




पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 आणि 28 ऑगस्ट रोजी गुजरातला भेट देणार आहेत. 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:30 वाजता पंतप्रधान अहमदाबादमधील साबरमती काठावर खादी उत्सवाला संबोधित करतील. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पंतप्रधान भुज येथील स्मृती वन स्मारकाचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास पंतप्रधान भुजमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. संध्याकाळी 5 वाजता, पंतप्रधान गांधीनगरमध्ये भारतातील सुझुकीला 40 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्ताने एका कार्यक्रमाला संबोधित करतील.
खादी उत्सव
खादी लोकप्रिय करणे, खादी उत्पादनांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि तरुणांमध्ये खादीच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा पंतप्रधानांचा सतत प्रयत्न असतो. पंतप्रधानांच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून, 2014 पासून, भारतात खादीच्या विक्रीत चार पट वाढ झाली आहे, तर गुजरातमध्ये खादीच्या विक्रीत आठ पटींनी लक्षणीय वाढ झाली आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित केलेल्या अशाच प्रकारच्या कार्यक्रमात, खादी उत्सवाचे आयोजन केले आहे. खादीला मानवंदना देणे आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्याचे महत्त्व सांगण्यासाठी हे आयोजन करण्यात येत आहे. हा उत्सव अहमदाबादमध्ये साबरमती नदीकिनारी आयोजित केला जाईल. गुजरातच्या विविध जिल्ह्यांतील 7500 महिला खादी कारागीर एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी चरख्यावर सूतकताई करतील. या कार्यक्रमात 1920 पासून वापरल्या जाणार्या विविध पिढ्यांमधील 22 चरख्यांचे "चरख्यांची उत्क्रांती" दर्शवणारे प्रदर्शन देखील असेल. त्यात स्वातंत्र्यलढ्यात वापरल्या जाणाऱ्या चरख्याचे प्रतीक असलेल्या “येरवडा चरखा” सारख्या चरख्यापासून ते आजच्या काळात वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक नवनवीन शोध आणि तंत्रज्ञान असलेल्या चरख्यांपर्यंतचा समावेश असेल. पोंडुरू खादीच्या उत्पादनाचे थेट प्रात्यक्षिकही दाखवले जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान गुजरात राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या नवीन कार्यालयाच्या इमारतीचे आणि साबरमती येथे एका पुलाचे उद्घाटन करतील.
भूजमध्ये पंतप्रधान
भूज जिल्ह्यातील स्मृती वन स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. पंतप्रधानांच्या अभिनव कल्पनेतून साकारण्यात आलेला हा एक स्मृती वनाचा प्रकल्प आहे. भूज येथे 2001 मध्ये झालेल्या भूकंपामध्ये प्राण गमवावे लागलेल्या सुमारे 13,000 लोकांच्या मृत्यनंतर लोकांनी जो संयमीपणा दाखवला, त्यांच्या भावनेला, धैर्याला, त्यांच्यातल्या चैतन्यशील वृत्तीला मानवंदना देण्यासाठी सुमारे 470 एकर परिसरामध्ये हे स्मृतीवन तयार करण्यात आले आहे. या स्मारकामध्ये भूकंपामध्ये प्राण गमावलेल्या लोकांची नावे नमूद करण्यात आली आहेत.
अत्याधुनिक स्मृती वन भूकंप संग्रहालय सात संकल्पनांच्या आधारावर उभारण्यात आले असून यामध्ये सात विभाग केले आहेत. रिबर्थ, रिडिस्कव्हर, रिस्टोअर, रिबिल्ड, रिथिंक, रिलीव्ह आणि रिन्यू म्हणजेच पुनर्जन्म, पुन्हा शोध घेणे, पुनर्संचय करणे, पुनर्बांधणी करणे, पुनर्विचार करणे, पुन्हा कार्य करणे आणि नूतनीकरण या सात संकल्पनांचे सात विभाग करण्यात आले आहेत. पहिल्या विभागामध्ये पुनर्जन्म ही संकल्पना असून त्यामध्ये पृथ्वीची उत्क्रांती आणि प्रत्येक संकटावर मात करण्याची पृथ्वीची क्षमता दर्शविली आहे. दुस-या विभागामध्ये गुजरातची स्थलाकृती आणि राज्याला अनेक नैसर्गिक आपत्तींचा धोका कसा आहे, हे दाखविण्यात आले आहे. तिस-या विभागामध्ये 2001 च्या भूकंपानंतरच्या घटना दर्शविल्या आहेत. यामधील दीर्घांमध्ये भूकंपाच्या संकटामध्ये ज्या लोकांनी व्यक्तिगत स्वरूपात आणि संस्थांनी केलेल्या मदत कार्याची माहिती देण्यात आली आहे. चौथ्या विभागामध्ये 2001च्या भूकंपानंतर गुजरातच्या पुनर्निर्माणाचे कार्य, उपक्रम आणि यशोगाथा दाखवण्यात आल्या आहेत. पाचव्या विभागामध्ये विविध प्रकारच्या आपत्तींची माहिती घेण्यासंदर्भात तसेच कोणत्याही संकटाच्यावेळी भविष्यात तयारी कशी करावी, याबद्दल विचार करण्यास आणि शिक्षण घेण्यास अतिथींना प्रवृत्त केले आहे. हा अनुभव 5 डी सिम्युलेटरमध्ये घेता येणार आहे. आणि त्यावेळी गणकयंत्रावर त्या घटनेची वास्तविक माहिती देण्यात येणार आहे. सातवा विभाग लोकांना स्मृती वाहण्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. तिथे लोक दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करू शकणार आहेत.
पंतप्रधान भूजमध्ये सुमारे 4400 कोटी रूपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. सरदार सरोवर प्रकल्पाच्या कच्छ शाखा कालव्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात येणार आहे. या कालव्याची लांबी सुमारे 357 किलोमीटर आहे. कालव्याच्या एका भागाचे उद्घाटन 2017 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते, आता यावेळी उर्वरित भागाचे उद्घाटन होणार आहे. या कालव्यामुळे कच्छ जिल्ह्यातल्या 10 शहरांमध्ये आणि 948 गावांमध्ये सिंचनाची सुविधा आणि पेयजल उपलब्ध होऊ शकणार आहे. यावेळी सरहद दुग्धालयाच्या नवीन स्वयंचलित दूध प्रक्रिया आणि पॅकिंग प्रकल्पासह इतर विविध प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. भूजच्या प्रादेशिक विज्ञान केंद्र, गांधीधाम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर, अंजार येथील वीर बाल स्माारक, नखतरणा येथे भूज -2 उपकेंद्र अशा जवळपास 1500 कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. यामध्ये भूज - भीमासर रस्त्याच्या कामाचाही समावेश आहे.
गांधीनगरमध्ये पंतप्रधान
सुझुकी कंपनीला भारतामध्ये येऊन 40 वर्ष झाली, यानिमित्त गांधीनगरच्या महात्मा मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान भारतातील सुझुकी समूहाच्या दोन प्रमुख प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. यामध्ये गुजरातमधील हंसलपूर येथे सुझुकी मोटार गुजरात इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीचे उत्पादन सुविधा निर्माण करीत आहे, त्याची पायाभरणी करण्यात येईल. तसेच हरियाणातल्या खरखोडा येथे मारूती सुझुकीच्या आगामी वाहन निर्मिती प्रकल्पाचा शिलान्यास करण्यात येणार आहे.
गुजरातमधल्या हंसलपूर येथे सुझुकी मोटार गुजरात इलेक्ट्रिक वाहन बॅटरी निर्मिती सुविधा तयार करण्यासाठी जवळपास 7300 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी अत्याधुनिक केमिस्ट्री सेल बॅटरी तयार करण्यात येणार आहेत. हरियाणातल्या खरखोडा इथल्या वाहन निर्मिती कारखान्याची प्रतिवर्षी 10 लाख प्रवासी वाहने तयार करण्याची क्षमता असणार आहे. यामुळे एकाच ठिकाणी सर्वात मोठी प्रवासी वाहन निर्मिती सुविधा असलेला हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 11,000 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.