पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत गुजरातला भेट देणार आहेत आणि त्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेशला देणार आहेत.
9 ऑक्टोबर रोजी, संध्याकाळी 5:30 वाजता, पंतप्रधानांच्या हस्ते मेहसाणामधील मोढेरा येथे अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. त्यानंतर मोधेश्वरी माता मंदिर येथे संध्याकाळी 6:45वाजता देवीचे दर्शन घेऊन पूजा अर्चना करतील. त्यानंतर साडे सात वाजता सूर्य मंदिराला भेट देतील.
10 ऑक्टोबर रोजी, सकाळी 11 वाजता, पंतप्रधान भरूचमधील आमोद येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन करतील आणि काही प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. मोदी शैक्षणिक संकुलाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. त्यानंतर, संध्याकाळी 5:30 वाजता, पंतप्रधान जामनगर येथे प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील.
11 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:15 वाजता, पंतप्रधान अहमदाबाद मधील असरवा येथील शासकीय रुग्णालयातील प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील. त्यानंतर ते संध्याकाळी 5:45 वाजता उज्जैनमधील श्री महाकालेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतील आणि पूजा करतील. यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता श्री महाकाल लोकचे राष्ट्रार्पण करतील आणि त्यानंतर संध्याकाळी 7:15 वाजता उज्जैनमध्ये सार्वजनिक कार्यक्रम होईल.
मेहसाणा येथील पंतप्रधानांचा कार्यक्रम
पंतप्रधान मेहसाणा येथील मोढेरा येथे एका जाहीर सभेत 3900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान, मोढेरा या गावाला भारतातील पहिले 24x7 सौरऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित करतील. सूर्य मंदिर असलेल्या मोढेरा या शहराला संपूर्णपणे सौरऊर्जेने उजळून टाकण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाची साक्ष देणारा हा प्रकल्प एकमेवाद्वितीय असा आहे. यामध्ये ग्राउंड माउंटेड सौर ऊर्जा प्रकल्प आणि निवासी तसेच सरकारी इमारतींवर 1300 रूफटॉप सोलर सिस्टीम विकसित करणे यांचा समावेश आहे, सर्व बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (BESS) सह एकत्रित केले आहे. भारतातील अक्षय ऊर्जेची शक्ती वंचितांना देखील सक्षम करू शकते, याची ग्वाही या प्रकल्पातून दिली जात आहे. पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित केल्या जाणाऱ्या प्रकल्पांमध्ये अहमदाबाद-मेहसाणा गेज रूपांतरण प्रकल्पाच्या साबरमती-जगुदान विभागाचे गेज रूपांतरण, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाचा नंदासन भूवैज्ञानिक तेल उत्पादन प्रकल्प; खेरवा ते शिंगोडा तलावापर्यंत सुजलाम सुफलाम कालवा; धरोई धरण आधारित वडनगर खेरालू आणि धरोई गट सुधारणा योजना; बेचराजी मोढेरा-चाणस्मा राज्य महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रकल्प; उंजा-दासज उपेरा लाडोळ (भांखर अॅप्रोच रोड) या भागाचा विस्तार करण्याचा प्रकल्प; प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राची नवीन इमारत, मेहसाणा येथे सरदार पटेल सार्वजनिक प्रशासन संस्था (SPIPA) आणि मोढेरा येथील सूर्य मंदिरातील प्रोजेक्शन मॅपिंग, इत्यादींचा समावेश आहे.
पंतप्रधान अनेक प्रकल्पांची पायाभरणी देखील करणार असून त्यामध्ये पाटण ते गोझरिया या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-68 च्या एका विभागाच्या चौपदरीकरणाचा समावेश आहे; याशिवार मेहसाणा जिल्ह्यातील जोटना तालुक्यातील चालसन गावात जलशुद्धीकरण केंद्र; नवीन स्वयंचलित दूधभुकटी संयंत्र आणि दूधसागर डेअरी येथे UHT दुधाचे कार्टन संयंत्र ; मेहसाणा येथील सामान्य रुग्णालय पुनर्विकास आणि पुनर्बांधणी; मेहसाणा आणि उत्तर गुजरातमधील इतर जिल्ह्यांसाठी सुधारित वितरण क्षेत्र योजना (RDSS) यांचा समावेश आहे.
सार्वजनिक कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोढेश्वरी माता मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. त्यानंतर सूर्य मंदिरालाही भेट देतील जिथे ते नयनरम्य अशा प्रोजेक्शन मॅपिंग शो चा अनुभव घेतील.
भरूच येथील पंतप्रधानांचा कार्यक्रम
पंतप्रधान भरुचमध्ये 8000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील. औषधनिर्माण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल ठरेल अशा बल्क ड्रग पार्कची पायाभरणी जंबुसर येथे पंतप्रधानांच्या हस्ते होईल. 2021-22 मध्ये, औषधनिर्माण क्षेत्रातील एकूण आयातीपैकी 60% पेक्षा जास्त वाटा औषधांचा होता. आयातीला पर्याय म्हणून आणि औषध निर्मितीमध्ये भारताला मोठ्या प्रमाणात स्वावलंबी बनवण्यात हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल. पंतप्रधान यावेळी दहेज येथे खोल समुद्रातून जाणाऱ्या वाहिनीच्या प्रकल्पाचे देखील उद्घाटन करतील, ही वाहिनी औद्योगिक विभागात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वाहून नेण्यास मदत करेल. अंकलेश्वर विमानतळ उभारणीचा पहिला टप्पा आणि या भागातील एमएसएमई उद्योगांना चालना देणाऱ्या अंकलेश्वर तसेच पानोली येथील बहुस्तरीय औद्योगिक शेड्सची उभारणी अशा इतर प्रकल्पांची कोनशीला देखील पंतप्रधानांच्या हस्ते रचली जाईल.
या भेटीदरम्यान, विविध औद्योगिक पार्क्सच्या विकासकामांचा भूमिपूजन समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये, वालिया (भरुच), अमिरगढ(बनासकांठा), चकालिया(दाहोद) आणि वनार(छोटा उदयपुर) अशा चार ठिकाणी आदिवासी औद्योगिक पार्क्स; मुदेठा(बनासकांठा) येथे कृषी खाद्यान्न पार्क;काकवडी दांती (बलसाड) येथे सागरी खाद्यान्न उत्पादन पार्क आणि खांडीवाव(महिसागर)येथे एमएसएमई पार्क यांच्या उभारणीचा समावेश आहे
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान रसायन निर्मिती क्षेत्राला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. दहेज येथे सुमारे 800 टीपीडी कॉस्टिक सोडा निर्मिती क्षमता असलेल्या प्रकल्पासह 130 मेगावॉट उर्जेची सहनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान करतील. यासोबतच, दहेज येथे सध्या सुरु असलेल्या कॉस्टिक सोडा निर्मिती प्रकल्पाच्या विस्ताराच्या कामाचे देखील यावेळी लोकार्पण होईल. या प्रकल्पाच्या विद्यमान प्रतिदिन 785 दशलक्ष टन सोडा निर्मिती क्षमतेमध्ये वाढ करून ही निर्मिती क्षमता प्रतिदिन 1310दशलक्ष टन करण्यात आली आहे. दहेज येथे प्रतिवर्ष एक लाख दशलक्ष टन क्लोरोमिथेन उत्पादन करणाऱ्या प्रकल्पाचे देखील पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होईल.तसेच या कार्यक्रमात, हायड्राझीनहायड्रेटची आयात कमी करण्यासाठी तत्सम पर्यायी रसायन निर्मिती करणारा दहेज येथील प्रकल्प, आयओसीएल दहेज-कोयाली पाईपलाईनप्रकल्प, भरुच येथे जमिनीखालील सांडपाणी निचरा आणि एसटीपी कार्य तसेच उमल्ला आसा पानेठा रस्त्याचे रुंदीकरण तसेच मजबुतीकरण या प्रकल्पांचे लोकार्पण देखील पंतप्रधान यावेळी करतील.
पंतप्रधानांची अहमदाबाद भेट
पंतप्रधान येत्या सोमवारी, 10 ऑक्टोबर रोजी, गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय करणाऱ्या मोदी शैक्षणिक संकुलाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचे उद्घाटन करतील. या प्रकल्पात विद्यार्थ्यांच्या समग्र विकासासाठी आवश्यक सुविधांची तरतूद असेल.
11 ऑक्टोबर रोजी, पंतप्रधानांच्या हस्ते,अहमदाबाद येथील आसरवा नागरी रुग्णालयात सुमारे 1300 कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्य सुविधा उभारणीच्या कामाची कोनशीला रचली जाईल. या प्रकल्पात, युएन मेहता कार्डीयोलॉजी आणि संशोधन केंद्रातील हृदयरोग विभागात नव्या आणि सुधारित सुविधा उभारणे तसेच या केंद्राच्या वसतिगृहाची नवी इमारत; मूत्रपिंडाचे आजार आणि संशोधन संस्थेची नवी रुग्णालय इमारत आणि गुजरात कर्करोग उपचार आणि संशोधन संस्थेच्या नव्या इमारतीची उभारणी या कामांचा समावेश आहे. गरीब रुग्णांसोबत येणाऱ्या कुटुंबियांची सोय करण्यासाठी निवास व्यवस्थेच्या कामाची कोनशिला देखील पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी ठेवली जाईल.
पंतप्रधानांची जामनगर भेट
पंतप्रधान जामनगर येथे अंदाजे 1450 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण करून या कामांची कोनशिला ठेवतील. हे प्रकल्प सिंचन, विद्युत पुरवठा, पाणीपुरवठा तसेच शहरी पायाभूत सुविधा या विषयांशी संबंधित आहेत.
पंतप्रधान यावेळी, सौराष्ट्र अवतारण सिंचन (एसएयूएनआय) योजनेतील तिसरी जोडणी (उंड धरणापासून सोनमती धरणापर्यंत) कार्याचे पॅकेज 7, एसएयूएनआय योजनेतील पहिली जोडणी (उंड-1 धरण ते सनी धरण) कार्याचे पॅकेज 5 आणि हरिपार येथील 40 मेगावॉट सौर पीव्ही प्रकल्प यांचे लोकार्पण करतील.
पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी पुढील प्रकल्पांची कोनशिला रचली जाणार आहे: जामनगर तालुक्यात कालवड गट संवर्धन पाणीपुरवठा योजना, मोरबी-मलिया-जोडिया गट संवर्धन पाणीपुरवठा योजना, लालपूर जंक्शन येथील उड्डाणपूल, हापा मार्केट यार्ड रेल्वे क्रॉसिंग आणि सांडपाणी संकलन करणारी पाईपलाईन तसेच पंपिंग स्टेशन यांचे नूतनीकरण.
पंतप्रधानांची उज्जैन भेट
पंतप्रधान उज्जैन येथे श्री महाकाल लोक कार्याचे राष्ट्रार्पण करतील. पहिल्या टप्प्यातील महाकाल लोक प्रकल्प कार्यामुळे मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंना जागतिक दर्जाच्या सुविधांचा पुरवठा करून त्यांना यात्रेचा अधिक समृध्द अनुभव देण्यात मदत होईल. मंदिराच्या संपूर्ण परिसरातील गर्दी कमी करणे तसेच या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या वारसा संरचनांचे जतन तसेच जीर्णोद्धार करण्यावर अधिक भर देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या संपूर्ण प्रकल्पाच्या कामाला सुमारे 850 कोटी रुपये खर्च येणार आहे. सद्यस्थितीला या मंदिरात दर वर्षी सुमारे दीड कोटी भाविक भेट देतात. प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यावर ही संख्या दुप्पट होईल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पाचे विकासकार्य दोन टप्प्यांमध्ये नियोजित करण्यात आले आहे.
महाकाल पथ या ठिकाणी 108 स्तंभ असून त्यावर भगवान शिवाच्या आनंद तांडव स्वरूपातील नृत्यमुद्रा कोरलेल्या आहेत.महाकाल पथाच्या आजूबाजूला भगवान शंकर यांच्या जीवनाचे दर्शन घडविणाऱ्या विविध धार्मिक शिल्पांची उभारणी करण्यात आली आहे. या मार्गालगत उभारलेल्या भिंतीवर विश्वाची निर्मिती, गणेश जन्म, सती आणि दक्षा यांच्या कहाण्या इत्यादी शिव पुराणातील कथा सांगणारी भित्तीचित्रे आहेत. अडीच हेक्टरवर पसरलेल्या या संकुलाच्या चहुबाजूंना कमळाचे तलाव आहेत आणि त्यात शंकराच्या शिल्पासह कारंजे देखील बसविण्यात आले आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान तसेच सर्व्हेलन्स कॅमेऱ्यांच्या मदतीने एकात्मिक आदेश तसेच नियंत्रण केंद्रांद्वारे या संपूर्ण परिसरावर अहोरात्र लक्ष ठेवण्यात येणार आहे.