पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 फेब्रुवारी 2023 रोजी कर्नाटकला भेट देतील. पंतप्रधान, सकाळी साडेअकरा वाजता बेंगळुरू येथे भारत ऊर्जा सप्ताह 2023 चे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता ते टुमकुरु येथील एचएएल हेलिकॉप्टर कारखाना राष्ट्राला समर्पित करतील आणि विविध विकास उपक्रमांची पायाभरणी करतील.
भारत ऊर्जा सप्ताह 2023
पंतप्रधान बेंगळुरूमध्ये इंडिया एनर्जी वीक (आयईडब्लू) 2023 चे उद्घाटन करतील. ऊर्जा परिवर्तन क्षेत्रातील महाशक्तीच्या रुपात भारताचे वाढत असलेले सामर्थ्य प्रदर्शित करणे हे
6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या, आयईडब्लूचे उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा उद्योग, सरकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील नेतृत्वाला एकत्र आणेल आणि एक जबाबदार ऊर्जा संक्रमण सादर करणारी आव्हाने आणि संधी यावर चर्चा करेल. यात जगभरातून 30 हून अधिक मंत्र्यांची उपस्थिती असेल. 30,000 हून अधिक प्रतिनिधी, 1,000 प्रदर्शक आणि 500 वक्ते भारताच्या ऊर्जाविषयक भविष्यासंदर्भातील आव्हाने आणि संधींवर चर्चा करण्यासाठी एकत्र येतील. कार्यक्रमादरम्यान, जागतिक तेल आणि वायू क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच्या गोलमेज संवादात पंतप्रधान सहभागी होतील. हरित ऊर्जेच्या क्षेत्रातही ते अनेक उपक्रम सुरू करणार आहेत.
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी इथेनॉल मिश्रण कार्यक्रम हे सरकारचे प्रमुख लक्ष्यित क्षेत्र आहे. सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे २०13-14 पासून इथेनॉल उत्पादन क्षमतेत सहापट वाढ झाली आहे. इथेनॉल मिश्रण कार्यक्रम आणि जैवइंधन कार्यक्रमांतर्गत गेल्या आठ वर्षांतील कामगिरीमुळे भारताची ऊर्जा सुरक्षा तर वाढलीच पण 318 लाख मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी झाले आणि सुमारे 54,000 कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत झाली, यासह इतर अनेक फायदेही झाले आहेत. परिणामी, 2014 ते 2022 या कालावधीत इथेनॉल पुरवठ्यासाठी सुमारे 81,800 कोटी रुपये देण्यात आले असून 49,000 कोटींहून अधिक रुपये शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आले आहेत.
इथेनॉल मिश्रण पथदर्शी आराखड्याच्या अनुषंगाने, 11 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील तेल विपणन कंपन्यांच्या 84 किरकोळ विक्री केन्द्रांवर पंतप्रधान ई20 इंधनाचं लोकार्पण करतील. ई20 हे पेट्रोलसह 20% इथेनॉलचे मिश्रण आहे. 2025 पर्यंत इथेनॉलचे संपूर्ण 20% मिश्रण साध्य करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. तेल विपणन कंपन्या 2जी-3जी इथेनॉल प्रकल्प उभारत आहेत त्यामुळे कामाला गती येईल.
हरित गतीशीलता फेरीलाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. यात हरित ऊर्जा स्रोतांवर चालणाऱ्या वाहनांचा सहभाग पाहायला मिळेल आणि हरित इंधनाच्या जनजागृतीसाठी मदत होईल.
इंडियन ऑईलच्या ‘अनबॉटल्ड’ अर्थात बाटल्यांच्या पुनर्वापर उपक्रमांतर्गत गणवेशांचे अनावरण पंतप्रधान करतील.
एकदाच वापरले जाणारे प्लास्टिक टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या पंतप्रधानांच्या ध्येयदृष्टीनुसार, इंडियन ऑईलने रिटेल ग्राहक अटेंडंट आणि एलपीजी डिलिव्हरी कर्मचार्यांसाठी पुनर्वापर केलेले पॉलिएस्टर (आररीईटी) आणि कापसापासून बनवलेले गणवेश स्वीकारले आहेत. इंडियन ऑईलच्या ग्राहक अटेंडंटच्या गणवेशाचा प्रत्येक संच सुमारे 28 वापरलेल्या पेट(पीईटी) बाटल्यांच्या पुनर्वापराला सहाय्यभूत ठरेल. इंडियन ऑईल हा पुढाकार ‘अनबॉटल्ड’ च्या माध्यमातून पुढे नेत आहे. हा शाश्वत कपड्यांसाठीचा एक ब्रँड असून पुनर्वापर केलेल्या पॉलिएस्टरपासून निर्मित कपड्यांच्या व्यापारासाठी सुरु केला गेला आहे. या ब्रँड इनडोअर, इंडियन ऑईलने इतर ऑईल विपणन कंपन्यांच्या ग्राहक अटेंडंट्ससाठी गणवेश, लष्करासाठी बिगर लढाऊ गणवेश, संस्थांसाठी गणवेश/पोशाख आणि किरकोळ ग्राहकांना कपडे विक्री करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
इंडियन ऑईलच्या स्वयंपाकासाठीच्या इनडोअर सौर प्रणालीचे ट्विन-कूकटॉप प्रारुप पंतप्रधान समर्पित करतील . त्याच्या व्यावसायिक विक्रीचाही शुभारंभ करतील. इंडियन ऑईलने यापूर्वी एक नाविन्यपूर्ण आणि पेटंट असलेली स्वयंपाकासाठीची इनडोअर सौर प्रणाली विकसित केली होती. ती सिंगल कुकटॉप होती. मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारे, स्वयंपाकासाठीची इनडोअर सौर ट्विन-कूकटॉप प्रणालीची रचना केली आहे. वापरकर्त्यांना ती अधिक लवचिक आणि सुलभतेचा अनुभव देईल. हे एक स्वयंपाकासाठीचे क्रांतिकारक इनडोअर सौर साधन असून ते एकाच वेळी सौर आणि सहाय्यक ऊर्जा स्रोतांवर कार्य करते
पंतप्रधानांची टुमकुरु भेट
संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत, पंतप्रधान टुमकुरु येथील एचएएल हेलिकॉप्टर कारखाना राष्ट्राला समर्पित करतील. 2016 मध्ये त्याची पायाभरणीही पंतप्रधानांनीच केली होती. हा एक समर्पित नवीन ग्रीनफिल्ड हेलिकॉप्टर कारखाना असून तो हेलिकॉप्टर तयार करण्याची क्षमता आणि परिसंस्था वाढवेल.
या हेलिकॉप्टर कारखान्यात आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर निर्मिती सुविधा आहे. सुरुवातीला येथे लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (एलयुएच) तयार करण्यात येतील. एलयुएच हे स्वदेशी बनावटीचे आणि इथेच विकसित केलेले 3-टन श्रेणीचे, एकल इंजिन बहुउद्देशीय उच्च दर्जाचे युटिलिटी हेलिकॉप्टर आहे.
भविष्यात हलक्या वजनाचे लढाऊ लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) आणि इंडियन मल्टीरोल हेलिकॉप्टर (आयएमआरएच) आणि इतर हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी तसेच एलसीएच, एलयुएच, सिविल एएलएच आणि आयएमआरएच्या दुरुस्तीसाठी कारखान्याचा विस्तार केला जाईल. भविष्यात सिव्हिल एलयुएच निर्यात करण्याची क्षमता देखील कारखान्यामधे आहे.
या सुविधेमुळे भारताला संपूर्ण स्वदेशी हेलिकॉप्टर निर्मिती करता येईल आणि हेलिकॉप्टरची रचना, विकास आणि निर्मितीमध्ये स्वावलंबी बनण्याचा मान भारताला प्राप्त होईल.
कारखान्यात, उद्योग 4.0 मानकांच्या दर्जाची उत्पादन सज्जता असेल. एचएएल, पुढील 20 वर्षांमध्ये टुमकुरु येथून 3-15 टनांच्या श्रेणीतील 1000 हून अधिक हेलिकॉप्टर तयार करण्याची योजना आखत आहे. यामुळे परिसरातील सुमारे 6000 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
टुमकुरु औद्योगिक नगरीची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमाअंतर्गत, चेन्नई बेंगळुरू औद्योगिक कॉरिडॉरचा एक भाग म्हणून टुमकुरुमध्ये तीन टप्प्यात 8484 एकरवरील औद्योगिक नगरीचा विकास हाती घेण्यात आला आहे.
टुमकुरु येथील तिप्तूर आणि चिक्कनायकनहळ्ळी येथे दोन जल जीवन मिशन प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान करतील. तिप्तूर बहु-ग्राम पेयजल पुरवठा प्रकल्प 430 कोटी रुपये खर्चून बांधला जाईल. चिक्कनायकनहळ्ळी तालुक्यातील 147 वस्त्यांसाठी बहु-ग्राम पाणीपुरवठा योजना सुमारे 115 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पांमुळे परिसरातील लोकांना पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय होईल.