पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 फेब्रुवारी 2024 रोजी हरयाणामधील रेवाडीला भेट देणार आहेत. दुपारी एक वाजून 15 मिनिटांच्या सुमारास पंतप्रधान, 9750 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या शहरी वाहतूक, आरोग्य, रेल्वे आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील. 5450 कोटी रुपये खर्चाने बांधण्यात येणार असलेल्या गुरुग्राम मेट्रो रेल्वे प्रकल्पाची कोनशिला देखील ते बसवतील. हा प्रकल्प 28.5 किमी लांबीचा असून मिलेनियम सिटी सेंटर ते उद्योग विहार फेज-5 यांना जोडेल आणि सध्या अस्तित्वात असलेल्या रॅपिड मेट्रो रेल गुरुग्रामच्या मेट्रो जाळ्यात सायबर सिटीजवळ मौलसारी ऍव्हेन्यू स्टेशन येथे विलिन होईल.
द्वारका द्रुतगती मार्गावरही त्याचे प्रवेशद्वार असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागरिकांना जागतिक दर्जाच्या पर्यावरणपूरक सार्वजनिक जलद शहरी वाहतूक प्रणाली उपलब्ध करून देण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हा प्रकल्प एक महत्त्वाचे पाऊल असेल.
सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला अनुसरून हरयाणामधील रेवाडी येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची(एम्स) पायाभरणी केली जात आहे. रेवाडीमधील माजरा मुस्तील भालखी या गावातील 203 एकर जागेवर सुमारे 1650 कोटी रुपये खर्चाने एम्स रेवाडी उभारले जाणार आहे. यामध्ये 720 खाटांचे रुग्णालय संकुल, 100 जागांचे वैद्यकीय महाविद्यालय, 60 जागांचे परिचारिका महाविद्यालय, 30 खाटांचे आयुष ब्लॉक, वैद्यकीय अध्यापक आणि कर्मचारी यांच्यासाठी निवासाच्या सुविधा, पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा, रात्रीचा निवारा, अतिथी गृह, ऑडिटोरियम इ. सुविधांचा समावेश असेल. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना(PMSSY) अंतर्गत स्थापन करण्यात येत असलेल्या एम्स रेवाडीमुळे हरयाणाच्या जनतेला सर्वसमावेशक, दर्जेदार, समग्र तृतीयक निगा आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.
या केंद्रामध्ये 18 प्रकारच्या विशेष सेवांसह कार्डीयोलॉजी, गॅस्ट्रो-एन्टरॉलॉजी,नेफ्रॉलॉजी, युरॉलॉजी, न्यूरॉलॉजि, न्यूरोसर्जरी, मेडिकल आँकॉलॉजी, सर्जिकल आँकॉलॉजी, एंडोक्रायनॉलॉजी, बर्न्स अँड प्लास्टिक सर्जरी यांसह 17 प्रकारच्या अतिविशेष सेवा उपलब्ध आहेत. या संस्थेमध्ये अतिदक्षता विभाग, आपत्कालीन तसेच ट्रॉमा कक्ष, सोळा मॉड्यूलर शस्त्रक्रिया कक्ष, चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळा, रक्तपेढी, औषधालय इत्यादी सोयीसुविधा असतील. हरियाणा येथील या एम्स संस्थेची स्थापना म्हणजे हरियाणातील जनतेसाठी व्यापक, दर्जेदार आणि समग्र तृतीय पातळी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठीचा महत्त्वाचा टप्पा आहे.
पंतप्रधान यावेळी कुरुक्षेत्र येथील ज्योतीसार मध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या अनुभव केंद्राचे देखील उद्घाटन करणार आहेत. या अनुभवात्मक संग्रहालयाचे बांधकाम करण्यासाठी 240 कोटी रुपये खर्चण्यात आले आहेत. सुमारे 17 एकराहून अधिक क्षेत्रावर उभारलेल्या या वास्तूमध्ये 100,000 चौरस मीटर इतकी अंतर्गत जागा उपलब्ध झाली आहे. महाभारतातील महान कथा तसेच गीतेतील शिकवणी येथे ठळकपणे दिसून येतील. या संग्रहालयात, संवर्धित वास्तव (एआर), त्रिमिती लेझर तसेच प्रोजेक्शन मॅपिंग यांच्यासह अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे. कुरुक्षेत्रावरील ज्योतीसार या पवित्र ठिकाणीच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेतील दैवी शिकवण दिली असे मानण्यात येते.
पंतप्रधान यावेळी विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करून हे प्रकल्प देशाला अर्पण करणार आहेत. रेवाडी - कथुवास रेल्वे मार्गाचे(27.73 Km) दुपदरीकरण, कथुवास-नारनौल रेल्वे रेल्वे मार्गाचे(24.12 Km) दुपदरीकरण, भिवानी-डोभ रेल्वे मार्गाचे(42.30 Km) दुपदरीकरण तसेच मनहेरु-बवानी खेरा रेल्वे मार्गाचे(31.50 Km) दुपदरीकरण या प्रकल्पांची या वेळी पायाभरणी होईल. रेल्वे मार्गांच्या दुपदरीकरणामुळे या भागातील रेल्वे विषयक पायाभूत सुविधांमध्ये वाढ होईल तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या आणि माल वाहतूक करणाऱ्या अशा दोन्ही गाड्या वेळेवर धावण्यास मदत होईल.पंतप्रधान यावेळी रोहतक-मेहम-हंसी रेल्वे मार्ग (68 किलोमीटर) देशाला अर्पण करतील. या कामामुळे रोहतक आणि हिसार यांच्या दरम्यानच्या प्रवासाला लागणाऱ्या वेळेत कपात होईल. पंतप्रधान यावेळी रोहतक-मेहम-हंसी टप्प्यात सुरु होणाऱ्या रेल्वे सेवेची सुरुवात करतील. या सेवेमुळे रोहटक आणि हिसार या भागांचा एकमेकांशी संपर्क सुधारेल आणि प्रवाशांना त्याचामोठा लाभ होईल..