पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 मार्च 2024 रोजी हरयाणात गुरूग्रामला भेट देणार आहेत. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान एक लाख कोटी रुपये खर्चाच्या विविध राज्यांमधून जाणाऱ्या 112 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.
महामार्ग क्रमांक 48 वरील दिल्ली आणि गुरुग्राम मधल्या पट्ट्यात वाहतुकीचा वेग वाढून या ठिकाणची वाहतुकीची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान द्वारका महामार्गाच्या मुख्य ठिकाणाच्या हरयाणा क्षेत्राचे उद्घाटन करतील. द्वारका महामार्गावरील हरयाणा क्षेत्राचा हा 19 किलोमीटर लांबीचा आठ पदरी रस्ता सुमारे 4,100 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला असून यात 10.2 किलोमीटर लांबीच्या दिल्ली हरयाणा सीमारेषा ते बसई रेल्वे उड्डाण पुल (ROB) तसेच 8.7 किलोमीटर लांबीच्या बसई रेल्वे उड्डाणपुल ते खेरकी डौला अशा दोन संकुलांचा समावेश आहे. यामुळे दिल्लीतील आय जी आय विमानतळ आणि गुरूग्राम जोड रस्त्यापर्यंत थेट दळणवळण व्यवस्था होणार आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार असलेल्या इतर महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये 9.6 किलोमीटर लांबीचा सहा पदरी नागरी विस्तारित रस्ता-II (UER-II) याचा, नांगलोई-नजाफगड मार्ग ते दिल्लीच्या द्वारका क्षेत्राचा सेक्टर 24 च्या 3 संकुलांचा, उत्तर प्रदेशातल्या सुमारे 4,600 कोटी रुपये खर्चाच्या लखनौ वर्तुळाकार मार्गाच्या 3 संकुलांचा, आंध्र प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 च्या 2,950 कोटी रुपये खर्चाच्या आनंदपुरम, पेंडूर्थी, अनाकपल्ली क्षेत्रांचा, हिमाचल प्रदेशातील 3,400 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 21 (2 संकुले) वरील किरातपुर ते नेरचौक क्षेत्राचा, कर्नाटकातल्या 2,750 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या दोबासपेट-हेस्कोट क्षेत्र (2 संकुले) यांच्यासह देशभरातल्या विविध राज्यांमध्ये सुमारे 20,500 कोटी रुपये खर्च करून बांधकाम केलेल्या इतर 42 प्रकल्पांचा समावेश आहे.
पंतप्रधान यावेळी देशभरातल्या विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचीही पायाभरणी करणार आहेत. यातील पायाभरणी करण्यात येणाऱ्या मुख्य प्रकल्पांमध्ये आंध्र प्रदेशातील 14,000 कोटी रुपये खर्च करून बांधकाम केलेल्या बेंगळूरू- कडप्पा- विजयवाडा महामार्गाच्या 14 संकुलांचा, कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 748A वरील 8,000 कोटी रुपये खर्चाच्या हुनगुंद -रायचुर क्षेत्राच्या सहा संकुलांचा, हरयाणातल्या शामली अंबाला महामार्गावरील 4,900 कोटी रुपये खर्चाच्या तीन संकुलांचा, पंजाबातील 3,800 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या अमृतसर-भटिंडा कॉरिडोरच्या दोन संकुलांचा, याशिवाय देशभरातल्या विविध राज्यांमधल्या 32 हजार 700 कोटी रुपये खर्चाच्या 39 इतर प्रकल्पांचा समावेश आहे.
या प्रकल्पांमुळे राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्यांचा विस्तार होण्यास लक्षणीय योगदान लाभणार असून यामुळे सामाजिक-आर्थिक विकासालाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे, तसेच यामुळे रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होणार असून देशभर व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राच्या वाढीला हातभार लागणार आहे.