पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ते वाशिमकडे प्रयाण करतील आणि सकाळी 11.15 वाजता पोहरादेवी येथील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील. वाशिम येथील संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवरही ते श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर, पंतप्रधान सकाळी 11:30 वाजता, बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करतील. दुपारी 12 वाजता ते सुमारे 23,300 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा शुभारंभ करतील. दुपारी 4 वाजता, पंतप्रधान ठाणे येथे 32,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता, मुंबईमधील बीकेसी मेट्रो स्टेशनवरून पंतप्रधान बीकेसी ते आरे जेव्हीएलआर दरम्यान धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. याशिवाय पंतप्रधान बीकेसी आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान मेट्रो द्वारा प्रवास देखील करणार आहेत.
पंतप्रधानांचे वाशिम मधील कार्यक्रम
शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 20,000 कोटी रुपयांचा पीएम किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता वितरित करतील. या 18 व्या हप्त्यासह, पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना जारी केलेला एकूण निधी सुमारे 3.45 लाख कोटी रुपये असेल. याशिवाय, पंतप्रधान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या 5व्या हप्त्याचेही वितरण करतील.
पंतप्रधान कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) अंतर्गत 1,920 कोटी रुपयांचे 7,500 हून अधिक प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. या प्रमुख प्रकल्पांमध्ये कस्टम हायरिंग सेंटर, प्राथमिक प्रक्रिया युनिट, गोदामे, वर्गीकरण आणि प्रतवारी केंद्र, कोल्ड स्टोरेज प्रकल्प, काढणीपश्चात व्यवस्थापन प्रकल्प यांचा समावेश आहे.
पंतप्रधान सुमारे 1,300 कोटी रुपयांची एकत्रित उलाढाल असलेले 9,200 शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) राष्ट्राला समर्पित करतील.
त्याशिवाय, पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा पंतप्रधान शुभारंभ करतील. शेतकऱ्यांना पशुधनात वाढ करण्याकरिता परवडणाऱ्या किमतीत लिंग-वर्गीकृत वीर्याची उपलब्धता वाढवण्याच्या आणि त्याची किंमत प्रति मात्रा सुमारे 200 रुपयांपर्यंत कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. देशी पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप, गौचिप आणि म्हशींसाठी माहीचिप जिनोटायपिंग सेवांसह विकसित करण्यात आल्या आहेत. जनुकीय निवडीच्या अंमलबजावणीमुळे तरुण उच्च दर्जाच्या बैलाची कमी वयातच निवड करणे शक्य होणार आहे.
याशिवाय, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2.0 अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 19 मेगावॅट क्षमतेचे पाच सौर ऊर्जा पार्क पंतप्रधानांच्या हस्ते लोकसमर्पित केले जातील. कार्यक्रमादरम्यान ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांचाही सन्मान करतील.
पंतप्रधानांचे ठाण्यातील कार्यक्रम
या प्रदेशात नागरी गतिशीलता वाढवण्याच्या मोठ्या प्रयत्नाचा भाग म्हणून, पंतप्रधान प्रमुख मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. सुमारे 14,120 कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो लाईन - 3 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी विभागाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. या विभागात 10 स्थानके असून त्यापैकी 9 स्थानके भूमिगत आहेत. मुंबई मेट्रो लाइन - 3 हा एक महत्त्वाचा सार्वजनिक वाहतूक प्रकल्प आहे ज्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांमधील प्रवास सुखकर होईल. लाईन-3 पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर याद्वारे दररोज सुमारे 12 लाख प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा आहे.
सुमारे 12,200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 29 किमी असून त्यात 20 उन्नत आणि 2 भूमिगत स्थानके आहेत. हा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र असलेल्या ठाण्याच्या वाढत्या वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
सुमारे 3,310 कोटी रुपये खर्चाच्या छेडा नगर ते आनंद नगर, ठाणे या उन्नत पूर्व मुक्त मार्गाच्या विस्ताराची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई ते ठाण्यापर्यंत अखंड संपर्क सुविधा उपलब्ध होणार आहे.
याशिवाय, पंतप्रधान सुमारे 2,550 कोटी रुपये खर्चाच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (NAINA) प्रकल्पाच्या फेज-1 ची पायाभरणी करतील. या प्रकल्पामध्ये प्रमुख रस्ते, पूल, उड्डाणपूल, अंडरपास आणि एकात्मिक उपयोगिता पायाभूत सुविधांचे बांधकाम समाविष्ट आहे.
सुमारे 700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे महापालिकेच्या इमारतीची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. ठाणे महानगरपालिकेची उंच प्रशासकीय इमारत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इमारतीत एकाच ठिकाणी महानगरपालिका कार्यालये सामावून घेऊन ठाण्यातील नागरिकांचा त्रास कमी करणार आहे.