पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 मार्च 2023 रोजी कर्नाटकच्या दौऱ्यावर जाणार असून चिक्कबल्लापूर इथे श्री मधुसूदन साई वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्थेचे सकाळी पावणेअकरा वाजता पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सुमारे एक वाजता पंतप्रधान बंगळुरू मेट्रोच्या व्हाईटफील्ड (कडुगोडी) ते कृष्णराजपुरा मेट्रो लाइनचेही उद्घाटन करतील. तसेच, बंगळुरू मेट्रोमधून ते प्रवासही करतील.
पंतप्रधान चिक्कबल्लापूर इथे
विद्यार्थ्यांना या प्रदेशात नवीन संधींचा लाभ घेण्यासाठी आणि सुलभ तसेच परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या श्री मधुसूदन साई संस्थेच्या वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्थेचे (SMSIMSR) पंतप्रधान उद्घाटन करतील.
चिक्कबल्लापूरच्या सत्यसाईग्राम, मुद्देनहळ्ळी इथल्या सत्यसाई विद्यापीठाने मानवी उत्कृष्टतेसाठी हे केंद्र स्थापन केले आहे. ग्रामीण भागात वसलेले आणि वैद्यकीय शिक्षण तसेच आरोग्यसेवेचे व्यावसायिकरण करण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या ऊयाय केंद्रात, सर्वांना वैद्यकीय शिक्षण आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा पूर्णपणे मोफत मिळू शकेल. 2023 च्या शैक्षणिक वर्षापासून संस्थेचे कामकाज सुरू होईल.
पंतप्रधान बंगळुरू इथे
पंतप्रधानांनी देशभरात जागतिक दर्जाच्या नागरिक वाहतूक सेवा देणाऱ्या पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला आहे. याच अभियानाचा भाग म्हणून, बंगळुरू मेट्रो फेज 2 अंतर्गत व्हाईटफील्ड (कडुगोडी) मेट्रो ते कृष्णराजपुरा मेट्रो लाईनच्या 13.71 किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याच्या विस्तार प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हाईटफील्ड (कडुगोडी) मेट्रो स्टेशनवर होणार आहे. सुमारे 4250 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या मेट्रो मार्गाचे उद्घाटन बेंगळुरूमधील प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवास सुविधा प्रदान करेल, या शहराचे दळणवळण सुलभ करेल आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी करेल.