पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 24 एप्रिल 2022 रोजी सकाळी साडेअकरा वाजता जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय पंचायती राज सोहोळ्यात सहभागी होण्यासाठी जम्मू-काश्मीरला भेट देणार आहेत. तसेच ते देशभरातील ग्रामसभांना देखील संबोधित करणार आहेत. ते सांबा जिल्ह्यातील पल्ली पंचायतीच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान सुमारे 20,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासविषयक उपक्रमांचे उद्घाटन करून कोनशीला बसवतील. पंतप्रधान या वेळी अमृत सरोवर उपक्रमाची सुरुवात देखील करणार आहेत. त्यानंतर, संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ते मुंबई येथे होणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहोळ्याला उपस्थित राहतील. या सोहोळ्यात मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
पंतप्रधानांचे जम्मू-काश्मीरमधील कार्यक्रम
ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीरच्या संदर्भात घटनात्मक सुधारणा केल्यापासून केंद्र सरकारने तेथील प्रशासनात लक्षणीय सुधारणा घडवून आणण्यावर आणि त्या भागातील जनतेचे जीवन अभूतपूर्व वेगाने सुकर करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधानांच्या या भेटीदरम्यान ज्या प्रकल्पांचे उद्घाटन होत आहे आणि ज्यांची कोनशीला बसवली जात आहे त्या प्रकल्पांच्या पूर्ततेनंतर या भागातील जनतेसाठी मुलभूत सुविधा, येण्याजाण्यातील सुलभता आणि पायाभूत सुविधांचा विकास अशा सोयींची तरतूद होणार आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी बनिहाल-काझीगुंड रस्त्यावरील बोगद्याचे उद्घाटन होणार आहे. सुमारे 3100 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या 8.45 किलोमीटर लांबीच्या बोगद्यामुळे, बनिहाल आणि काझीगुंड या गावांमधील प्रवास 16 किलोमीटरने कमी होणार आहे आणि त्यामुळे या प्रवासाला लागणारा वेळ देखील सुमारे दीड तासाने कमी होईल. हा ट्वीन ट्यूब प्रकारचा बोगदा असून, दोन्ही जुळे बोगदे एकमेकांविरुद्ध दिशेने एकदिशा वाहतूक करतील. देखभालीची कामे आणि बोगद्यातील प्रवाशांची आपत्कालीन सुटका करण्याच्या हेतूने दर 500 मीटरवर हे दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडण्यात आले आहेत. हा बोगदा जम्मू आणि काश्मीर यांच्या दरम्यान सर्व ऋतुंमध्ये संपर्क अखंडितपणे सुरु ठेवेल आणि या दोन्ही भागांमधील प्रवासाचे अंतर कमी करून त्यांना एकमेकांजवळ आणेल.
पंतप्रधान उद्या दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती महामार्गावरील 7500 कोटी रुपये खर्चाच्या तीन रस्त्यांच्या पॅकेजची कोनशीला बसवतील. दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती महामार्गावरील नियंत्रित 4/6 मार्गिकांच्या उभारणीसाठी पुढील भागात काम होणार आहे : राष्ट्रीय महामार्ग क्र.44 वरील बल्सुना ते गुराहा, बैलडारन, हिरानगर, गुऱ्हा बैलडारन, हिरानगर ते जाख, विजयपूर आणि जाख, विजयपूर ते कुंजवाणी, जम्मू आणि जम्मू विमानतळाशी उत्तम जोडणी.
यावेळी रत्ले आणि क्वार जलविद्युत प्रकल्पांची कोनशीला पंतप्रधानांच्या हस्ते बसवली जाणार आहे. किश्तवाड जिल्ह्यात चिनाब नदीवर सुमारे 5300 कोटी रुपयांच्या खर्चातून हा 850 मेगावॉटचा रत्ले जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार आहे. किश्तवाड जिल्ह्यात चिनाब नदीवर क्वार जलविद्युत प्रकल्प देखील उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता 540 मेगावॉट असून या प्रकल्पासाठी 4500 कोटी रुपयांहून अधिक खर्च येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे या भागातील विजेची मागणी पूर्ण करण्यास मदत होणार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये जनौषधी केंद्रांचे जाळे अधिक विस्तारण्यासाठी आणि तेथील नागरिकांना उत्तम दर्जाची जेनेरिक औषधे किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यासाठी, अशा 100 केंद्रांचे परिचालन सुरु करण्यात आले आहे. या केंद्रांचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ही केंद्रे जम्मू-काश्मीरच्या दुर्गम कानाकोपऱ्यात उभारण्यात आली आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान पल्ली येथील ग्रामपंचायतीला देशातील सर्वात पहिल्या कार्बन-न्यूट्रल पंचायतीचा दर्जा मिळवून देणाऱ्या 500 किलोवॉट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन देखील करणार आहेत.
पंतप्रधान मोदी स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या स्वामित्व कार्डांचे वितरण देखील करणार आहेत. देशातील पंचायतींनी विविध श्रेणींमध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल विजेत्या ठरलेल्या ग्रामपंचायतींच्या बक्षिसाच्या रकमेचे हस्तांतरण देखील राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते केले जाणार आहे. जम्मू-काश्मीरच्या ग्रामीण वारशाचे दर्शन घडविणाऱ्या आयएनटीएसीएच फोटो दालनाला तसेच नोकिया स्मार्टपूर या भारतातील आदर्श स्मार्ट गावांच्या उभारणीसाठी ग्रामीण उद्योजकतेवर आधारित गावाचा नमुना असलेल्या गावाला देखील पंतप्रधान भेट देणार आहेत.
अमृत सरोवर
जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन सुनिश्चित करण्यासाठी या जम्मू-काश्मीर भेटीदरम्यान पंतप्रधान अमृत सरोवर नावाच्या नव्या उपक्रमाची सुरुवात करणार आहेत. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात 75 जलसाठे विकसित आणि पुनर्जीवित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर सुरु असलेल्या अभियानाच्या सन्मानार्थ केंद्र सरकारने हा आणखी एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे.
पंतप्रधानांची मुंबई भेट
पंतप्रधान उद्या संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुंबई येथे होणाऱ्या मास्टर दीननाथ मंगेशकर पुरस्कार सोहोळ्याला उपस्थित राहतील. या सोहोळ्यात मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ सुरु करण्यात आलेला हा पुरस्कार यापुढे दर वर्षी राष्ट्र उभारणीमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या एका व्यक्तीला दिला जाणार आहे.