पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ऑक्टोबर 2021 रोजी उत्तराखंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. केदारनाथ इथे सकाळी साडेआठ वाजता ते केदारनाथाचे दर्शन आणि पूजा करतील. त्यानंतर 9 वाजताच्या सुमारास, त्यांच्या हस्ते केदारनाथ रोपवे प्रकल्पाची पायाभरणी केली जाईल. त्यानंतर, ते आदि शंकराचार्य यांच्या समाधीचे दर्शन घेतील. 9.25 ला, पंतप्रधान मंदाकिनी अष्टपथ आणि सरस्वती अष्टपथाच्या विकासकामांचा आढावा घेतील.
त्यानंतर, पंतप्रधान बद्रीनाथला जाणार आहेत. तिथे सुमारे 11.30 वाजता, पंतप्रधान बद्रीनाथ मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. सुमारे 12 वाजता, ते नदीकिनाऱ्यावरील विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतील. त्यानंतर, माना या गावात दुपारी साडे बारा वाजता पंतप्रधान रस्ते आणि रोपवे प्रकल्पाची पायाभरणी करतील. त्यानंतर दुपारी दोन वाजता, पंतप्रधान, अरायव्हल प्लाझा आणि तलावांच्या विकासकामांचा आढावा घेतील.
केदारनाथमधील रोपवे सुमारे 9.7 किमी लांबीचा असेल आणि गौरीकुंड ते केदारनाथला जोडेल, दोन्ही ठिकाणांमधला प्रवासाचा वेळ सध्या असलेल्या 6-7 तासांवरून केवळ 30 मिनिटांपर्यंत कमी होईल.हेमकुंड रोपवे गोविंदघाट ते हेमकुंड साहिबला जोडेल.हा रोप वे सुमारे 12.4 किमी लांबीचा असेल आणि प्रवासाचा वेळ एका दिवसापेक्षा कमी करून केवळ 45 मिनिटांपर्यंत कमी करेल.हा रोपवे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेशद्वार असलेल्या घंगारियाला देखील जोडेल.
सुमारे 2430 कोटींच्या एकूण खर्चाने विकसित होणारे हे रोपवे हे वाहतुकीचा एक पर्यावरणपूरक मार्ग आहे जो वाहतुकीचे निर्धोक , सुरक्षित आणि स्थिर साधन प्रदान करेल. या मोठ्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल, यामुळे या प्रदेशातील आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि अनेक रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.
सुमारे 1000 कोटी रुपयांच्या रस्ता रुंदीकरण प्रकल्पांची पायाभरणीही या दौऱ्यात होणार आहे. माना ते माना पास (राष्ट्रीय महामार्ग 07) आणि जोशीमठ ते मलारी (राष्ट्रीय महामार्ग 107ब ) -या दोन रस्ता रुंदीकरण प्रकल्पांची पायाभरणी ही आपल्या सीमावर्ती भागांमध्ये शेवटच्या टोकापर्यंत सर्व हवामानाशी सुसंगत रस्ते कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या दिशेने हे आणखी एक पाऊल ठरेल.कनेक्टिव्हिटी वाढवण्यासोबतच, हे प्रकल्प धोरणात्मक दृष्टिकोनातूनही फायदेशीर ठरतील.
केदारनाथ आणि बद्रीनाथ ही सर्वात महत्वाची हिंदू देवस्थाने आहेत. हे क्षेत्र हेमकुंड साहिब या पूज्य शीख तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखले जाते. हाती घेतलेले कनेक्टिव्हिटी प्रकल्प हे धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणी प्रवेश सुलभ करण्यासाठी आणि मूलभूत पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी पंतप्रधानांची वचनबद्धता दर्शवतात.