पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ते 10 जुलै 2024 दरम्यान रशिया आणि ऑस्ट्रियाला अधिकृत भेट देणार आहेत.
पंतप्रधान 8-9 जुलै 2024 रोजी रशियाचे अध्यक्ष महामहिम व्लादिमीर पुतिन यांच्या निमंत्रणावरून 22 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी मॉस्कोला भेट देणार आहेत. उभय नेते दोन्ही देशांमधील बहुआयामी संबंधांचा आढावा घेतील आणि परस्पर हिताच्या समकालीन प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांचे आदान-प्रदान करतील.
त्यानंतर पंतप्रधान 9-10 जुलै 2024 रोजी ऑस्ट्रियाला भेट देतील. 41 वर्षांत भारतीय पंतप्रधानांची ही पहिली ऑस्ट्रिया भेट असेल. ते ऑस्ट्रियाचे राष्ट्रपती महामहिम अलेक्झांडर व्हॅन डेर बेलेन यांची भेट घेतील आणि ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहमर यांच्याशी चर्चा करतील. पंतप्रधान आणि चान्सलर भारतीय आणि ऑस्ट्रियाच्या आघाडीच्या उद्योजकांना संबोधित करतील.
पंतप्रधान मॉस्को आणि व्हिएन्ना येथील भारतीय समुदायाच्या सदस्यांशी देखील संवाद साधतील.