पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 डिसेंबरला ( मंगळवारी) कानपूरला भेट देणार असून दुपारी दीड वाजता, कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पूर्ण झालेल्या टप्प्याचे त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. तसेच या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान बिना-पंकी बहुउत्पादन पाईपलाइन प्रकल्पाचेही उद्घाटन करणार आहेत. त्याआधी, सकाळी 11 वाजता, पंतप्रधान आयआयटी कानपूरच्या 54 व्या दीक्षांत समारंभात देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
नागरी भागातील वाहतूक व्यवस्था सुधारणे आणि अधिक बळकट करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कायम भर असतो. कानपूर मेट्रो रेल्वेच्या या पूर्ण झालेल्या प्रकल्पाचे उद्घाटन या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने उचललेले हे आणखी एक पाऊल आहे. मेट्रोचा पूर्ण झालेला टप्पा आयआयटी कानपूर ते मोती झील पर्यंत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे निरीक्षण देखील करणार असून, आयआयटी मेट्रो स्थानक ते गीता नगर या भागात मेट्रोने प्रवासही करणार आहेत. या संपूर्ण मेट्रो रेल्वे प्रकल्पाची लांबी 32 किलोमीटर असून या प्रकल्पासाठी 11000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आला आहे.
पंतप्रधान बिना-पंकी बहुउत्पादन पाईपलाइन प्रकल्पाचेही उद्घाटन करतील. या 356 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाची क्षमता वार्षिक 3.45 दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष इतकी आहे. मध्यप्रदेशातील बिना तेल शुद्धीकरण प्रकल्पापासून सुरु होणारी ही पाईपलाइन कानपूरमधील पंकी इथे पोहोचते. या प्रकल्पाच्या बांधणीसाठी 1500 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. यामुळे, या भागातल्या लोकांना बिना तेल शुद्धीकरण प्रकल्पातील पेट्रोलियम पदार्थ उपलब्ध होतील.
आयआयटी कानपूर इथे होणाऱ्या 54 व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या दीक्षांत समारंभात, सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल स्वरूपात पदव्या प्रदान केल्या जातील. विशेष म्हणजे, हे तंत्रज्ञान इथल्याच विद्यार्थ्यांनी ब्लॉकचेन-प्रणित तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित केले आहे. या ब्लॉकचेन आधारित डिजिटल पदव्या पंतप्रधानांच्या हस्ते वितरित होतील.या डिजिटल पदव्या जगभरात कुठेही पडताळून बघता येतील आणि त्यात काहीही फेरफार करणे शक्य असणार नाही.