पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 मे रोजी गुजरातला भेट देणार आहेत. गांधीनगर येथे अखिल भारतीय शिक्षक संघाच्या अधिवेशनात पंतप्रधान सकाळी 10:30 वाजता सहभागी होतील. त्यानंतर दुपारी 12 वाजता गांधीनगर येथे सुमारे 4,400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान करतील. दुपारी 3 वाजता ते गिफ्ट सिटीला भेट देतील.
विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी
पंतप्रधान, गांधीनगरमधील कार्यक्रमादरम्यान 2450 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यामध्ये नगरविकास विभाग, पाणीपुरवठा विभाग, रस्ते व वाहतूक विभाग आणि खाण व खनिज विभागाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या प्रकल्पांमध्ये बनासकांठा जिल्ह्यातील बहुग्राम पेयजल पुरवठा योजना, अहमदाबादमध्ये नदीवरील पूल , नरोडा येथे गुजरात औद्योगिक विकास महामंडळाचे जलनिःस्स्सारण संग्रह जाळे , मेहसाणा आणि अहमदाबादमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, दहेगाममधील सभागृह इत्यादींचा समावेश आहे. ज्या प्रकल्पांची पायाभरणी केली जाणार आहे त्यामध्ये जुनागढ जिल्ह्यातील पाइपलाइन प्रकल्प, गांधीनगर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचे विस्तारीकरण, उड्डाणपुलांचे बांधकाम, नवीन पाणी वितरण केंद्र, विविध नगर नियोजन रस्ते आदींचा समावेश आहे.
पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण आणि शहरी) प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीदेखील पंतप्रधान करणार आहेत तसेच योजनेअंतर्गत बांधलेल्या सुमारे 19,000 घरांच्या गृहप्रवेश कार्यक्रमात ते सहभागी होतील. यावेळी पंतप्रधान, या योजनेच्या लाभार्थ्यांना चाव्या सुपूर्द करणार आहेत. या प्रकल्पांचा एकूण खर्च सुमारे 1950 कोटी रुपये आहे.
गिफ्ट सिटीमध्ये पंतप्रधान
पंतप्रधान ‘गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी’ (गिफ्ट सिटी), गांधीनगरला भेट देतील. भेटीदरम्यान ते गिफ्ट सिटी येथे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या स्थितीचा आढावा घेतील. गिफ्ट IFSC( आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र ) सिटीमधील संस्थांचे अनुभव आणि भविष्यातील योजना समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाददेखील यावेळी साधला जाईल. ‘भूमिगत उपयोगिता बोगदा ’ आणि ‘स्वयंचलित कचरा संग्रह पृथक्करण प्रकल्प ’ यासह शहरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची पाहणी पंतप्रधान करतील.
अखिल भारतीय शिक्षक संघ अधिवेशन
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाची 29 वी द्वैवार्षिक असलेल्या अखिल भारतीय शिक्षक संघ अधिवेशनात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. 'शिक्षण परिवर्तनाच्या केंद्रस्थानी शिक्षक' ही परिषदेची संकल्पना आहे.