

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 फेब्रुवारी 2024 रोजी मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. दुपारी 12:40 वाजता, ते मध्य प्रदेशात झाबुआ येथे सुमारे 7300 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील.
पंतप्रधानांनी हाती घेतलेल्या उपक्रमांसाठी अंत्योदयाचा दृष्टिकोन मार्गदर्शक राहिला आहे. प्रमुख केंद्रित क्षेत्रांपैकी एक म्हणजे विकासाचे लाभ आदिवासी समाजापर्यंत पोहोचतील याकडे लक्ष देणे आहे कारण स्वातंत्र्य मिळून अनेक दशके लोटूनही अद्याप प्रमुख घटकांना याचे लाभ मिळू शकले नाहीत. या अनुषंगाने, प्रदेशातील महत्त्वपूर्ण आदिवासी लोकसंख्येसाठी लाभदायक ठरतील अशा अनेक उपक्रमांचे लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधान करतील.
पंतप्रधान सुमारे दोन लाख महिला लाभार्थींना आहार अनुदान योजनेंतर्गत आहार अनुदानाचा मासिक हप्ता वितरित करतील. या योजनेअंतर्गत, मध्य प्रदेशातील विविध विशेष मागास जमातींमधील महिलांना पौष्टिक आहारासाठी दरमहा 1500 रुपये दिले जातात. पंतप्रधान स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना 1.75 लाख अधिकार अभिलेख (मालकी हक्क) वितरित करतील. यामुळे लोकांना त्यांच्या जमिनीवरील हक्काचे कागदोपत्री पुरावे मिळतील.
पंतप्रधान यावेळी पंतप्रधान आदर्श ग्राम योजनेअंतर्गत 559 गावांना 55.9 कोटी रुपये हस्तांतरित देखील करणार आहेत. ही रक्कम गावांमध्ये अंगणवाडी भवन, रास्त दर दुकाने, आरोग्य केंद्रे, शाळांमध्ये अतिरिक्त खोल्या, अंतर्गत रस्ते यांसह इतर विविध प्रकारची बांधकामे करण्यासाठी वापरण्यात येईल.
झाबूआ येथे उभारण्यात येत असलेल्या ‘सीएम राईज विद्यालया’चा कोनशीला समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होईल. विद्यार्थ्यांना स्मार्ट वर्ग, ई-वाचनालय यांसारख्या आधुनिक सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने या विद्यालयात तंत्रज्ञानाचा समावेश केला जाणार आहे.
मध्य प्रदेशातील पाणीपुरवठा व्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच पेयजलाची व्यवस्था करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण तसेच पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी ज्या प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे त्यामध्ये धार आणि रतलाम जिल्ह्यांमधील एक हजारहून अधिक जिल्ह्यांसाठी पेयजलाची व्यवस्था करणारा ‘तलवाडा प्रकल्प,’ तसेच मध्यप्रदेशातील विविध जिल्ह्यांमधील 50 हजारांहून अधिक शहरी कुटुंबांसाठी लाभदायक ठरणाऱ्या आणि अमृत अर्थात अटल मिशन फॉर रिज्युव्हीनेशन अँड अर्बन ट्रान्स्फॉर्मेशन 2.0 अंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या 14 शहरी पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. पंतप्रधान यावेळी, झाबुआमधील 50 ग्रामपंचायतींसाठी ‘नळाने पाणीपुरवठा’ योजनेचे लोकार्पण देखील करतील.
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान विविध रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण आणि कोनशीला समारंभ करतील. रतलाम आणि मेघनगर रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामाच्या पायाभरणीचा देखील यात समावेश आहे. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. उद्या लोकार्पण होणार असलेल्या रेल्वे प्रकल्पांमध्ये पुढील प्रकल्पांचा समावेश आहे: इंदूर-देवास-उज्जैन सी केबिन रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण; यार्ड रिमॉडेलिंगसह इटारसी-उत्तर-दक्षिण ग्रेड सेपरेटर तसेच बारखेडा-बुधानी-इटारसी यांना जोडणारा तिसरा रेल्वे मार्ग. हे प्रकल्प या भागातील रेल्वेच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि प्रवासी तसेच मालगाड्या यांच्या प्रवासाच्या वेळेत बचत करण्यासाठी उपयुक्त ठरतील.
याच कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मध्य प्रदेशातील 3275 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध रस्तेविकास प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग-47 वरील हरडा-बेतुल (पॅकेज-1) शून्य किलोमीटर ते 30 किलोमीटर (हरडा-तेमगाव) टप्प्याचे आणि राष्ट्रीय महामार्ग-752 वरील उज्जैन-देवास टप्प्याचे चौपदरीकरण, , राष्ट्रीय महामार्ग-47 वरील इंदूर-गुजरात मध्यप्रदेश सीमेवरील 16 किलोमीटरच्या टप्प्याचे चौपदरीकरण आणि राष्ट्रीय महामार्ग-47 वरील चिंचोली-बेतुल (पॅकेज-3) मार्गाचे तसेच राष्ट्रीय महामार्ग-552जी वरील उज्जैन-झालावाड टप्प्याचे चौपदरीकरण या प्रकल्पांचा यात समावेश आहे. हे प्रकल्प रस्त्यांद्वारे संपर्क सुविधा सुधारतील आणि या भागाच्या आर्थिक विकासासाठी देखील मदत करतील.
तसेच पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी कचरा टाकण्याच्या भागावरील उपाययोजना, इलेक्ट्रिक उपकेंद्र यांसह इतर अनेक विकासात्मक उपक्रमांचे लोकार्पण आणि पायाभरणी होणार आहे.