पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 फेब्रुवारी 2021 रोजी तामिळनाडू आणि पुडुचेरीचा दौरा करणार आहेत. सकाळी 11:30 वाजता पंतप्रधान पुडुचेरीतील विविध विकास उपक्रमांचे उद्घाटन व शिलान्यास करतील. संध्याकाळी चारच्या सुमारास पंतप्रधान कोयंबटूरमध्ये 12,400 कोटी रुपयांच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
पंतप्रधान तामिळनाडूमध्ये
नेयवेली नवीन औष्णिक वीज प्रकल्पाचे पंतप्रधान लोकार्पण करतील. हा एक लिग्नाइट आधारित विद्युत प्रकल्प आहे ज्याची 1000 मेगावॅट इतकी वीजनिर्मिती क्षमता असून यात प्रत्येकी 500 मेगावॅट क्षमतेची दोन युनिट्स आहेत. सुमारे 8000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला पिट हेड पॉवर प्लांट नेयवेली येथे इंधन म्हणून विद्यमान खाणींमढील लिग्नाइट वापरणार असून या प्रकल्पातील आजीवन गरज भागविण्यासाठी पुरेसा लिग्नाइट साठा येथे आहे. राखेचा 100% वापर करण्याच्या दृष्टीने या कारखान्याची रचना करण्यात आली आहे. या प्रकल्पातून होणाऱ्या वीजनिर्मितीचा फायदा तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पुडुचेरीला होणार आहे.
तिरुनेलवेली, तुतीकोरिन, रामानाथपुरम आणि विरुधुनगरच्या जिल्ह्यातील सुमारे 2670 एकर जागेवर स्थापित केलेल्या एनएलसीआयएलच्या 709 मेगावॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्पाचे देखील पंतप्रधान लोकार्पण करतील. सुमारे 3000 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
पंतप्रधान लोअर भवानी प्रकल्प यंत्रणेच्या विस्तारीकरण, नूतनीकरणाच्या आणि आधुनिकीकरणाची पायाभरणी करतील. भवानीसागर धरण व कालवा प्रणाली वर्ष 1955 मध्ये पूर्ण झाली होती . लोअर भवानी प्रणालीत लोअर भवानी प्रकल्प कालवा प्रणाली, अरहोकनकोट्टाई व थडापल्ली कालवे आणि कलिंगनारायण जलवाहिनी आहेत. यामुळे इरोड, तिरुपूर आणि करूर जिल्ह्यातील 2 लाख एकर जमिन सिंचनाखाली येणार आहे . नाबार्ड पायाभूत सुविधा विकास सहाय्याअंतर्गत 934 कोटी रुपये खर्चाचे लोअर भवानी यंत्रणेचे विस्तार, नूतनीकरण व आधुनिकीकरण कार्य हाती घेण्यात आले आहे. प्रणालीतील विद्यमान सिंचन संरचनांची पुनर्स्थापना आणि कालव्यांची कार्यक्षमता वाढविणे हे मुख्य उद्दीष्ट आहे. कालव्यांच्या लायनिंगच्या कामाव्यतिरिक्त 824 जलमार्गांची दुरुस्ती व पुनर्बांधणी, 176 गटारे व 32 पुलांचे कामही हाती घेण्यात येईल.
व्ही. ओ. चिदंबरनार बंदरा येथे कोरमपल्लम ब्रिज आणि रेल ओव्हर ब्रिज (आरओबी) च्या 8 मार्गिकांचे पंतप्रधान उद्घाटन करतील. हे भारतातील प्रमुख बंदरांपैकी एक आहे. सध्या, 1964 च्या सुरूवातीला 14 मीटर रुंद वाहनमार्ग असणाऱ्या कोरामपल्लम पुलाचा वापर करून 76% मालवाहतूक रस्त्यावरून तसेच बंदरामार्गे केली जाते. या पुलावरुन दररोज सरासरी 3000 जड मालवाहू ट्रकची ये-जा होते आणि त्यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन परिणामी विलंब होतो. मालवाहतूक निर्धोकपणे होण्यासाठी आणि बंदर क्षेत्रात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी, सध्या अस्तित्वात असलेल्या कोरामपल्लम पूल व रेल्वे ओव्हर ब्रिजच्या 8-मार्गिका प्रकल्प राबविला आहे. यात पुलाच्या दोन्ही बाजूला रुंदीकरण आणि दोन्ही बाजूंनी दोन मार्गिका (8.5 मीटर) जोडणे तसेच टीटीपीएस सर्कल ते सिटी लिंक सर्कल पर्यंत दोन्ही बाजूंनी विद्यमान रस्त्याचे रुंदीकरण यांचा समावेश आहे. सागरमाला कार्यक्रमाअंतर्गत 42 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प राबविण्यात आला.
पंतप्रधान याशिवाय व्ही. चिदंबरार बंदर येथे 5 मेगावॅट ग्रिड कनेक्ट ग्राउंड बेस्ड सौर उर्जा केंद्राचे डिझाइन, पुरवठा, स्थापना आणि कार्यान्वित करण्यासाठी पायाभरणी करतील. अंदाजे 20 कोटी रुपये खरच करून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात प्रतिवर्षी 80 लाखाहून अधिक युनिट्सचे (केडब्ल्यूएच) उत्पादन होईल आणि बंदरातील एकूण ऊर्जेच्या 56% मागणी यातून पूर्ण होईल आणि त्यामुळे बंदरातील कार्बन उत्सर्जन चे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
सुलभ जीवनमानाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान आवास (शहरी) योजनेंतर्गत बांधलेल्या सदनिकांचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. तामिळनाडू झोपडी संशोधन मंडळाने मदुराई मध्ये दुसऱ्या टप्प्यात उभारलेल्या सदनिकांमध्ये वीरपांडी, तिरुप्पूर येथील 1280 सदनिका, तिरुपुरन नगर, तिरुप्पूर येथे 1248 सदनिका; राजकुर येथे 1088 सदनिका आणि त्रिची मधील इरुंगलूर येथे 828 सदनिका यांचा समावेश आहे. 330 कोटींहून अधिक निधी खर्च करून या सदनिका बांधल्या आहेत. 400 चौरस फुट क्षेत्रफळ असणाऱ्या या सदनिका शहरी गरीब/ झोपडपट्टी धारकांना देण्यात येतील यामध्ये सुसज्ज दिवाणखाना, शयनकक्ष, स्वयंपाक घर, न्हाणीघर आणि शौचालय आहे.
पंतप्रधान कोयंबटूर, मदुराई, सालेम, तंजावर, वेल्लोर, तिरुचिराप्पल्ली, तिरुप्पूर, तिरुनेलवेली आणि थुथुकुडी या नऊ स्मार्ट शहरांमध्ये एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्रा (आयसीसीसी) ची पायाभरणी करतील. सुमारे 107 कोटी रुपये खर्च करून या आयसीसीसीचा विकास केला जाईल आणि अत्यावश्यक सरकारी सेवा एकत्रित करण्याच्या आणि डेटा आधारित निर्णय घेण्याच्या उद्देशाने त्वरित सेवांसाठी रिअल टाइम उपाययोजना उपलब्ध करुन देणारी चोवीस तास प्रणाली म्हणून कार्य करेल.
पुडुचेरी येथे पंतप्रधान
पंतप्रधान 56 किलोमीटर लांबीच्या चार पदरी राष्ट्रीय महामार्ग क्र. 45 – अ ची पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजे 2426 कोटी रुपये भांडवली खर्च होणार आहे. पंतप्रधान कराईकल न्यू कॅम्पस-फेज I, कराईकल जिल्हा (जेआयपीएमईआर) येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीची पायाभरणी करतील. प्रकल्पाची अंदाजित किंमत 491 कोटी रुपये आहे.
पंतप्रधान सागरमाला योजनेंतर्गत पुडुचेरी येथील लघु बंदर विकास प्रकल्पाची पायाभरणी करतील. 44 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणारा हा प्रकल्प चेन्नईला जोडला जाईल आणि पुद्दुचेरीतील उद्योगांसाठी मालवाहतूक सुलभ करेल. पुद्दुचेरी येथील इंदिरा गांधी क्रीडा संकुल , सिंथेटिक अॅथलेटिक ट्रॅकचे देखील ते शिलान्यास करणार आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे 7 कोटी रुपये खर्च येणार आहे.
पंतप्रधान जवाहरलाल स्नातकोत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था (जेआयपीएमईआर), पुद्दुचेरी येथे रक्त संकलन केंद्राचे उद्घाटन करणार आहेत. यासाठी 28 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
पंतप्रधान, पुद्दुचेरीच्या लॉसपेट येथे 100 खाटांची सुविधा असणाऱ्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन करतील. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या वतीने महिला खेळाडूंसाठी सुमारे 12 कोटी रुपये खर्चून हे बांधकाम करण्यात आले आहे. ते पुनर्रचित हेरिटेज मेरी बिल्डिंगचे उद्घाटनही करतील. पुडुचेरीच्या इतिहासातील एक महत्वाची वास्तू असणारी ही इमारत फ्रेंच राज्याकार्तानी बांधली होती आणि आता 15 कोटी रुपये खर्च करून त्याच इमारतीची पुनर्रचना करण्यात आली आहे.