पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑक्टोबर 2023 रोजी मध्य प्रदेशला भेट देणार आहेत.
दुपारी 1:45 च्या सुमारास, पंतप्रधान सतना जिल्ह्यातील चित्रकूट येथे पोहोचतील आणि श्री सदगुरु सेवा संघ ट्रस्टच्या बहुविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. ते रघुबीर मंदिरात पूजाअर्चना करतील; श्री राम संस्कृत महाविद्यालयाला भेट देतील; स्वर्गीय अरविंद भाई मफतलाल यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून जानकीकुंड चिकित्सालयाच्या नवीन विंगचे उद्घाटन करतील.
दिवंगत श्री अरविंद भाई मफतलाल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित सार्वजनिक कार्यक्रमालाही पंतप्रधान उपस्थित राहतील. श्री सद्गुरु सेवा संघ ट्रस्टची स्थापना 1968 मध्ये परमपूज्य रणछोडदासजी महाराज यांनी केली होती. अरविंद भाई मफतलाल, परमपूज्य रणछोडदासजी महाराज यांच्यामुळे प्रेरित झाले आणि ट्रस्टच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
स्वातंत्र्योत्तर भारतातील अग्रगण्य उद्योजकांपैकी अरविंद भाई मफतलाल हे एक होते, ज्यांनी देशाच्या विकासगाथेत महत्त्वाची भूमिका बजावली.
चित्रकूटच्या भेटीदरम्यान पंतप्रधान तुलसीपीठालाही भेट देणार आहेत. दुपारी 3.15 वाजता ते कांच मंदिरात दर्शन घेऊन पूजा करतील. ते तुलसीपीठाचे जगद्गुरू रामानंदाचार्य यांचे आशीर्वाद घेतील आणि एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील, जिथे ते ‘अष्टाध्यायी भाष्य ’, ‘रामानंदाचार्य चरितम्’ आणि ‘भगवान श्री कृष्ण की राष्ट्रलीला’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन करतील.
तुलसीपीठ ही मध्य प्रदेशातील चित्रकूट येथील एक महत्त्वाची धार्मिक आणि सामाजिक सेवा संस्था आहे. याची स्थापना जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी 1987 मध्ये केली होती. तुलसीपीठ हे हिंदू धार्मिक साहित्याच्या अग्रगण्य प्रकाशकांपैकी एक आहे.