पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 27 फेब्रुवारी 2023, कर्नाटकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 11:45 च्या सुमारास मोदी शिवमोग्गा विमानतळाची पाहणी करतील. त्यानंतर, ते शिवमोग्गा इथल्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी सुमारे सव्वातीन वाजता, बेळगावी इथे पंतप्रधान विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करतील. तसेच पीएम किसान योजनेच्या 13 हप्त्याची रक्कमही त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
पंतप्रधानांचा शिवमोग्गा मधील कार्यक्रम
देशभरातील हवाई वाहतूक संपर्क व्यवस्था मजबूत करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच भर दिला आहे, त्यांच्या या संकल्पाला अधिक बळ देणाऱ्या, शिवमोग्गा विमानतळाचे उद्घाटन यावेळी होणार आहे. सुमारे 450 कोटी रुपये खर्च करुन, हे नवे विमानतळ विकसित करण्यात आले आहे. या विमानतळावर, प्रवासी टर्मिनल इमारतीत दर तासाला, 300 प्रवाशांची व्यवस्था होऊ शकेल. या विमानतळामुळे शिवमोग्गा शहराची आणि मलनाड प्रदेशातील हवाई वाहतूक आणि संपर्कव्यवस्था अधिक सुधारण्यास मदत होईल
पंतप्रधान शिवमोग्गा इथे दोन रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजनही करणार आहेत. यात शिवमोग्गा - शिकारीपुरा - राणेबेन्नूर नवीन रेल्वे मार्ग आणि कोटेगांगरु रेल्वे कोचिंग डेपोचा समावेश आहे. शिवमोग्गा - शिकारीपुरा - राणेबेन्नूर हा नवीन रेल्वे मार्ग 990 कोटी रुपये खर्चून विकसित केला जाईल. या प्रकल्पामुळे बेंगळुरू-मुंबई मार्गासह मलनाड प्रदेशात दळणवळण व्यवस्था अधिक सुलभ आणि गतिमान होईल. शिवमोग्गा शहरातच, कोटेगांगुरु रेल्वे कोचिंग डेपो विकसित केला जाणार आहे. 100 कोटींहून अधिक खर्च तयार होणाऱ्या या डेपोमुळे, शिवमोग्गा इथून नवीन गाड्या सुरू करता येतील तसेच बेंगळुरू आणि म्हैसूर इथे रेल्वेच्या देखभालीसाठी होणारी गर्दी कमी करता येईल.
पंतप्रधानांच्या हस्ते विविध रस्ते विकास प्रकल्पांची पायाभरणीही होणार आहे. एकूण 215 कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या या प्रकल्पांमध्ये, राष्ट्रीय महामार्ग 766सी वर शिकारीपुरा टाउनसाठी, बयंदूर-रानीबेन्नूरला जोडणाऱ्या, नवीन बायपास म्हणजे वळणरस्त्याच्या समावेश आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग -169ए च्या मेगारावल्ली ते अगुंबे पट्ट्याचे रुंदीकरण; आणि राष्ट्रीय महामार्ग 169 वर तीर्थहल्ली तालुक्यातील भरतीपुरा येथे नवीन पुलाचे बांधकाम, अशा प्रकल्पांचा समावेश आहे.
याच कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान जल जीवन मिशन अंतर्गत 950 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बहु-ग्राम योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यामध्ये गौतमपुरा आणि इतर 127 गावांसाठी एका बहु-ग्राम योजनेचे उद्घाटन आणि एकूण 860 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या तीन अन्य बहु-ग्राम योजनांसाठीचे भूमिपूजन केले जाईल. या चार योजना योजनांमुळे घरगुती पाइपद्वारे नळ जोडणी देता येईल. एकूण 4.4 लाखांहून अधिक लोकांना त्याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
पंतप्रधान, शिवमोग्गा शहरातील 44 स्मार्ट सिटी प्रकल्पांचेही उद्घाटन करतील. एकूण 895 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांमध्ये, 110 किमी लांबीचे आठ स्मार्ट रोड प्रकल्प, ज्यात, कमांड अँड कंट्रोल कक्ष तसेच बहुस्तरीय कार पार्किंग समाविष्ट असेल. तसेच स्मार्ट बस निवारा प्रकल्प, घनकचरा व्यवयथापन यंत्रणा, शिवाप्पा नाईक पॅलेससारख्या वारसा स्थळाचे संवादात्मक वस्तू संग्रहालयात रूपांतर केले जाणार आहे. त्याशिवाय, 90 संवर्धन मार्ग, उद्यानांची निर्मिती आणि रिव्हरफ्रंट विकास प्रकल्प, यासह इतर प्रकल्पाचाही समावेश आहे.
पंतप्रधान बेळगावी इथे
शेतकर्यांच्या कल्याणाप्रती पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या दिशेने आणखी एक पाऊल म्हणून, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजने अंतर्गत, 13 व्या हप्त्याची अंदाजे 16,000 कोटी रुपये रक्कम, 8 कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे वितरीत केली जाईल.
या योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी वर्षाला एकूण 6000 रुपये, 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात.
कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान पुनर्विकसित बेळगावी रेल्वे स्थानकाच्या इमारतीचे लोकार्पण करतील. प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी अंदाजे 190 कोटी रुपये खर्च करून या रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे. बेळगावी इथल्या लोंडा-बेळगावी-घाटप्रभा विभाग दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे देखील पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होईल. सुमारे 930 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मुंबई-पुणे-हुबळी-बंगळूरू या व्यस्त रेल्वे मार्गाची क्षमता वाढवेल, ज्यामुळे या प्रदेशातील व्यापार, वाणिज्य आणि आर्थिक घडामोडींना चालना मिळेल. पंतप्रधान बेळगावी इथे जल जीवन मिशन अंतर्गत सहा बहुग्राम योजना प्रकल्पांची पायाभरणी करतील, जे सुमारे 1585 कोटी रुपये खर्च करून विकसित केले जातील आणि 315 पेक्षा जास्त गावांमधील सुमारे 8.8 लाख लोकसंख्येला त्याचा फायदा होईल.