पंतप्रधान झारखंडमध्ये 35,700 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे करणार उद्‌घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी
पंतप्रधान सिंद्री खत प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार; गोरखपूर आणि रामागुंडममधील खत संयंत्रांच्या पुनरुज्जीवनानंतर देशात तिसरे खत संयंत्र पुनरुज्जीवित होणार
पंतप्रधान चतरा येथे उत्तर करणपुरा सुपर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे राष्ट्रार्पण करणार
झारखंडमध्ये रेल्वे क्षेत्राला मोठी चालना; राज्यातील तीन नवीन गाड्यांना पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार
पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये 22,000 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार
पंतप्रधान रघुनाथपूर औष्णिक ऊर्जा केंद्र टप्पा II ची पायाभरणी करणार
हल्दिया-बरौनी क्रूड ऑइल पाईपलाईनचे उद्‌घाटन पंतप्रधान करणार
कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदर येथे पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अनेक प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी पंतप्रधान करणार
पश्चिम बंगालमध्ये रेल्वे, रस्ते, एलपीजी पुरवठा आणि सांडपाणी प्रक्रियांशी संबंधित इतर अनेक प्रकल्प केंद्रस्थानी
ऊर्जा क्षेत्राला महत्त्वपूर्ण चालना देण्यासाठी, बेगुसराय येथे तेल आणि वायू क्षेत्राशी संबंधित 1.48 लाख कोटी रुपयांचे देशव्यापी प्रकल्प हाती घेतले जाणार
भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरीची नोंद करून, केजी क्षेत्रातून पहिले तेल उत्खनन पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील
पंतप्रधान बिहारमध्ये 34,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील
बरौनी रिफायनरीच्या विस्तारासाठी पंतप्रधानांच्या हस्ते प्रकल्पाची पायाभरणी; रिफायनरीच्या इतर अनेक प्रकल्पांचे उद्‌घाटन पंतप्रधान करणार
बरौनी खत प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन; देशात चौथ्या खत संयंत्राचे पुनरुज्जीवन केले जाणार
राष्ट्रीय महामार्गांचे जाळे, रेल्वे पायाभूत सुविधा, नमामि गंगे कार्यक्रमालाही बिहारमध्ये मोठी चालना मिळणार ; पंतप्रधान बिहारमध्ये चार नवीन रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील
पाटणा येथे गंगा नदीवरील नवीन सहा पदरी पुलाची पायाभरणी पंतप्रधान करणार
पंतप्रधान पाटणा येथे एकता मॉलची पायाभरणी करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1आणि 2 मार्च 2024 रोजी झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1आणि 2 मार्च 2024 रोजी झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेत.

पंतप्रधानांचे 1 मार्च रोजी, सकाळी 11 च्या सुमाराला, झारखंडमधल्या धनबाद जिल्ह्यातल्या  सिंद्री येथे आगमन होईल. येथे ते  एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. पंतप्रधान  झारखंडमध्ये 35,700 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील. पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यातल्या आरामबाग येथे  पंतप्रधान दुपारी 3 च्या सुमारास,  एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. तिथे ते  7,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील.

पंतप्रधान 2 मार्च रोजी, सकाळी 10:30 च्या सुमाराला , पश्चिम बंगालमधल्या नदिया जिल्ह्यातल्या कृष्णनगर येथे पोहोचतील. येथे ते 15,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील. बिहारमधल्या औरंगाबाद येथे दुपारी 2:30 वाजता, पंतप्रधान 21,400 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील. पंतप्रधानांचे संध्याकाळी 5:15 वाजता, बिहारमधल्या बेगुसराय येथे आगमन होईल. येथे ते एका कार्यक्रमात सहभागी होतील आणि देशभरातील सुमारे 1.48 लाख कोटी रुपयांच्या तेल आणि वायू क्षेत्रातील प्रकल्पांचे तसेच बिहारमधील 13,400 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन, राष्ट्रार्पण  आणि पायाभरणी करतील.

पंतप्रधानांचा झारखंड मधील सिंद्री येथील दौरा 

पंतप्रधान, धनबाद मधील  सिंद्री येथे होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात खत, रेल्वे, वीज  आणि कोळसा क्षेत्राशी संबंधित अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील.

पंतप्रधान हिंदुस्थान उर्वरक अँड रसायन लिमिटेड  सिंद्री खत प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. 8900 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित केलेला हा खत प्रकल्प युरिया क्षेत्रातील स्वयंपूर्णतेच्या दिशेने एक पाऊल आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी सुमारे १२.७ एलएमटी देशी युरिया उत्पादनाचा लाभ होईल. गोरखपूर आणि रामगुंडम येथील खत प्रकल्पांचे पुनरुज्जीवन केल्यानंतर आणि पंतप्रधानांच्या हस्ते अनुक्रमे डिसेंबर 2021 आणि नोव्हेंबर 2022 मध्ये ते राष्ट्राला अर्पण केल्यानंतर देशातील या तिसऱ्या खत संयंत्राचे पुनरुज्जीवन होणार आहे.

पंतप्रधान झारखंडमध्ये 17,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील. या प्रकल्पांमध्ये सोन नगर-आंदलला जोडणारी तिसरी आणि चौथा रेल्वे मार्ग; टोरी - शिवपूर पहिला आणि  दुसरा आणि बिराटोली- शिवपूर तिसरा रेल्वे मार्ग (टोरी - शिवपूर प्रकल्पाचा भाग); मोहनपूर - हंसदिहा नवीन रेल्वे मार्ग; धनबाद-चंद्रपुरा रेल्वे मार्ग, आणि इतर मार्गांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातील रेल्वे सेवेचा विस्तार होईल आणि प्रदेशातील सामाजिक आर्थिक विकासाला चालना मिळेल. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान तीन रेल्वे गाडयांना हिरवा झेंडा दाखवतील. यामध्ये देवघर – दिब्रुगड रेल्वे सेवा, टाटानगर आणि बदाम पहाड  दरम्यानची मेमू रेल्वे सेवा (दैनिक) आणि शिवपूर स्टेशनवरून लांब पल्ल्याच्या मालगाडीचा समावेश आहे.

पंतप्रधान झारखंडमधील उत्तर करणपुरा सुपर औष्णिक ऊर्जा प्रकल्प , चतराच्या युनिट 1 (660 मेगावॅट) यासह महत्त्वाचे ऊर्जा प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील.  7500 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित केलेल्या या प्रकल्पामुळे या प्रदेशातील वीजपुरवठ्याची स्थिती सुधारेल. तसेच रोजगार निर्मिती आणि राज्यातील सामाजिक आर्थिक विकासाला प्रोत्साहन मिळेल. तसेच, पंतप्रधान झारखंडमधील कोळसा क्षेत्राशी संबंधित प्रकल्प देखील राष्ट्राला  समर्पित करतील.

पंतप्रधानांचा पश्चिम बंगालमधील आरामबाग येथील दौरा 

पंतप्रधान हुगळी मधील आरामबाग येथे रेल्वे, बंदरे, तेल पाइपलाइन, एलपीजी पुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया यासारख्या क्षेत्रांशी संबंधित अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करतील.सुमारे 2,790 कोटी रुपये खर्चून विकसित केलेल्या इंडियन ऑइलच्या 518 किमी हल्दिया-बरौनी क्रूड ऑइल पाइपलाइनचे उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या  पाइपलाइनमुळे  बरौनी तेल शुद्धीकरण प्रकल्प , बोंगाईगाव तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि गुवाहाटी तेल शुद्धीकरण प्रकल्प यांना सुरक्षित, किफायतशीर आणि पर्यावरणास अनुकूल पद्धतीने कच्च्या तेलाचा पुरवठा होईल. पंतप्रधान कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदर, येथे पायाभूत सुविधा बळकट करणाऱ्या सुमारे 1000 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्राला समर्पित करतील करतील. पायाभरणी होणाऱ्या प्रकल्पांमध्ये  कोलकाता डॉक सिस्टीमच्या बर्थ क्रमांक 8 एनएसडीची पुनर्बांधणी आणि बर्थ क्रमांक  7 आणि 8 NSD यांत्रिकीकरण यांचा समावेश आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातील हल्दिया डॉक कॉम्प्लेक्स, येथील ऑइल जेटींवरील अग्निशामक यंत्रणेच्या विस्तार प्रकल्पाचे राष्ट्रपण देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. नव्याने स्थापन केलेली ही अग्निशमन सुविधा ही एक अत्याधुनिक पूर्ण स्वयंचलित व्यवस्था असून   अत्याधुनिक गॅस आणि फ्लेम सेन्सर्सने सुसज्ज आहे, ज्यामुळे तत्काळ धोका ओळखणे शक्य होते. पंतप्रधान हल्दिया डॉक कॉम्प्लेक्सची 40 टन माल उचलण्याची क्षमता असलेली तिसरी रेल माउंटेड क्वे क्रेन (RMQC) देशाला समर्पित करतील. कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातील हे नवीन प्रकल्प जलद आणि सुरक्षित माल हाताळणी आणि माल व्यवस्थित बाहेर काढण्यात लाभदायक ठरतील आणि त्यामुळे बंदराच्या उत्पादकतेत लक्षणीय वाढ होईल.

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते 2680 कोटी रुपयांच्या महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये झारग्राम सल्गझारी यांना जोडणारा 90 किमी लांबीचा तिसरा रेल्वे मार्ग; सोनडालिया- चंपापुकुर रेल्वे मार्गाचे (24 किमी) दुपदरीकरण; तसेच दानकुनी -भट्टनगर-बाल्टीकुरी रेल्वे मार्गाचे (9 किमी) दुपदरीकरण यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे या भागातील रेल्वे प्रवासाची चांगली सोय होईल, वाहतूक व्यवस्था सुधारेल तसेच मालवाहतुकीची सुलभ सोय झाल्यामुळे या भागातील आर्थिक तसेच औद्योगिक विकासाला हातभार लागेल.

पंतप्रधान यावेळी खरगपूर येथील विद्यासागर औद्योगिक पार्कमध्ये इंडियन ऑईल कंपनीने उभारलेल्या 120 टीएमटीपीए क्षमतेच्या एलपीजी बॉटलिंग कारखान्याचे देखील उद्घाटन करतील. सुमारे 200 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह उभारण्यात आलेला हा एलपीजी बॉटलिंग कारखाना या भागातील पहिला एलपीजी बॉटलिंग कारखाना आहे. या कारखान्यातून पश्चिम बंगालमधील 14.5 लाख ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा होईल.

पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी पश्चिम बंगालमधील सांडपाणी प्रक्रिया तसेच गटारे यांच्याशी संबंधित तीन प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे.सुमारे 600 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पांना जागतिक बँकेने अर्थसहाय्य दिले आहे. या प्रकल्पांमध्ये इंटरसेप्शन आणि डायव्हर्जन (आय अँड डी)विषयक कामे तसेच हावडा येथील 65 एमएलडी क्षमतेची घन मैला प्रक्रिया संयंत्रे (एसटीपीज) तसेच 3.3 किमीचे  सांडपाणी जाळे; आय अँड डी व बाली येथील 62 एमएलडी क्षमतेची एसटीपीज तसेच 11.3 किमीचे सांडपाणी नेटवर्क आणि कमरहाटी आणि बारानगर येथील 60 एमएलडी क्षमतेची  आय अँड डी आणि एसटीपीज तसेच 8.15 किमीचे सांडपाणी नेटवर्क या प्रकल्पांचा समावेश आहे.

पंतप्रधानांची पश्चिम बंगालमधील कृष्णानगरला भेट

कृष्णानगर येथे पंतप्रधान उर्जा, रेल्वे आणि रस्ते या क्षेत्रांशी संबंधित विविध विकासकामांचे उद्‌घाटन, लोकार्पण तसेच पायाभरणी करणार आहेत.

देशातील उर्जा क्षेत्राला बळकट करण्यासाठी पंतप्रधान पुरुलिया जिल्ह्यातील रघुनाथपूर येथे 2 *660 मेगावॉट क्षमतेच्या रघुनाथपूर औष्णिक उर्जा केंद्राच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी करतील. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन तर्फे उभारण्यात येत असलेल्या या कोळशावर आधारित उर्जा प्रकल्पात अत्यंत उच्च कार्यक्षमतेचे अत्यंत महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. देशाची उर्जा सुरक्षा बळकट करण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असेल.

पंतप्रधान यावेळी मेजिया औष्णिक उर्जा केंद्रातील संयंत्र 7 आणि 8 च्या फ्लू गॅस डीसल्फरायझेशन (एफजीडी) यंत्रणेचे उद्घाटन करतील. सुमारे साडेसहाशे कोटी रुपये खर्चून उभारलेली ही एफजीडी यंत्रणा फ्लू गॅसमधून सल्फर डायोक्साईड काढून टाकेल आणि स्वच्छ  फ्लू गॅस तसेच फोर्मिंग जिप्सम निर्माण करेल जे सिमेंट उद्योगामध्ये वापरता येईल.

राष्ट्रीय महामार्ग क्र.12 वरील फराक्का-रायगंज टप्प्याच्या (100किमी) चौपदरीकरणाच्या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.सुमरे 1986 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प वाहतूक कोंडीची समस्या कमी करेल, दळणवळण सुविधा सुधारेल आणि उत्तर बंगाल तसेच ईशान्य प्रदेशाच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये योगदान देईल.

पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी पश्चिम बंगालमधील 940 कोटी रुपये खर्चाच्या चार रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. यामध्ये दामोदर-मोहिशीला रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण; रामपूरहाट आणि मुराराय यांच्या दरम्यान तिसरा रेल्वे मार्ग टाकणे; बाजारसाव-अझीमगंज रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि अझीमगंज-मुर्शिदाबाद या नव्या रेल्वे मार्गाची उभारणी या प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प या भागातील रेल्वेमार्गांच्या संपर्क सुविधेत सुधारणा करतील, सुलभ पद्धतीने मालवाहतुकीची सोय करतील तसेच या भागातील आर्थिक तसेच औद्योगिक विकासामध्ये योगदान देतील.

पंतप्रधानांची बिहारमधील औरंगाबादला भेट

औरंगाबाद येथे पंतप्रधान 21,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण तसेच पायाभरणी करतील. तसेच बिहारमधील राष्ट्रीय महामार्गांचे जाळे बकत करण्याच्या दृष्टीने 18,100 कोटी रुपयांच्या विविध राष्ट्रीय महामार्ग संबंधी प्रकल्पांचे उद्घाटन करून पायाभरणी करतील.

ज्या प्रकल्पांचे उद्‌घाटन केले जाणार आहे त्यात राष्ट्रीय महामार्ग - 227 च्या जयनगर-नरहिया भागासह 63.4 किमी लांबीच्या दुपदरीकरणाचा;  राष्ट्रीय महामार्ग -131G वरील कन्हौली ते रामनगर पर्यंत सहा पदरी पाटणा बाह्यवळण मार्गाचा भाग; किशनगंज शहरातील विद्यमान उड्डाणपुलाच्या समांतर 3.2 किमी लांबीचा दुसरा उड्डाणपूल; 47 किमी लांबीचे बख्तियारपूर-राजौली मार्गाचे चौपदरीकरण; आणि राष्ट्रीय महामार्ग -319 च्या 55 किमी लांबीच्या अरा - पररिया विभागाचे चौपदरीकरण यांचा समावेश आहे.

पंतप्रधान सहा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करतील, यामध्ये, प्रवेश नियंत्रित असलेल्या ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाच्या अमास ते शिवरामपूर गावापर्यंतच्या 55 किमी लांबीच्या टप्प्याचे चार पदरी बांधकाम; प्रवेश नियंत्रित असलेल्या ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाच्या शिवरामपूर ते रामनगर या 54 किमी लांबीच्या टप्प्याचे चार पदरी बांधकाम; कल्याणपूर गाव ते बलभदरपूर गावापर्यंत 47 किमी लांबीचा चौपदरी प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्ग;  प्रवेश नियंत्रित असलेल्या ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाच्या बलभदरपूर ते बेला नवाडा हा 42 किमी लांबीच्या टप्प्याचे चार पदरी बांधकाम; दानापूर-बिहटा विभागापासून 25 किमी लांबीचा चार पदरी उन्नत कॉरिडॉर आणि बिहता - कोइलवार विभागाच्या सध्याच्या दोन पदरी मार्गाचे चार पदरी वाहतूक मार्गामध्ये आद्यतन यांचा समावेश आहे. या रस्ते प्रकल्पांमुळे या भागांची संपर्क व्यवस्था  सुधारेल, प्रवासाचा वेळ कमी होईल, पर्यटनाला चालना मिळेल आणि प्रदेशाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.

पटना वळण मार्गाचा एक भाग म्हणून विकसित केल्या जाणाऱ्या गंगा नदीवरील सहा पदरी पुलाची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.  हा पूल देशातील सर्वात लांब नदीवरील पुलांपैकी एक असेल.  हा प्रकल्प पाटणा शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मदत करेल तसेच बिहारच्या उत्तर आणि दक्षिण भागांमध्ये जलद आणि उत्तम संपर्क सुविधा प्रदान करेल. यामुळे या संपूर्ण क्षेत्राच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल.

बिहारमधील नमामि गंगे उपक्रमा अंतर्गत सुमारे 2,190 कोटी रुपये खर्चून विकसित केलेल्या 12 प्रकल्पांचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.  या प्रकल्पांमध्ये सैदपूर आणि पहारी येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प;  सैदपूर, बेऊर, पहाडी क्षेत्र IVA साठी नाल्यांचे जाळे;  करमाळीचक येथे नाल्यांच्या जाळ्यासह मलनिस्सारण व्यवस्था;  पहाडी क्षेत्र पाचमधील मलनिस्सारण योजना; तसेच बारह, छपरा, नौगाचिया, सुलतानगंज आणि सोनेपूर शहर येथे इंटरसेप्शन, डायव्हर्शन आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यांचा समावेश आहे.  हे प्रकल्प अनेक ठिकाणी गंगा नदीत सांडपाणी सोडण्यापूर्वी त्यावरील प्रक्रिया सुनिश्चित करतील, नदीच्या स्वच्छतेला चालना देतील आणि प्रदेशातील लोकांना फायदा पोहचवतील.

पंतप्रधानांच्या हस्ते पटना येथे युनिटी मॉलची पायाभरणी करण्यात  येणार आहे.  200 कोटी रुपयांहून खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची कल्पना आंतरराष्ट्रीय डिझाइन पद्धती, तंत्रज्ञान, आराम आणि सौंदर्यशास्त्र यांचा समावेश असलेली अत्याधुनिक सुविधा म्हणून करण्यात आली आहे. या मॉलमध्ये राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्यांना समर्पित जागा प्रदान करण्यात  येणार असून या जागेत ते ते विभाग आपली अद्वितीय उत्पादने आणि कारागिरीचे प्रदर्शन करु शकतात. या मॉलमध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 36 मोठे स्टॉल्स तर बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यासाठी 38 छोटे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. हा युनिटी मॉल स्थानिक उत्पादने तसेच ‘एक जिल्हा एक उत्पादन’, भौगोलिक निर्देशक (GI) उत्पादने यासोबतच बिहार आणि भारतातील हस्तकला उत्पादनांना प्रोत्साहन देईल.  हा प्रकल्प रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास आणि राज्यातून होणारी निर्यात या दृष्टीने महत्त्वपूर्ण सामाजिक आणि आर्थिक फायदा मिळवून देणारा आहे.

या कार्यक्रमात पंतप्रधान बिहार मधील तीन रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यामध्ये, पाटलीपुत्र ते पहलेजा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या प्रकल्प;  बंधुआ - पायमार दरम्यान 26 किमी लांबीचा नवीन रेल्वे मार्ग;  तसेच गया येथील एक मेमू शेड, यांचा समावेश आहे.आरा बायपास रेल्वे मार्गाची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. या रेल्वे प्रकल्पांमुळे उत्तम रेल्वे संपर्क सुविधा, वाहतूक क्षमता आणि गाड्यांची गतिशीलता सुधारेल तसेच या प्रदेशातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल.

बेगुसराय येथील सार्वजनिक कार्यक्रमात देशातील ऊर्जा क्षेत्राला लक्षणीय चालना मिळेल. पंतप्रधान सुमारे 1.48 लाख कोटी रुपयांच्या अनेक तेल आणि वायू प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. केजी बेसिन अर्थात कृष्णा गोदावरी खोऱ्यासह बिहार, हरियाणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आणि कर्नाटक अशा देशभरातील विविध राज्यांमध्ये या प्रकल्पांची व्याप्ती आहे.

पंतप्रधान कृष्णा गोदावरी खोऱ्यामधील ‘पहिले तेल’ राष्ट्राला समर्पित करतील आणि ओएनजीसी कृष्णा गोदावरी खोल पाण्याच्या प्रकल्पातून पहिल्या कच्च्या तेलाच्या टँकरला हिरवा झेंडा दाखवतील. केजी खोऱ्यातून ‘पहिले तेल’ उत्खनन ही भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी आहे, ज्यामुळे ऊर्जा आयातीवरील आपले अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होईल. ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक लवचिकता वाढवण्याचे आश्वासन देणारा हा प्रकल्प म्हणजे भारताच्या ऊर्जा क्षेत्रात एका नव्या युगाची नांदी होय.

बिहारमध्ये सुमारे 14,000 कोटी रुपयांचे तेल आणि वायू क्षेत्रातील प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. यामध्ये 11,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्प खर्चाच्या बरौनी रिफायनरीच्या विस्ताराची पायाभरणी तसेच बरौनी रिफायनरीच्या ग्रिड पायाभूत सुविधा; पारादीप – हल्दिया – दुर्गापूर एलपीजी पाइपलाइनचा पाटणा आणि मुझफ्फरपूर पर्यंत विस्तार यासारख्या प्रकल्पांच्या उद्‌घाटनाचा समावेश आहे.

देशभरात हाती घेतलेल्या इतर महत्त्वाच्या तेल आणि वायू प्रकल्पांमध्ये हरियाणातील पानिपत रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल संकुल विस्तार; पानिपत रिफायनरीत 3G इथेनॉल संयंत्र आणि कॅटॅलिस्ट संयंत्र; आंध्र प्रदेशातील विशाख रिफायनरी आधुनिकीकरण प्रकल्प (व्हीआरएमपी); सिटी गॅस वितरण नेटवर्क प्रकल्प, पंजाबमधील फाजिल्का, गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यांचा समावेश आहे; गुलबर्गा कर्नाटक येथे नवीन पीओएल डेपो, महाराष्ट्रातील मुंबई उच्च उत्तर पुनर्विकास टप्पा -IV समाविष्ट आहे. आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम मधील भारतीय पेट्रोलियम आणि ऊर्जा संस्थेची (आयआयपीई) पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होईल.

पंतप्रधान बरौनी येथे हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड (HURL) या खत प्रकल्पाचे उद्घाटन करतील. 9500 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून विकसित केलेला हा प्रकल्प शेतकऱ्यांना परवडणारा युरिया देईल आणि त्यांच्या उत्पादकतेत आणि आर्थिक स्थैर्यात वाढ करेल. देशात पुनरुज्जीवित होणारा हा चौथा खत प्रकल्प आहे.

पंतप्रधान सुमारे 3917 कोटी रुपयांच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यामध्ये राघोपूर-फोर्ब्सगंज गेज परिवर्तन प्रकल्प; मुकुरिया-कटिहार-कुमेदपूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण; बरौनी-बछवाडा तिसऱ्या आणि चौथ्या मार्गासाठी प्रकल्प, कटिहार-जोगबनी रेल्वे विभागाचे विद्युतीकरण यासारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे प्रवास अधिक सुलभ होईल आणि प्रदेशाचा सामाजिक आर्थिक विकास होईल.

दानापूर-जोगबनी एक्सप्रेस (दरभंगा-साक्री मार्गे); जोगबनी- सहरसा एक्सप्रेस; सोनपूर-वैशाली एक्स्प्रेस; आणि जोगबनी- सिलीगुडी एक्सप्रेस यासह चार गाडयांना पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील.

पंतप्रधान देशातील पशुधनाचा डिजिटल डेटाबेस ‘भारत पशुधन’ देशाला समर्पित करतील. राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानांतर्गत (एनएलडीएम) विकसित केलेले, ‘भारत पशुधन’ प्रत्येक पशुधनाला दिलेल्या 12-अंकी टॅग आयडीचा वापर करते. प्रकल्पांतर्गत, अंदाजे 30.5 कोटी गोजातीय प्राण्यांपैकी सुमारे 29.6 कोटी आधीच टॅग केले गेले आहेत आणि त्यांचे तपशील डेटाबेसमध्ये उपलब्ध आहेत. ‘भारत पशुधन’ गोवंशांसाठी शोध प्रणाली प्रदान करून शेतकऱ्यांना सक्षम करेल आणि रोग तपासणी आणि नियंत्रणातही मदत करेल.

पंतप्रधान ‘1962 फार्मर्स ॲप’ चे देखील उद्‌घाटन करतील. हे ॲप ‘भारत पशुधन’ डेटाबेस अंतर्गत उपलब्ध सर्व डेटा आणि माहितीची नोंद ठेवेल, ज्याचा वापर शेतकरी करू शकतात.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s Space Sector: A Transformational Year Ahead in 2025

Media Coverage

India’s Space Sector: A Transformational Year Ahead in 2025
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 डिसेंबर 2024
December 24, 2024

Citizens appreciate PM Modi’s Vision of Transforming India