





पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 आणि 30 सप्टेंबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान सुरत येथे 3400 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील. त्यानंतर पंतप्रधान भावनगरला रवाना होतील. भावनगरमध्ये दुपारी दोन वाजताच्या सुमाराला ते 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. त्यानंतर, संध्याकाळी सातच्या सुमाराला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंतप्रधानांच्या हस्ते 36 व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेचे उद्घाटन होईल. रात्री नऊच्या सुमाराला पंतप्रधान अहमदाबादच्या जीएमडीसी मैदानात आयोजित नवरात्रोत्सवाला उपस्थित राहतील.
दुसऱ्या दिवशी, 30 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता पंतप्रधान, गांधीनगर रेल्वे स्थानकावर गांधीनगर - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील आणि तिथून कालुपूर रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वेने प्रवास करतील. सकाळी 11:30 च्या सुमाराला पंतप्रधान अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवतील आणि कालुपूर स्टेशनपासून दूरदर्शन केंद्र मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास करतील. दुपारी बाराच्या सुमाराला पंतप्रधान अहमदाबादमधील अहमदाबाद एज्युकेशन सोसायटी येथे आयोजित कार्यक्रमात अहमदाबाद मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील. त्यानंतर, संध्याकाळी पावणेसहाच्या सुमाराला पंतप्रधान अंबाजी येथे 7200 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण करतील. संध्याकाळी सात वाजता पंतप्रधान अंबाजी मंदिरात दर्शन घेऊन पुजा करतील. त्यानंतर सायंकाळी पावणेआठच्या सुमाराला ते गब्बर तीर्थ येथे महाआरतीला उपस्थित राहतील.
या बहुविध विकास प्रकल्पांवरून, देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी, शहरातील दळणवळणसंबंधी सुविधा वाढविण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी पंतप्रधानांची वचनबद्धता अधोरेखित होते. सर्वसामान्य माणसाचे राहणीमान सुधारण्यावर मोदी सरकारने सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे.
पंतप्रधान सुरतमध्ये
सुरत येथे पंतप्रधान 3400 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील. या प्रकल्पांमध्ये पाणीपुरवठा, मलनिस्सारण प्रकल्प, ड्रीम सिटी, जैवविविधता उद्यान आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा, वारसा स्थळांचा जीर्णोद्धार, सिटी बस / बीआरटीएस पायाभूत सुविधा, इलेक्ट्रिक वाहनांसाठी पायाभूत सुविधा तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विकास कामांचा समावेश आहे.
रस्ते संबंधी पायाभूत सुविधांच्या कामांच्या पहिल्या टप्प्याचे तसेच डायमंड रिसर्च अँड मर्केंटाइल – DREAM - ड्रीम सिटीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. सुरतमधील हिरे व्यापार व्यवसायाच्या जलद वाढीला पूरक म्हणून, व्यावसायिक आणि निवासी जागेची वाढती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून हा ड्रीम सिटी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.
सुरतमध्ये, डॉ. हेडगेवार पूल ते भीमरड - बामरोली पुलापर्यंत 87 हेक्टर जागेत उभारल्या जाणाऱ्या जैवविविधता उद्यानाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. त्याचबरोबर सुरत येथील विज्ञान केंद्रातील खोज या संग्रहालयाचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. लहान मुलांसाठी तयार केलेल्या या संग्रहालयात परस्परसंवादी प्रदर्शनाबरोबरच प्रश्नांवर आधारित उपक्रम तसेच आणि मुलांची जिज्ञासू वृत्ती लक्षात घेत संशोधनाला प्रवृत्त करणाऱ्या उपक्रमांचा समावेश असेल.
पंतप्रधान भावनगरमध्ये
भावनगरमध्ये पंतप्रधान 5200 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. भावनगर येथे, जगातील पहिल्या सीएनजी टर्मिनल आणि ब्राउनफिल्ड बंदराची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होईल. 4000 कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम खर्चून या बंदराचा विकास केला जाणार आहे. जगातील पहिल्या सीएनजी टर्मिनलसाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांची तरतूद करण्यात येत असून जगातील चौथ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या लॉक गेट यंत्रणा येथे असतील. सीएनजी टर्मिनल बरोबरच हे बंदर भविष्यातील गरजा आणि विविध आगामी प्रकल्पांच्या मागणीची पूर्तता करण्याच्या दृष्टीनेही सक्षम आहे. या बंदरात अत्याधुनिक कंटेनर टर्मिनल, बहुउद्देशीय टर्मिनल आणि लिक्विड टर्मिनल असतील आणि हे टर्मिनल्स, सध्याच्या रस्ते आणि रेल्वे जाळ्याशी थेट जोडलेले असतील. यामुळे मालवाहतुकीच्या खर्चात बचत होऊन आर्थिक फायदा तर होईलच, आणि त्याचबरोबर स्थानिक लोकांसाठी रोजगारही निर्माण होईल. या सीएनजी आयात टर्मिनलच्या माध्यमातून स्वच्छ ऊर्जेच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी ऊर्जेचा अतिरिक्त पर्यायी स्रोत प्रदान होईल.
भावनगरमधील प्रादेशिक विज्ञान केंद्राचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. सुमारे 200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले हे विज्ञान केंद्र, 20 एकरपेक्षा क्षेत्रावर उभारण्यात आले आहे. या केंद्रामध्ये सागरी जलचर दालन, ऑटोमोबाईल दालन, नोबेल पारितोषिक दालन – शरीरविज्ञानशास्त्र आणि वैद्यकीय, विद्युत अभियांत्रिकी दालन, जीवशास्त्र दालन अशा विविध संकल्पनांवर आधारित दालने आहेत. त्याचबरोबर मुलांच्या संशोधन वृत्तीला खतपाणी घालण्यासाठी विज्ञानाधारित संकल्पनांवर आधारित टॉय ट्रेन, निसर्गातील भटकंती, अॅनिमॅट्रॉनिक डायनासोर, मोशन सिम्युलेटर, पोर्टेबल सोलर ऑब्झर्व्हेटरी अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान इतरही अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करतील. त्यात सौनी योजना लिंक 2 च्या पॅकेज 7 बरोबर 25 मेगावॅट क्षमतेचा पलिताना सौर प्रकल्प तसेच एपीपीएल कंटेनर (आवाडकृपा प्लास्टोमेक प्रायव्हेट लिमिटेड) प्रकल्पाचा समावेश आहे. सौनी योजना लिंक 2 च्या पॅकेज 9 तसेच चोरवाडला झोन पाणी पुरवठा प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधान अहमदाबादमध्ये
अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित एका भव्य समारंभात पंतप्रधान, 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाची घोषणा करतील. या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशभरातील खेळाडूंनाही ते संबोधित करणार आहेत. देसर येथील जागतिक दर्जाच्या "स्वर्णिम गुजरात क्रीडा विद्यापीठ" चे उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे देशातील क्रीडा शिक्षणसंबंधी परिस्थितीत आमूलाग्र बदल अपेक्षित आहे.
गुजरात राज्यात पहिल्यांदाच राष्ट्रीय क्रीडास्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 29 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ही स्पर्धा होईल. स्पर्धेत एकूण 36 क्रीडा प्रकारांमध्ये देशभरातील सुमारे 15,000 खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकारी 36 क्रीडा शाखांमध्ये सहभागी होणार आहेत असून, ही आतापर्यंतची सर्वात मोठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठरणार आहे. गुजरातमधील अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, वडोदरा, राजकोट आणि भावनगर या सहा शहरांमध्ये या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरात राज्याने क्रीडासंबंधी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करायला सुरूवात केली होती, त्यामुळे राज्याला अतिशय कमी कालावधीत या स्पर्धेच्या आयोजनाची तयारी करणे शक्य झाले.
अहमदाबादमध्ये आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान अहमदाबाद मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील. या टप्प्यात अॅपेरल पार्क ते थलतेजपर्यंतचा पूर्व-पश्चिम कॉरिडॉर आणि मोटेरा ते ग्यासपूर दरम्यानच्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉरच्या सुमारे 32 किमी अंतराचा समावेश आहे. पूर्व-पश्चिम कॉरिडॉरमधील थलतेज-वस्त्रल मार्गावर 17 स्थानके आहेत. या कॉरिडॉरमध्ये चार स्थानकांचा समावेश असणाऱ्या 6.6 किमी लांबीच्या भूमिगत मार्गाचाही समावेश आहे. ग्यासपूर ते मोटेरा स्टेडियमला जोडणाऱ्या 19 किमी उत्तर-दक्षिण कॉरिडॉरमध्ये 15 स्थानके आहेत. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी 12,900 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. अहमदाबाद मेट्रो हा एक अत्याधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्प असून त्यात भूमिगत बोगदे, मार्ग आणि पूल, उंच आणि भूमिगत स्थानकांच्या इमारती, बॅलेस्टलेस रेल्वे रूळ आणि चालकरहित रेल्वे परिचालन सक्षम रोलिंग स्टॉक इत्यादी वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
मेट्रो ट्रेन या ऊर्जा कार्यक्षम प्रणालीने सुसज्ज असून त्यामुळे सुमारे 30-35% ऊर्जेची बचत अपेक्षित आहे. रेल्वेमध्ये अत्याधुनिक सस्पेन्शन यंत्रणा असून त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखद होतो. अहमदाबादच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनामुळे शहरातील लोकांना जागतिक दर्जाची प्रवास सुविधा उपलब्ध होईल. भारतीय रेल्वे आणि बस यंत्रणेसह (बीआरटीएस, जीएसआरटीसी आणि सिटी बस सेवा) बहुपर्यायी वाहतूक सुविधा प्रदान केली जात आहे. राणीप, वडज, एईसी स्टेशन अशा ठिकाणी बीआरटीएसद्वारे तर गांधीधाम, कालुपूर आणि साबरमती स्थानकावर भारतीय रेल्वेच्या माध्यमातून मेट्रो प्रवाशांना सोईस्कर ठरणारी वाहतुक सेवा उपलब्ध करून दिली जाते आहे. कालुपूर येथे हा मेट्रो मार्ग, मुंबई आणि अहमदाबादला जोडणाऱ्या अतिवेगवान रेल्वे यंत्रणेशी जोडला जाईल.
गांधीनगर आणि मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या नवीन आणि अद्ययावत आवृत्तीलाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. वंदे भारत एक्स्प्रेस ही गाडी उत्कृष्ट असून विमान प्रवासासारखा अनुभव देते. अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणांनी सुसज्ज असणाऱ्या या गाडीत रेल्वेगाड्यांची टक्कर टाळण्यासाठी कवच ही स्वदेशी विकसित यंत्रणा बसविण्यात आली आहे. सर्व वर्गांमध्ये आरामदायी आसने असून एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये 180 अंशात फिरणारी आसने, हे या गाडीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर गाडीच्या प्रत्येक डब्यामध्ये 32 इंचाच्या पटलांवरून प्रवासाची माहिती आणि तपशील प्रदर्शित केले जाणार आहेत.
पंतप्रधान अंबाजीमध्ये
अंबाजी येथे पंतप्रधान 7200 कोटी रूपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि पूर्ण झालेले प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 45,000 घरांची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. तरंगा टेकडी – अंबाजी – अबू रोड नवीन ब्रॉडगेज मार्गाची पायाभरणी आणि प्रसाद योजनेंतर्गत अंबाजी मंदिरातील तीर्थक्षेत्राच्या सुविधांच्या विकासकामांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या नवीन रेल्वेमार्गामुळे 51 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाजी या स्थानाला भेट देणाऱ्या लाखो भाविकांना फायदा होईल. डीसा एअरफोर्स स्टेशनवर धावपट्टीच्या बांधकामासह इतर पायाभूत सुविधा तसेच अंबाजी उपमार्गाची पायाभरणीसुद्धा पंतप्रधान करतील.
पश्चिम समर्पित मालवाहतुक मार्गिकेचा 62 किलोमीटर लांबीचा न्यू पालनपूर - न्यू महेसाणा विभाग आणि 13 किलोमीटर लांबीचा न्यू पालनपूर - नवी चातोदार विभागाचे (पालनपूर बायपास लाइन) लोकार्पणही पंतप्रधान करणार आहेत. या रस्त्यामुळे पिपावाव, दीनदयाळ बंदर प्राधिकरण (कांडला), मुंद्रा आणि गुजरातमधील इतर बंदरे सहजपणे जोडली जातील. हा मार्ग खुला झाल्यानंतर पश्चिम समर्पित मालवाहतुक मार्गिकेचा 734 किमी मार्ग पूर्णत्वाने कार्यान्वित होईल. गुजरातमधल्या मेहसाणा-पालनपूरमधील उद्योगांना, राजस्थानमधल्या स्वरूपगंज, केशवगंज, किशनगड मधील उद्योगांना तसेच हरियाणातील रेवाडी-मानेसर आणि नारनौल मधील उद्योगांना या मार्गाचा फायदा होईल. मिठा – थराड - डीसा रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबरच विविध रस्ते प्रकल्पांचे लोकार्पणही पंतप्रधान करणार आहेत.