पंतप्रधान नरेंद्र मोदी 26-27 सप्टेंबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. 27 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते, 'व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर सुमारे पाऊण वाजता पंतप्रधान बोडेली, छोटा उदयपूर येथे पोहोचणार आहेत. तिथे ते 5200 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत.
'व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेची' 20 वर्षे
'व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अहमदाबादमध्ये सायन्स सिटी येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात उद्योग संघटना, व्यापार-उदीम क्षेत्रातील नामवंत , तरुण उद्योजक, उच्च व तंत्रशिक्षण महाविद्यालयांचे विद्यार्थी, आणि इतर मान्यवर सहभागी होणार आहेत.
व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचा प्रारंभ 20 वर्षांपूर्वी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली झाला. 28 सप्टेंबर 2003 या दिवशी व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचा प्रवास सुरु झाला. कालानुक्रमे, त्याला खऱ्याखुऱ्या जागतिक कार्यक्रमाचे स्वरूप प्राप्त झाले आणि भारतातील सर्वात प्रमुख अशा व्यवसाय परिषदांमध्ये त्याने स्थान पटकावले. वर्ष 2003 मध्ये त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अंदाजे 300 तज्ज्ञांचा सहभाग होता. तर 2019 मध्ये सहभागाचे प्रमाण प्रचंड वाढून याच परिषदेने 135 देशांतील सहस्रावधी जणांना सामावून घेतले.
गेल्या 20 वर्षांत व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेने कात टाकली आहे. गुंतवणूक आकर्षित करण्याच्या दृष्टीने गुजरातला प्राधान्य मिळवून देण्याच्या उद्देशापासून सुरु झालेली ही परिषद, आता 'नवभारताला आकार देईपर्यंत पोहोचली आहे. 'व्हायब्रंट गुजरात' परिषदेचे अतुलनीय यश हे संपूर्ण देशासाठी आदर्श ठरले असून इतर राज्यांनाही त्यातूनच, अशाप्रकारच्या गुंतवणूक-प्रधान परिषदा भरवण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.
बोदेली, छोटा उदयपूर मध्ये पंतप्रधान
‘मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स’ या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान 4500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे काही प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील तर अनेक प्रकल्पांची पायाभरणी करणार असल्यामुळे संपूर्ण गुजरातमधील शालेय पायाभूत सुविधांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. यावेळी हजारो नवीन वर्गखोल्या, स्मार्ट क्लासरूम, संगणक प्रयोगशाळा, एसटीईएम (विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित) प्रयोगशाळा आणि गुजरातमधील शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या इतर पायाभूत सुविधा पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित केल्या जातील. या मिशन अंतर्गत गुजरात मधील शाळांच्या हजारो वर्गखोल्या सुधारण्यासाठी आणि त्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठीच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी देखील पंतप्रधान यावेळी करतील.
‘विद्या समीक्षा केंद्र 2.0’ या प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. हा प्रकल्प ‘विद्या समीक्षा केंद्राच्या’ यशाने प्रेरित होऊन उभारला जाणार आहे. या केंद्राने गुजरातमधील शाळांवर नियमित देखरेख आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिणामांमध्ये सुधारणा सुनिश्चित केली आहे. ‘विद्या समीक्षा केंद्र 2.0’’ प्रकल्पामुळे गुजरातमधील सर्व जिल्हे आणि ब्लॉकमध्ये विद्या समीक्षा केंद्रांची स्थापना करण्यात येईल.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान वडोदरा जिल्ह्यातील सिनोर तालुक्यात नर्मदा नदीवर‘ओदरा दाभोई-सिनोर-मालसर-आसा रस्त्यावर’ नव्याने बांधण्यात आलेल्या पुलासह, चाब तलाव पुनर्विकास प्रकल्प, दाहोदमधील पाणीपुरवठा प्रकल्प, वडोदरा येथे आर्थिक दुर्बल घटकांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या सुमारे 400 घरांचा प्रकल्प, गुजरातमधील 7500 गावांमधील ग्राम वाय-फाय प्रकल्प; आणि दाहोद येथे नव्याने बांधलेले जवाहर नवोदय विद्यालय असे अनेक प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील.
यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते छोटा उदयपूरच्या पाणीपुरवठा प्रकल्प, गोध्रा- पंचमहाल येथील उड्डाणपूल आणि केंद्र सरकारच्या ‘ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट (BIND)’ योजनेअंतर्गत दाहोद येथे उभारण्यात येणारा एफएम रेडिओ स्टुडिओ इत्यादी विकास कामांची पायाभरणी होणार आहे.