पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 28 आणि 29 जुलै, 2022 रोजी गुजरात आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी गुजरातच्या साबरकांठा इथल्या गढ़ौला चौकी इथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर पंतप्रधान चेन्नईला जाणार असून, संध्याकाळी सहा वाजता, चेन्नईतल्या जेएलएन इनडोअर स्टेडियममध्ये बुद्धिबळ ऑलिंपिक स्पर्धेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होईल.
29 जुलै रोजी सकाळी दहा वाजता पंतप्रधान अण्णा विद्यापीठाच्या 42 व्या दीक्षांत सोहळ्यात सहभागी होतील. त्यानंतर ते परत गुजरातच्या गांधीनगर इथे गिफ्ट सिटीला भेट देतील. तिथे, त्यांच्या हस्ते दुपारी चार वाजता विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होईल.
पंतप्रधान गुजरातमध्ये
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे तसेच शेती आणि कृषीपूरक उद्योग अधिक किफायतशीर करणे याला सरकारचे प्राधान्य आहे. या दिशेने आणखी एक पाऊल म्हणून पंतप्रधान 28 जुलै रोजी साबर डेअरीला भेट देणार आहेत आणि 1,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी तसेच उद्घाटनं करणार आहेत. हे प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांना तसेच दुग्ध उत्पादकांना सक्षम करतील आणि त्यांचे उत्पन्न वाढवतील. या प्रकल्पांमुळे या भागातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
साबर डेअरी इथे पंतप्रधान दिवसाला जवळपास 120 दशलक्ष टन उत्पादन क्षमतेच्या भुकटी कारखान्याचे उद्घाटन करतील. या संपूर्ण प्रकल्पाची किंमत 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या कारखान्याचे आरेखन जागतिक अन्न सुरक्षा मानकांप्रमाणे आहे. हा कारखाना प्रचंड प्रमाणात उर्जा बचत करतो आणि यातून शून्य उत्सर्जन होते. या कारखान्यात अत्याधुनिक संपूर्णपणे स्वयंचलित बल्क पॅकींग लाईन आहे.
सबर डेअरी इथे पंतप्रधान असेप्टिक दुध पॅकेजिंग कारखान्याचे देखील उद्घाटन करतील. हा एक अत्याधुनिक कारखाना आहे आणि याची क्षमता दिवसाला 3 लाख लिटर इतकी आहे. या प्रकल्पावर जवळपास 125 कोटी रुपये इतकी गुंतवणूक करण्यात आली आहे. या कारखान्यात अत्याधुनिक स्वयंचलित व्यवस्था असून हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर उर्जा बचत करते आणि पर्यावरण पूरक देखील आहे. या प्रकापामुळे दुग्धजन्य उत्पादनांना चांगली किंमत मिळण्यात मदत होईल.
पंतप्रधान साबर चीज आणि ताक सुकाविण्याच्या कारखान्याची पायाभरणी करतील. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च जवळपास 600 कोटी रुपये इतका आहे. या कारखान्यात छेडर चीज (दर रोज 20 दशलक्ष टन) मोझरेला चीज ( दर रोज 10 दशलक्ष टन) आणि प्रक्रियाकृत चीज (दर रोज 16 दशलक्ष टन) उत्पादन होईल. चीज बनविताना तयार झालेल्या ताकावर देखील ताक भुकटी कारखान्यात प्रक्रिया केली जाईल. या कारखान्याची क्षमता दिवसाला 40 दशलक्ष मेट्रिक टन इतकी आहे.
साबर डेअरी ही गुजरात सहकारी दुग्ध विपणन महसंघ (GCMMF) चा भाग असून, त्यात अमूल या ब्रॅंड नावाखाली दूध आणि सगळ्या दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन केले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 जुलै 2022 रोजी गांधीनगर येथील जीआयएफटी सिटीला भेट देणार आहेत. हे जीआयएफटी सिटी अथवा गिफ्ट सिटी अर्थात गुजरात आंतरराष्ट्रीय अर्थविषयक तंत्रज्ञानयुक्त शहर केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी आर्थिक तसेच तंत्रज्ञानविषयक सेवा पुरविणारे एकात्मिक केंद्र म्हणून विकसित करण्यात आले आहे.
पंतप्रधान त्यांच्या या भेटीदरम्यान भारतातील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्राची सर्व आर्थिक उत्पादने, अर्थविषयक सेवा तसेच विविध वित्तीय संस्था यांचा विकास आणि नियमन करण्यासाठी एकीकृत नियामक असलेल्या आयएफएससीए अर्थात आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरणाच्या मुख्यालय इमारतीची कोनशीला रचणार आहेत. आयएफएससीएच्या मुख्यालयाची ही इमारत एक आयकॉनिक मांडणीनुसार उभारलेली इमारत या संकल्पनेवर आधारित असून तिच्या रचनेत जीआयएफटी-आयएफएससीचा एक प्रमुख आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र म्हणून उंचावणारा प्रभाव आणि स्तर यांचे प्रतिबिंब पाहायला मिळेल.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यावेळी जीआयएफटी-आयएफएससी केंद्रातील आयआयबीएक्स अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय सोने-चांदी बाजार या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सोने-चांदी बाजाराची सुरुवात देखील केली जाणार आहे. आयआयबीएक्समुळे भारतात सोन्याच्या आर्थिकीकरणाला चालना देण्यासोबतच, जबाबदार स्त्रोत आणि दर्जा यांच्या सुनिश्चितीसह कार्यक्षम मूल्य निश्चितीची देखील सोय होणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय सोने-चांदी बाजारात हक्काचे स्थान मिळविण्याची आणि अधिक प्रामाणिकपणे तसेच उत्तम दर्जासह जागतिक मूल्यसाखळीतील ग्राहकांना सेवा देण्यासाठी भारत सक्षम होईल. प्रमुख ग्राहक म्हणून जागतिक बाजारांमध्ये सोन्याचांदीची किंमत निश्चित करण्यासाठी भारताला सक्षम करण्याची भारत सरकारची कटिबद्धता देखील आयआयबीएक्समुळे पुन्हा अधोरेखित होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांसह, पंतप्रधान या भेटीदरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आयएफएससी-एसजीएक्स कनेक्ट उपक्रमाची सुरुवात करणार आहेत. हा उपक्रम म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजाराची उपसंस्था असलेले जीआयएफटी- आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (आयएफएससी) आणि सिंगापूरचा एसजीएक्स हा शेअर बाजार यांच्या दरम्यान उभारलेली संस्थात्मक चौकट आहे. या उपक्रमाअंतर्गत, सिंगापूरच्या एसजीएक्स या शेअर बाजाराच्या सदस्यांनी नोंदविलेल्या निफ्टी डेरीव्हेटीव्हजच्या सर्व ऑर्डर्स एनएसई-आयएफएससीकडे वळवून त्याच्या व्यापारी मंचावर जुळविल्या जातील. भारत आणि आंतरराष्ट्रीय न्यायक्षेत्राच्या कक्षेतील आर्थिक व्यवहारांचे दलाल आणि मध्यस्थ या कनेक्टच्या माध्यमातून डेरीव्हेटीव्हजचे व्यवहार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. हा कनेक्ट उपक्रम, जीआयएफटी- आयएफएससीमधील डेरीव्हेटीव्हज बाजारातील तरलता अधिक सखोल करणार आहे आणि त्यामुळे अधिकाधिक आंतरराष्ट्रीय भागधारक या ठिकाणी आकर्षित होतील आणि त्यातून जीआयएफटी- आयएफएससीमधीलमधील आर्थिक परिसंस्थेवर सकारात्मक प्रभाव पडेल.
पंतप्रधानांचे तामिळनाडूमधील कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नई येथील जेएलएन इनडोअर स्टेडीयम येथे येत्या 28 जुलै रोजी सुरु होत असलेल्या 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेची सुरुवात झाल्याची घोषणा करणार आहेत.
पंतप्रधानांनी 19 जून 2022 रोजी नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय स्टेडीयम येथे झालेल्या कार्यक्रमात पहिल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या मशाल रिलेची सुरुवात देखील केली होती. या मशालीने 40 दिवसांच्या कालावधीत देशभरातील 75 विशेष महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देत, सुमारे 20,000 किलोमीटर्सची वाटचाल केली आणि हा भारतातील प्रवास तामिळनाडू मधील महाबलीपुरम येथे समाप्त झाला. त्यानंतर या मशालीने स्वित्झर्लंडच्या एफआयडीई या मुख्यालयाकडे कूच केले.
चेन्नई येथे 28 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ष 1927 पासून आयोजित होत असलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेच्या यजमानपदाचा मान यावर्षी भारताला पहिल्यांदाच आणि आशियाला 30 वर्षानंतर मिळाला आहे. आतापर्यंतच्या कोणत्याही बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये सहभागी झाले नव्हते इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे 187 देश या वर्षीच्या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. भारत देखील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या क्रीडापथकासह म्हणजे 6 संघांमध्ये विभागलेल्या एकूण 30 खेळाडूंसह या स्पर्धेत सहभागी होत आहे.
पंतप्रधान त्यांच्या या भेटीदरम्यान चेन्नई येथील सुप्रसिद्ध अण्णा विद्यापीठाच्या 42 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात, मोदी यांच्या हस्ते सुवर्ण पदक विजेत्या 69 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येईल.
4 सप्टेंबर 1978 रोजी अण्णा विद्यापीठाची स्थापना झाली. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री सी.अण्णादुराई यांच्या नावावरून या विद्यापीठाचे नामकरण करण्यात आले. या विद्यापीठाअंतर्गत तामिळनाडू राज्यात 14 घटक महाविद्यालये, 494 संलग्न महाविद्यालये कार्यरत आहेत आणि तिरुनेवेली, मदुराई आणि कोइम्बतुर या तीन उपकेंद्रात विद्यापीठाचा विस्तार पसरलेला आहे.