पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, म्हणजेच 1 जुलै 2023 रोजी मध्य प्रदेशला भेट देणार आहेत.
दुपारी 3:30 वाजता, पंतप्रधान शहडोल येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या कार्यक्रमात ते राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत. सिकलसेल जनुकीय स्थितीची कार्डही त्यांच्या हस्ते वितरित केली जातील.
या मोहिमेचे उद्दिष्ट सिकलसेल रोगामुळे, विशेषत: आदिवासी लोकसंख्येमध्ये उद्भवलेल्या आरोग्यविषयक आव्हानांवर उपाययोजना करणे, हे आहे. वर्ष 2047 पर्यंत सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून सिकलसेल रोगाचे निर्मूलन करण्यासाठी सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये ही मोहीम एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल. राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहिमेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये करण्यात आली होती. ही मोहीम गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, आसाम, उत्तर प्रदेश, केरळ, बिहार आणि उत्तराखंड या 17 विशेष लक्ष्यीत राज्यांमधल्या 278 जिल्ह्यांमध्ये राबवली जाईल.
पंतप्रधान, मध्य प्रदेशात सुमारे 3.57 कोटी आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) कार्डाच्या वितरणाला सुरुवात करतील. राज्यभरातील नागरी संस्था, ग्रामपंचायती आणि विकास गटांमध्ये या आयुष्मान कार्ड वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आयुष्मान कार्ड वितरण मोहीम ही कल्याणकारी योजनांची 100 टक्के परिपूर्णता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक पाऊल ठरणार आहे.
याच कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान 16 व्या शतकाच्या मध्यात गोंडवानाची सत्ताधारी राणी दुर्गावती यांच्या गौरवार्थ त्यांना अभिवादन करतील. स्वातंत्र्यासाठी मुघलांविरुद्ध लढणारी एक शूर, निर्भय आणि धाडसी योद्धा म्हणून राणी दुर्गावती यांना स्मरण केले जाते.
एका अभिनव उपक्रमाअंतर्गत पंतप्रधान संध्याकाळी पाच वाजता शहडोल जिल्ह्यातील पकारिया गावाला भेट देतील आणि तेथील आदिवासी समाजाचे नेते, स्वयं-सहायता गट, पेसा [पंचायत (अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार) कायदा, 1996) समित्यांचे नेते आणि गावातील फुटबॉल क्लबचे कर्णधार यांच्याशी संवाद साधतील.