पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी राजस्थान आणि मध्यप्रदेशला भेट देणार आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास राजस्थान मध्ये जोधपूर येथे पंतप्रधान 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक, आरोग्य आणि उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार आहेत. साडेतीन वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मध्य प्रदेशात जबलपूर येथे पोहोचतील. या ठिकाणी ते 12,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे रेल्वे, रस्ते, गॅस पाईपलाईन, गृहनिर्माण आणि स्वच्छ पेयजल या क्षेत्राशी संबंधित विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण करतील.
राजस्थानमध्ये पंतप्रधान
पंतप्रधान राजस्थानमध्ये आरोग्य पायाभूत सुविधांना बळकट करणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कोनशिला बसवतील. या प्रकल्पांमध्ये जोधपूर एम्समधील 350 खाटांचे ट्रॉमा सेंटर अँड क्रिटी केअर हॉस्पिटल ब्लॉक आणि राजस्थानमध्ये सर्वत्र उभारण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा मिशन (PM-ABHIM) मधील सात क्रिटिकल केअर ब्लॉक चा समावेश आहे.
जोधपूर एम्समधील ट्रॉमा, इमर्जन्सी अँड क्रिटिकल केअर सेंटरचा 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाने विकास करण्यात येणार आहे. प्राथमिक मूल्यमापन, निदान, डे केअर, वॉर्ड्स, खाजगी खोल्या, म़ॉड्युलर शल्यक्रिया कक्ष, अतिदक्षता विभाग आणि डायालिसिस विभाग यांसारख्या सुविधा यामध्ये उपलब्ध असतील. यामुळे ट्रॉमा आणि आकस्मिक प्रकरणांच्या हाताळणीसाठी रुग्णांना विविध शाखांमधील आणि सर्वसमावेशक उपचार उपलब्ध करून एका समग्र दृष्टीकोनाचा अंगिकार करता येईल. राजस्थानातील सात क्रिटिकल केअर ब्लॉक्समुळे जिल्हा स्तरावरील आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये वाढ होऊन संपूर्ण राज्यातील जनतेला त्याचे लाभ मिळतील.
पंतप्रधान जोधपूर विमानतळावर अत्याधुनिक नव्या टर्मिनल इमारतीच्य विकास प्रकल्पाची देखील कोनशिला बसवणार आहेत. 24,000 चौरस मीटर क्षेत्रामध्ये उभारण्यात येणाऱ्या या इमारतीसाठी 480 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. गर्दीच्या वेळी 2500 प्रवाशांना सेवा पुरवण्याची या इमारतीची क्षमता आहे. ती वर्षाला 35 लाख प्रवाशांची हाताळणी करू शकेल. ज्यामुळे कनेक्टिविटीमध्ये सुधारणा होईल आणि या भागातील पर्यटनाला चालना मिळेल.
पंतप्रधान आयआयटी जोधपूर संकुलाचे देखील लोकार्पण करणार आहेत. सुमारे 1135 कोटी रुपये खर्चाने या संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे. उच्च दर्जाचे समग्र शिक्षण पुरवण्याच्या आणि अत्याधुनिक संशोधन आणि नवोन्मेष उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे.
राजस्थानच्या केंद्रीय विद्यापीठातील पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यासाठी पंतप्रधान या ठिकाणी सेंट्रल इन्स्ट्रुमेन्टेशन लॅबोरेटरी, स्टाफ क्वार्टर्स आणि योग आणि क्रीडा विज्ञान इमारतीचे लोकार्पण करतील. राजस्थानमध्ये केंद्रीय विद्यापीठात सेंट्रल लायब्ररी, 600 विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह आणि भोजन सुविधा या प्रकल्पांची देखील पंतप्रधान कोनशिला बसवतील. राजस्थानमधील रस्ते पायाभूत सुविधा सुधारणाऱ्या विविध रस्ते प्रकल्पांची देखील पंतप्रधानांच्या हस्ते कोनशिला बसवण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 125 ए वरील जोधपूर रिंग रोडच्या कारवार ते डांगियावास सेक्शनचे चौपदरीकरण, सात बाह्यवळण मार्गांची उभारणी/ जालोर मार्गे बालोत्रा ते सांदेराओ सेक्शन(एनएच-325)च्या प्रमुख शहरी भागांची पुनर्जुळणी, एनएच-25 च्या पाचपद्र-बागुंडी सेक्शनचे चौपदरीकरण या प्रकल्पांचा समावेश आहे. हे रस्ते प्रकल्प एकूण 1475 कोटी रुपये खर्चाने उभारण्यात येणार आहेत.
जोधपूर रिंगरोडमुळे वाहतुकीचा ताण कमी होण्यास आणि शहरातील वाहन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. या प्रकल्पांमुळे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी मदत होईल, व्यापाराला चालना मिळेल, रोजगार निर्मितीसह या प्रदेशात आर्थिक वृद्धी होईल.
पंतप्रधान राजस्थानमध्ये हिरवा झेंडा दाखवून दोन नवीन रेल्वे सेवांना प्रारंभ करतील. यामध्ये जैसलमेर ते दिल्लीला जोडणारी नवीन रेल्वेगाडी - रुनिचा एक्स्प्रेस आणि मारवाड जंक्शन - खांबली घाट यांना जोडणाऱ्या नव्या वारसा रेल्वेगाडीचा समावेश आहे.रुनिचा एक्स्प्रेस जोधपूर, देगाना,कुचमन सिटी, फुलेरा, रिंगास, श्रीमाधोपूर, नीम का थाना , नारनौल, अटेली, रेवाडी या मार्गे जाईल आणि या सर्व शहरांची राष्ट्रीय राजधानीशी संपर्क सुविधा सुधारेल.मारवाड जं.-खांबली घाटाला जोडणारी नवीन वारसा रेल्वेगाडी या प्रदेशात पर्यटनाला चालना देईल आणि रोजगार निर्माण करेल.याशिवाय आणखी दोन रेल्वे प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण होणार आहे. यामध्ये 145 किमी लांबीच्या ‘देगना -राय का बाग’ रेल्वे मार्ग आणि 58 किमी लांबीच्या ‘देगना -कुचमन सिटी’ रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
मध्य प्रदेशमध्ये पंतप्रधान
राणी दुर्गावती यांची पाचशेवी जन्मशताब्दी भारत सरकार मोठ्या उत्साहात साजरी करत आहे. पंतप्रधानांनी जुलै 2023 मध्ये मध्य प्रदेश मधील शाहडोल येथे या महोत्सवाची घोषणा केली होती. या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या ऐतिहासिक भाषणात त्यांनी या घोषणेचा पुनरुच्चार केला होता. या महोत्सवाच्या निमित्ताने, वीरांगना राणी दुर्गावती स्मारक आणि उद्यानाचे भूमिपूजन पंतप्रधान करणार आहेत.
जबलपूर मध्ये जवळजवळ शंभर कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणारे वीरांगना राणी दुर्गावती स्मारक आणि उद्यान, जवळजवळ 21 एकर क्षेत्रावर असेल. या ठिकाणी राणी दुर्गावतीची 52 फूट उंचीची मूर्ती उभारण्यात येणार असून,राणी दुर्गावतीचे शौर्य आणि साहस,यासह गोंडवाना प्रदेशाच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे भव्य संग्रहालय असेल.यामध्ये गोंड आणि इतर आदिवासी समुदायांची खाद्य संस्कृती, कला, संस्कृती, जीवनशैली प्रदर्शित केली जाईल. ‘वीरांगना राणी दुर्गावती स्मारक आणि उद्याना’च्या परिसरात औषधी वनस्पती, कॅक्टस गार्डन, रॉक गार्डन यासह अनेक बागा आणि उद्याने असतील.
राणी दुर्गावती सोळाव्या शतकाच्या मध्यावर गोंडवानाची सत्ताधारी राणी होती.मुघलांविरोधात स्वातंत्र्यासाठी लढणारी एक शूर,निर्भीड आणि धैर्यवान योद्धा म्हणून तिचे स्मरण केले जाते.
मध्य प्रदेशातील इंदूर येथे,'सर्वांसाठी घरे’ देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला बळ देणाऱ्या दीपग्रुह प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना - शहरी अंतर्गत सुमारे 128 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाचा लाभ 1000 हून अधिक लाभार्थी कुटुंबांना होणार आहे.प्री-इंजिनिअर्ड स्टील स्ट्रक्चरल यंत्रणेसह प्रीफेब्रिकेटेड सँडविच पॅनेल यंत्रणा ’वापरून सर्व मूलभूत सुविधांसह दर्जेदार घरे बांधण्यात आली आहेत .
प्रत्त्येक घरात नळ जोडणीद्वारे पिण्याचे सुरक्षित आणि पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकत मंडला, जबलपूर आणि दिंडोरी जिल्ह्यात 2350 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या अनेक जल जीवनअभियान प्रकल्पांची पायाभरणी करण्यात येणार आहे.
पंतप्रधान सिवनी जिल्ह्यातील 100 कोटी खर्चाचा जल जीवन अभियान प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील.राज्यातील चार जिल्ह्यांसाठीच्या या प्रकल्पांमुळे मध्य प्रदेशातील सुमारे 1575 गावांना फायदा होणार आहे.
मध्य प्रदेशातील रस्ते पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी 4800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग 346 च्या झारखेडा-बेरासिया-ढोलखेडी यांना जोडणाऱ्या रस्त्याच्या सुधारणेसह राष्ट्रीय महामार्ग 543 च्या बालाघाट - गोंदिया विभागाचे चौपदरीकरण; रुधी आणि देशगावला जोडणाऱ्या खांडवा बाह्यवळण रस्त्याचे चौपदरीकरण; राष्ट्रीय महामार्ग 47 च्या टेमागाव ते चिचोली विभागाचे चौपदरीकरण ; बोरेगाव ते शहापूरला जोडणाऱ्या रस्त्याचे चौपदरीकरण;आणि शहापूर ते मुक्ताईनगरला जोडणाऱ्या रस्त्याचे चौपदरीकरण या प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग 347 सी च्या खलघाट ते सरवर्डेवला जोडणाऱ्या सुधारित रस्त्याचे पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण होणार आहे.
पंतप्रधान 1850 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचे रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील.यामध्ये कटनी - विजयसोटा (102किमी ) आणि मारवासग्राम - सिंगरौली (78.50किमी ) यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा समावेश आहे.हे दोन्ही प्रकल्प कटनी - सिंगरौली विभागाला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या प्रकल्पाचा भाग आहेत. या प्रकल्पांमुळे मध्य प्रदेशातील रेल्वे पायाभूत सुविधा सुधारतील आणि राज्यातील व्यापार आणि पर्यटनाला फायदा होईल.
पंतप्रधान विजयपूर-औरैयां-फुलपूर गॅस पाइपलाइन प्रकल्पाचे राष्ट्रार्पण करणार आहेत. 352 किलोमीटर लांबीची ही पाइपलाइन 1750 कोटी रुपयांहून अधिक खर्चून बांधण्यात आली आहे. मुंबई -नागपूर -झारसुगुडा गॅस पाईपलाईन प्रकल्पाच्या नागपूर जबलपूर विभागाची (317 किमी) पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.हा प्रकल्प 1100 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून बांधण्यात येणार आहे.गॅस पाइपलाइन प्रकल्प उद्योगांना आणि घरांना स्वच्छ तसेच किफायतशीर नैसर्गिक वायू उपलब्ध करेल आणि पर्यावरणातील उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने एक पाऊल ठरेल. सुमारे 147 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या जबलपूर येथील नवीन बॉटलिंग प्रकल्पाचेही पंतप्रधान लोकार्पण करणार आहेत.