पंतप्रधान नरेंद्र मोदी 19-20 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. यावेळी ते अंदाजे 15,670 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील.
19 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे 9:45 वाजता पंतप्रधान गांधीनगर इथल्या महात्मा मंदिर अधिवेशन आणि प्रदर्शन केंद्रामध्ये संरक्षण प्रदर्शनी22 (DefExpo22) चे उद्घाटन करतील. दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला, पंतप्रधान अदलज येथे मिशन स्कूल ऑफ एक्सलन्सचा (उत्कृष्टता शाळा अभियान) शुभारंभ करतील. दुपारी 3:15 च्या सुमाराला ते जुनागड मधील विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. त्यानंतर संध्याकाळी 6 च्या सुमाराला ते राजकोट येथे अर्बन हाऊसिंग कॉन्क्लेव्ह 2022 (शहरी गृह संमेलन 2022) चे उद्घाटन करतील आणि अनेक महत्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील. संध्याकाळी 7:20 च्या सुमाराला ते राजकोट येथील नवोन्मेषी बांधकाम पद्धतींवरील प्रदर्शनाचे उद्घाटन देखील करतील.
ऑक्टोबर 20 रोजी सकाळी 9:45 च्या सुमाराला केवडिया येथे पंतप्रधानांच्या हस्ते लाईफ अभियानाचा (मिशन LiFE)शुभारंभ होईल. दुपारी 12 च्या सुमाराला पंतप्रधान केवडिया येथे 10व्या मिशन प्रमुखांच्या परिषदेत सहभागी होतील. त्यानंतर, दुपारी 3:45 च्या सुमाराला ते व्यारा येथील विविध विकास उपक्रमांची पायाभरणी करतील.
पंतप्रधान गांधीनगर येथे
पंतप्रधान संरक्षण प्रदर्शनी22 (DefExpo22) चे उद्घाटन करतील. ‘अभिमानाचा मार्ग’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनामध्ये भारतीय संरक्षण प्रदर्शनातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सहभाग पाहायला मिळेल. संरक्षण प्रदर्शनी22 मध्ये, प्रथमच केवळ भारतीय कंपन्यांसाठी प्रदर्शन आयोजित केले जाणार असून, परदेशी ओईएम (OEM) च्या भारतीय उपकंपन्या, भारतात नोंदणीकृत कंपनीचा विभाग, भारतीय कंपनीसह संयुक्त उपक्रम असलेले प्रदर्शक यांचा समावेश असेल. डिफेन्स एक्स्पो22 मध्ये भारतीय संरक्षण उत्पादन कौशल्याचे प्रमाण आणि व्यापक आवाका प्रदर्शित होईल. एक्स्पोमध्ये एक इंडिया पॅव्हेलियन आणि दहा राज्य पॅव्हेलियन असतील. इंडिया पॅव्हेलियनमध्ये पंतप्रधान HTT-40 या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने बनवलेल्या स्वदेशी प्रशिक्षण विमानाचे अनावरण करतील. या प्रशिक्षण विमानामध्ये अत्याधुनिक प्रणाली आहेत आणि त्याच्या आराखड्यामध्ये वैमानिकासाठी अनुकूल वैशिष्ट्ये आहेत.
या कार्यक्रमात, पंतप्रधान उद्योग आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून अंतराळ क्षेत्रात संरक्षण दलांसाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठीच्या, मिशन डेफस्पेसचा शुभारंभ करतील. पंतप्रधान गुजरातमधील दीसा इथल्या भारतीय वायुसेनेच्या तळाची पायाभरणी देखील करतील. आघाडीवरच्या वायुसेनेच्या या तळामुळे देशाच्या सुरक्षा संरचनेत भर पडेल.
एक्स्पोमध्ये ‘इंडिया-आफ्रिका: संरक्षण सहकार्याचा समन्वय साधण्यासाठीचे धोरण स्वीकारणे’ या संकल्पनेवर आधारित 2रा भारत-आफ्रिका संरक्षण संवाद देखील होणार आहे. एक्स्पो दरम्यान 2रे हिंद महासागर क्षेत्र+ (आयओआर+) संमेलन देखील आयोजित केले जाईल. या संमेलनाच्या माध्यमातून, सागर (SAGAR) क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकासाच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, आयओआर+ राष्ट्रांना शांतता, विकास, स्थैर्य आणि समृद्धी वाढवण्यासाठी सर्वसमावेशक संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. एक्स्पो मध्ये संरक्षण विषयक पहिली गुंतवणूकदारांची बैठक देखील आयोजित केली जाईल. मंथन 2022, या आयडीईएक्स (संरक्षण सर्वोत्तमतेसाठी नवोन्मेष) या संरक्षण नवोन्मेष कार्यक्रमात शंभर पेक्षा जास्त स्टार्टअप्सना आपला नवोन्मेष प्रदर्शित करण्याची संधी मिळेल. ‘बंधन’ अंतर्गत 451 भागीदारी/शुभारंभ कार्यक्रम होतील.
पंतप्रधान अदलज मध्ये त्रीमंदीर येथे मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स (सर्वोत्तमता शाळा अभियान) चा शुभारंभ देखील करतील. एकूण 10,000 कोटी रुपये खर्चाची या अभियानाची संकल्पना आहे. त्रीमंदीर येथील कार्यक्रमात पंतप्रधान अंदाजे 4260 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा शुभारंभ करतील. नवीन वर्गखोल्या, स्मार्ट क्लास रूम्स, कॉम्प्युटर लॅब आणि राज्यातील शाळांच्या पायाभूत सुविधांचा एकूण दर्जा सुधारून गुजरातमधील शैक्षणिक पायाभूत सुविधा बळकट करायला हे अभियान मदत करेल.
पंतप्रधान जुनागड येथे
पंतप्रधान अंदाजे 3580 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील.
पंतप्रधान सागरी किनारा महामार्गाची त्याच्या जोड-रस्त्यांसह सुधारणा करण्याच्या कामाची पायाभरणी करतील. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात, 13 जिल्ह्यांमधल्या एकूण 270 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम केले जाईल. पंतप्रधान जुनागड येथील दोन पाणी पुरवठा प्रकल्पांची आणि कृषी मालाच्या साठवणीसाठी गोदाम संकुलाच्या बांधकामाची पायाभरणी करतील. माधवपूर इथल्या श्री कृष्ण रुक्षमणी मंदिराच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी पंतप्रधान पोरबंदर येथे करतील. पोरबंदर इथल्या मासेमारी धक्क्यावरील सांडपाणी आणि पाणीपुरवठा प्रकल्प आणि देखभाल दुरुस्तीच्या कामाची देखील ते पायाभरणी करतील. गीर सोमनाथ येथे, ते मधवाड येथील मासेमारी बंदराच्या विकासासह दोन प्रकल्पांची पायाभरणी करतील.
पंतप्रधान राजकोट येथे
पंतप्रधान राजकोट येथे अंदाजे 5860 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्राला समर्पित करतील. ते इंडिया अर्बन हाऊसिंग कॉन्क्लेव्ह २०२२ चे उद्घाटनही करतील. यामध्ये नियोजन, रचना, धोरण, नियम, अंमलबजावणी, अधिक शाश्वतता आणि सर्वसमावेशकता यासह भारतातील गृहनिर्माणाशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा होईल. जाहीर कार्यक्रमानंतर पंतप्रधान नवोन्मेषी बांधकाम पद्धतींवर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन करतील.
या जाहीर कार्यक्रमात, पंतप्रधान लाईट हाउस प्रकल्पा अंतर्गत बांधण्यात आलेल्या 1100 हून अधिक घरांचे लोकार्पण करतील. या घरांच्या चाव्या देखील लाभार्थ्यांना सुपूर्त करण्यात येतील. ते मोरबी-बल्क पाइपलाइन प्रकल्प ब्राह्मणी-2 धरण ते नर्मदा कालवा पंपिंग स्टेशन, या पाणी पुरवठा प्रकल्पाचे देखील लोकार्पण करतील. पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार्या अन्य प्रकल्पांमध्ये, प्रादेशिक विज्ञान केंद्र, उड्डाण पूल आणि रस्ते क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधान NH27 च्या गुजरातमधील राजकोट-गोंडल-जेतपूर विभागातील सध्याचा चौपदरी मार्ग सहा पदरी करण्याच्या कामाची पायाभरणी करतील. जीआयडीसी औद्योगिक वसाहतींच्या मोरबी, राजकोट, बोटाड, जामनगर आणि कच्छमधील विविध ठिकाणच्या सुमारे 2950 कोटी रुपये खर्चाच्या कामाची देखील ते पायाभरणी करतील. पंतप्रधान अन्य काही प्रकल्पांची देखील पायाभरणी करतील. यामध्ये गढका येथील अमूल-संघटनेची डेअरी, राजकोट येथील इन-डोअर स्पोर्ट्स संकुल, दोन पाणी पुरवठा केंद्र आणि रस्ते आणि रेल्वे विभागाच्या अन्य प्रकल्पांचा समावेश आहे.
पंतप्रधान केवडिया येथे
पंतप्रधानांची संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस एच.ई. अँटोनियो गुटेरस यांच्या बरोबर द्विपक्षीय बैठक होणार आहे.
त्यानंतर, केवडियामध्ये एकता नगर इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्या उपस्थितीत पंतप्रधानांच्या हस्ते मिशन लाइफचे लोकार्पण करण्यात येईल. पंतप्रधानांच्या संकल्पनेतून उतरलेले हे भारताच्या नेतृत्वाखालचे जागतिक स्तरावरचे जन-आंदोलन असेल, जे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वैयक्तिक आणि सामुहिक कृती करायला सहाय्य करेल.
शाश्वततेबाबतचा आपला सामुहिक दृष्टीकोन बदलण्यासाठी त्री-मिती धोरणाचे पालन करणे हे मिशन लाईफचे उद्दिष्ट आहे. पहिले म्हणजे, लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात (मागणी) सोप्या ,पण प्रभावी पर्यावरण-अनुकूल कृतींचा सराव करायला प्रवृत्त करणे; दुसरे म्हणजे उद्योगांना आणि बाजारांना, बदलत्या मागणीला झटपट प्रतिसाद देण्यासाठी सक्षम करणे आणि; तिसरे म्हणजे उत्पादनांची निर्मिती आणि शाश्वत वापर आणि या दोन्हींना समर्थन देण्यासाठी सरकारी आणि औद्योगिक धोरणांवर प्रभाव पाडणे.
केवडिया येथे 20-22 ऑक्टोबर 2022 दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेल्या 10 व्या मिशन प्रमुखांच्या परिषदेत देखील पंतप्रधान सहभागी होतील. या परिषदेत जगभरातील 118 भारतीय मिशनचे प्रमुख (राजदूत आणि उच्चायुक्त) एकत्र येतील. तीन दिवस चालणार्या परिषदेच्या 23 सत्रांमध्ये, सध्याचे भू-राजकीय आणि भू-आर्थिक वातावरण, संपर्क सज्जता, भारताची परराष्ट्र धोरणाची प्राथमिकता वगैरे यासारख्या काही अंतर्गत मुद्द्यांवर विस्तृत चर्चा करण्याची संधी मिळेल. भारताच्या आकांक्षी जिल्हे, एक जिल्हा एक उत्पादन, अमृत सरोवर मिशन आणि अन्य फ्लॅगशिप कार्यक्रमांची ओळख करून घेण्यासाठी मिशन प्रमुख सध्या आपापल्या राज्यांना भेट देत आहेत.
पंतप्रधान व्यारा येथे
पंतप्रधान तापी मधील व्यारा येथे 1970 कोटी रुपये खर्चाच्या अनेक विकास उपक्रमांची पायाभरणी करतील. सापुतारा ते स्टॅच्यू ऑफ युनिटी दरम्यानच्या रस्त्याच्या जोड-रस्त्यांसह रस्ता सुधारणेच्या कामाची ते पायाभरणी करतील. पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी होणार्या अन्य प्रकल्पांमध्ये तापी आणि नर्मदा जिल्ह्यांतील 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या पाणीपुरवठा प्रकल्पांचा समावेश आहे.