पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी गुजरातला भेट देणार आहेत. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:45 च्या सुमाराला ते बेट द्वारका मंदिरात पूजा करून दर्शन घेतील, त्यानंतर सकाळी 8:25 च्या सुमारास सुदर्शन सेतूला भेट देतील. सकाळी 9:30 च्या सुमाराला ते द्वारकाधीश मंदिराला भेट देतील.
दुपारी 1 च्या सुमाराला पंतप्रधान, द्वारकेत 4150 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील.
त्यानंतर दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान राजकोट येथील एम्सला भेट देतील. आणि दुपारी 4:30 वाजता, ते राजकोटमधील रेसकोर्स मैदानावर 48,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन तसेच राष्ट्र समर्पण करतील.
पंतप्रधानांचे द्वारका येथील कार्यक्रम
द्वारका येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे 980 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सुदर्शन सेतूचे लोकार्पण केले जाईल. ओखाचा मुख्य भूप्रदेश आणि बेट द्वारका यांना जोडणारा सुमारे 2.32 किलोमीटर लांबीचा हा देशातील सर्वात लांब केबल-स्टेड पूल आहे.
सुदर्शन सेतू ही एक अद्वितीय रचना आहे. या सेतूवर श्रीमद भगवद्गीतेतील श्लोक असणारा आणि दोन्ही बाजूंना भगवान कृष्णाच्या प्रतिमांनी सुशोभित केलेला पदपथ आहे. या पदपथाच्या वरच्या भागावर सौर पॅनल बसवलेले आहेत, जे एक मेगावॅट इतकी वीज निर्माण करु शकतात. या पुलामुळे वाहतूक सुरळीत होईल तसेच द्वारका आणि बेट-द्वारका दरम्यानच्या प्रवासासाठी भाविकांना लागणाऱ्या वेळेत लक्षणीय घट होईल. हा सेतू बांधण्यापूर्वी यात्रेकरूंना बेट द्वारकेला जाण्यासाठी बोटीच्या प्रवासावर अवलंबून राहावे लागत होते. हा अनोखा सेतू देवभूमी द्वारकेचे प्रमुख पर्यटन आकर्षण ठरणार आहे.
पंतप्रधान वाडीनार येथे एक पाइपलाइन प्रकल्प समर्पित करतील. या प्रकल्पात सध्याची किनारपट्टीवरील पाईप लाईन्स बदलणे, विद्यमान पाइपलाइन एंड मॅनिफोल्ड (एक उपसमुद्री रचना जी मुख्य पाईप लाईन आणि तिच्या शाखांदरम्यान जोड बिंदू म्हणून काम करते) सोडून देणे आणि संपूर्ण प्रणाली (पाइपलाइन, पीएलईएम आणि इंटरकनेक्टिंग लूप लाइन) जवळच्या नवीन ठिकाणी स्थानांतरित करणे या कामांचा समावेश आहे. पंतप्रधान राजकोट
- ओखा, राजकोट - जेतलसर - सोमनाथ आणि जेतलसर - वांसजालिया रेल्वे मार्ग विद्युतीकरण प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील.
याशिवाय, पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग - 927D च्या धोराजी - जामकंदोर्ना - कालावाड विभागाचा रुंदीकरण प्रकल्प, जामनगर येथील प्रादेशिक विज्ञान केंद्र, सिक्का थर्मल पॉवर स्टेशन, जामनगर येथे फ्लू गॅस डिसल्फरायझेशन (FGD) प्रणालीची स्थापना या प्रकल्पांचीही पायाभरणी केली जाणार आहे.
पंतप्रधानांचे राजकोट येथील कार्यक्रम
राजकोट येथील सार्वजनिक समारंभात पंतप्रधान, 48,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्राला समर्पण करतील. या प्रकल्पांमध्ये आरोग्य, रस्ते, रेल्वे, ऊर्जा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, पर्यटन अशा महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे.
देशातील आरोग्य सेवा बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकोट (गुजरात), भटिंडा (पंजाब), रायबरेली (उत्तर प्रदेश) कल्याणी (पश्चिम बंगाल) आणि मंगलगिरी (आंध्र प्रदेश) येथील पाच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) राष्ट्राला समर्पित करतील.
याशिवाय, पंतप्रधान 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उभारण्यात येणाऱ्या, 11500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या, 200 पेक्षा जास्त आरोग्य सेवा संबंधी पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्र समर्पण करतील.
यावेळी पंतप्रधान इतर प्रकल्पांबरोबरच पुद्दुचेरी, कराईकल येथील जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेचे (JIPMER) वैद्यकीय महाविद्यालय आणि पंजाबमधील संगरूर, पदव्युत्तर वैद्यकीय आणि शैक्षणिक संशोधन संस्थेच्या (PGIMER) 300 खाटांच्या सॅटेलाईट सेंटरचे लोकार्पण करतील. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी पुद्दुचेरी यनाम येथील जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (JIPMER) 90 खाटांच्या मल्टी स्पेशालिटी कन्सल्टिंग युनिटचे उद्घाटन होईल; चेन्नईतील नॅशनल सेंटर फॉर एजिंग; बिहार पूर्णिया येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय; केरळ मधील अलप्पुझा येथील विषाणूशास्त्र राष्ट्रीय संस्था (नॅशनल
इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) आणि तामिळनाडू, तिरुवल्लूर येथील क्षयरोग संशोधन राष्ट्रीय संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन ट्युबरक्युलोसिस (NIRT)) येथील नवीन एकत्रित क्षयरोग संशोधन सुविधा केंद्र या भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (ICMR) 2 क्षेत्रीय एककाचे देखील पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होईल. तसेच पंतप्रधानांच्या हस्ते विविध आरोग्य प्रकल्पांची पायाभरणी होईल; यामध्ये पंजाबमधील फिरोजपूर येथे पदव्युत्तर वैद्यकीय आणि शैक्षणिक संशोधन संस्थेच्या (PGIMER) च्या 100 खाटांच्या सॅटेलाईट केंद्रासह दिल्लीतील आरएमएल रुग्णालय परिसरामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम; इंफाळ येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मधील क्रिटिकल केअर ब्लॉक,; झारखंडमधील कोडरमा आणि दुमका येथील परिचारिका महाविद्यालय या प्रकल्पांचा समावेश आहे.
या व्यतिरिक्त, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि पंतप्रधान-आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान (PM-ABHIM) अंतर्गत, पंतप्रधान एकूण 115 प्रकल्पांपैकी काही प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. यामध्ये पंतप्रधान-आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानातील (PM-ABHIM) 78 प्रकल्पांचा समावेश आहे (क्रिटिकल केअर विभागाची 50 एकके, एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेची 15 एकके, आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची 13 एकके); राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सामुदायिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र, मॉडेल रुग्णालय, संक्रमण वसतिगृहे अशा विविध प्रकल्पांच्या 30 एककांचाही यात समावेश आहे.
पुणे येथील ‘निसर्ग ग्राम’ या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे उद्घाटनही यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये निसर्गोपचार वैद्यकीय महाविद्यालयासह 250 खाटांचे बहु-विद्याशाखीय संशोधन आणि विस्तार केंद्र समाविष्ट आहे. यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते हरियाणा, झज्जर येथे योगविद्या आणि निसर्गोपचाराच्या प्रादेशिक संशोधन संस्थेचे उद्घाटनही होईल. यात सर्वोच्च स्तरावरील योगविद्या आणि निसर्गोपचार संशोधन सुविधा उपलब्ध असतील.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) च्या सुमारे 2280 कोटी रुपये खर्चाच्या 21 प्रकल्पांचे उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील. राष्ट्रार्पण होणाऱ्या प्रकल्पांमध्ये पाटणा (बिहार) आणि अलवर (राजस्थान) येथील 2 वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये, कोरबा (छत्तीसगड), उदयपूर (राजस्थान), आदित्यपूर (झारखंड), फुलवारी शरीफ (बिहार), तिरुपूर (तामिळनाडू), काकीनाडा (आंध्र प्रदेश) आणि छत्तीसगडमधील रायगड आणि भिलाई येथील 8 रुग्णालये; तसेच राजस्थानमधील नीमराना, अबू रोड आणि भिलवाडा येथील 3 दवाखाने इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे. राजस्थानमधील अलवर, बेहरोर आणि सीतापुरा, सेलाकी (उत्तराखंड), गोरखपूर (उत्तर प्रदेश), केरळमधील कोराट्टी आणि नवैकुलम आणि पिडिभीमावरम (आंध्र प्रदेश) या 8 ठिकाणी स्थापन होणाऱ्या ईएसआय दवाखान्यांचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होईल.
देशाच्या या भागात नवीकरणीय ऊर्जेच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी पंतप्रधान 300 मेगावॅटच्या भुज-II सौर ऊर्जा प्रकल्पासह विविध अक्षय ऊर्जा प्रकल्पांची पायाभरणी करतील; यामध्ये इतर प्रकल्पांचे ग्रिड कनेक्टेड 600 मेगावॅट सोलर पीव्ही पॉवर प्रकल्प, खवडा सौरऊर्जा प्रकल्प, 200 मेगावॅट दयापूर-II पवन ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे.
पंतप्रधान यावेळी 9000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या नवीन मुंद्रा-पानिपत पाइपलाइन प्रकल्पाची पायाभरणी करतील. 8.4 एमएमटीपीए (MMTPA) एवढ्या स्थापित क्षमतेसह 1194 किमी लांबीची मुंद्रा-पानिपत ही पाईपलाईन गुजरात किनारपट्टीवरील मुंद्रा येथून हरियाणातील पानिपत येथील इंडियन ऑइलच्या रिफायनरीपर्यंत कच्च्या तेलाची वाहतूक करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आली.
या भागातील रस्ते आणि रेल्वे पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करण्यासाठी पंतप्रधान सुरेंद्रनगर-राजकोट रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण सुविधेचे, आणि जुन्या राष्ट्रीय महामार्ग-8E वरील भावनगर-तळाजा (पॅकेज-I) आणि राष्ट्रीय महामार्ग-751 वरील पिपली-भावनगर (पॅकेज-I) रस्त्यांचे चौपदरीकरण इत्यादी प्रकल्पांचे लोकार्पण करतील. पंतप्रधान यावेळी राष्ट्रीय महामार्ग-27 वरील समखियाली ते सांतालपूर विभागापर्यंतच्या प्रशस्त सहा पदरी रस्ते प्रकल्पांची पायाभरणीही करतील.