पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 सप्टेंबर 2023 रोजी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला भेट देणार आहेत. पंतप्रधानांचे सकाळी 11:15 वाजता, मध्य प्रदेशातील बिना येथे आगमन होईल, त्याठिकाणी त्यांच्या हस्ते 50,700 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात येणार आहे. बीना रिफायनरी येथील पेट्रोकेमिकल संकुल आणि राज्यभरातील दहा नवीन औद्योगिक प्रकल्पांचा यात समावेश आहे. ते दुपारी 3:15 च्या सुमारास, छत्तीसगडमधील रायगढ येथे पोहोचतील, तिथे ते रेल्वे क्षेत्रातील महत्वाचे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते छत्तीसगडमधील नऊ जिल्ह्यांमध्ये ‘क्रिटिकल केअर ब्लॉक्स’ची पायाभरणी करतील आणि एक लाख सिकलसेल समुपदेशन पत्रांचेही वितरण करण्यात येणार आहे.
पंतप्रधानांचा मध्य प्रदेश दौरा
राज्यातील औद्योगिक विकासाला चालना देणार्या उपक्रमां अतंर्गत, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (BPCL) बीना रिफायनरी येथे पेट्रोकेमिकल संकुलाची पायाभरणी पंतप्रधान करतील. ही अत्याधुनिक रिफायनरी, सुमारे 49,000 कोटी रुपये खर्चून विकसित केली जाणार आहे. येथे इथिलीन आणि प्रोपिलीनचे सुमारे 1200 KTPA (किलो-टन प्रतिवर्ष) उत्पादन केले जाईल. वस्त्रोद्योग, पॅकेजिंग, औषध निर्माण यासारख्या विविध क्षेत्रांसाठी हे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. यामुळे देशाचे आयात अवलंबित्व कमी होईल आणि पंतप्रधानांच्या 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेच्या पूर्ततेच्या दिशेने एक पाऊल ठरेल. या भव्य प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि पेट्रोलियम क्षेत्रातील आकाराने छोट्या उद्योगांच्या विकासाला चालना मिळेल.
नर्मदापुरम जिल्ह्यात ‘उर्जा आणि नवीकरणीय उर्जा निर्मिती क्षेत्र’ चे दहा प्रकल्प; इंदूरमध्ये दोन आयटी पार्क; रतलाममधील मेगा इंडस्ट्रियल पार्क; आणि मध्य प्रदेशात सहा नवीन औद्योगिक क्षेत्रांची पायाभरणी पंतप्रधान यावेळी करतील.
नर्मदापुरम जिल्ह्यातील ‘उर्जा आणि नवीकरणीय उर्जा निर्मिती क्षेत्र’ 460 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केला जाईल. या प्रदेशात आर्थिक वाढ आणि रोजगार निर्मितीच्या दिशेने हे एक दमदार पाऊल ठरेल. इंदूरमधील ‘आयटी पार्क 3 आणि 4’, सुमारे 550 कोटी रुपये खर्चून बांधले जाईल, माहिती तंत्रज्ञान आणि ITES क्षेत्राला यामुळे चालना मिळेल तसेच तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी खुल्या होतील.
रतलाममधील मेगा (औद्योगिक) इंडस्ट्रियल पार्क, 460 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधले जाईल आणि वस्त्रोद्योग, वाहन उद्योग, औषध उद्योग यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी हे एक प्रमुख केंद्र बनेल . हे औद्योगिक पार्क, दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाशी चांगले जोडले जाईल आणि संपूर्ण क्षेत्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देईल. तरुणांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगाराच्या संधी निर्माण करेल.
राज्यात संतुलित प्रादेशिक विकास आणि समान रोजगार संधींना चालना देण्याच्या उद्देशाने, शाजापूर, गुना, मौगंज, आगर मालवा, नर्मदापुरम आणि मक्सी येथे सुमारे 310 कोटी रुपये खर्चून सहा नवीन औद्योगिक क्षेत्रे विकसित केली जातील.
छत्तीसगडमध्ये पंतप्रधान
देशभरातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर पंतप्रधानांचा भर राहिला आहे, रायगडमधील सार्वजनिक कार्यक्रमात सुमारे 6,350 कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या रेल्वे क्षेत्रातील प्रकल्पांचे राष्ट्रार्पण केल्याने कनेक्टिव्हिटीला चालना मिळणार आहे. छत्तीसगड पूर्व रेल्वे प्रकल्प टप्पा -I, चंपा ते जामगा दरम्यानचा तिसरा रेल्वे मार्ग, पेंद्र रोड ते अनूपपूर दरम्यानचा तिसरा रेल्वे मार्ग आणि तलाईपल्ली कोळसा खाणीला एनटीपीसीच्या लारा उच्च औष्णिक वीजनिर्मिती केंद्राशी (एसटीपीएस ) जोडणाऱ्या एमजीआर (मेरी-गो-राऊंड) प्रणालीचा या प्रकल्पांमध्ये समावेश आहे. रेल्वे प्रकल्पांमुळे या प्रदेशात प्रवासी वाहतूक तसेच मालवाहतूकीच्या सुविधा उपलब्ध होऊन सामाजिक आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.
छत्तीसगड पूर्व रेल्वे प्रकल्प टप्पा -I महत्त्वाकांक्षी पीएम गतिशक्ती - राष्ट्रीय बृहत योजने अंतर्गत मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीसाठी विकसित केला जात आहे आणि त्यात खर्सिया ते धरमजयगड पर्यंतचा 124.8 किमी लांबीचा रेल्वे मार्ग आहे. गारे-पेल्मा पर्यंत एक स्पर लाइन आणि छाल, बरुड, दुर्गापूर आणि इतर कोळसा खाणींना जोडणाऱ्या 3 फीडर लाइनचा देखील यात समावेश आहे. सुमारे 3,055 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा रेल्वे मार्ग विद्युतीकृत ब्रॉडगेज लेव्हल क्रॉसिंग आणि प्रवासी सुविधांसह मुक्त दुहेरी मार्गिकांनी सुसज्ज आहे.हे छत्तीसगडमधील रायगड येथे असलेल्या मांड-रायगड कोळसा क्षेत्रातून कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.
पेंद्र रोड ते अनूपपूर दरम्यानचा तिसरा रेल्वे मार्ग हा 50 किमी लांबीचा असून तो सुमारे 516 कोटी रुपये खर्चून बांधला गेला आहे.चंपा आणि जामगा रेल्वे विभागादरम्यानची 98 किलोमीटर लांबीचा तिसरा मार्ग सुमारे 796 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे.नवीन रेल्वे मार्गांमुळे या प्रदेशातील कनेक्टिव्हिटी सुधारणार असून पर्यटन आणि रोजगार अशा दोन्ही संधींमध्ये वाढ होणार आहे.
65-किमी लांबीची विद्युतीकृत एमजीआर (मेरी-गो-राऊंड) प्रणाली एनटीपीसीच्या तलाईपल्ली कोळसा खाणीतून छत्तीसगडमधील 1,600 मेगावॅट क्षमतेच्या एनटीपीसीच्या लारा उच्च औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला किफायतशीर , उच्च दर्जाचा कोळसा वितरीत करेल.यामुळे एनटीपीसी लाराकडून किफायतशीर आणि खात्रीशीर वीज निर्मितीला चालना मिळेल आणि देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट होईल. 2070 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून बांधलेली एमजीआर प्रणाली, कोळसा खाणींपासून वीज केंद्रांपर्यंत कोळसा वाहतूक सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा एक आश्चर्यकारक अविष्कार आहे.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान छत्तीसगडमधील नऊ जिल्ह्यांमधील 50 खाटांच्या गंभीर आजारांवरील उपचारासाठीच्या ‘क्रिटिकल केअर ब्लॉक्स’ची पायाभरणी करणार आहेत. एकूण 210 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून दुर्ग, कोंडागाव, राजनांदगाव, गरीबीबंद, जशपूर, सूरजपूर, सुरगुजा, बस्तर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान - आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान (पीएम -एबीएचआयएम ) अंतर्गत नऊ क्रिटिकल केअर ब्लॉक्स बांधले जातील.
विशेषत: आदिवासी लोकसंख्येमध्ये सिकलसेल रोगामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने, ही तपासणी केलेल्या लोकांना एक लाख सिकलसेल समुपदेशन कार्ड देखील पंतप्रधान वितरित करणार आहेत. राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन अभियान (एनएसएईएम ) अंतर्गत सिकलसेल समुपदेशन कार्डचे वितरण केले जात आहे याची सुरुवात पंतप्रधानांनी जुलै 2023 मध्ये मध्यप्रदेशातील शहडोल इथून केली होती.