्डाण आणि उतरणे शक्य व्हावे यासाठी ही 3.2 किलोमीटर लांबीची धावपट्टी बांधण्यात आली आहे.
पूर्वांचल द्रुतगती महामार्गाची लांबी 341 किलोमीटर असून तो लखनौ जिल्ह्यात लखनौ-सुलतानपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.731 वरील चौदसराय गावापासून सुरु होतो आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.31 वर उत्तर प्रदेश-बिहार सीमेच्या पूर्वेला 18 किलोमीटरवर असलेल्या हैदरीया गावापर्यंत जातो. हा द्रुतगती महामार्ग 6 पदरी असून भविष्यात त्याचे 8 पदरीकरण करता येईल. सुमारे 22,500 कोटी अंदाजित खर्च करून निर्माण करण्यात आलेला हा पूर्वांचल द्रुतगती महामार्ग उत्तर प्रदेश राज्याच्या पूर्व भागाचा विशेषतः लखनौ, बाराबंकी, अमेठी, अयोध्या, सुलतानपूर, आंबेडकर नगर, आझमगढ, महू आणि गाझीपुर या जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देईल.