पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 ऑक्टोबर 2023 रोजी छत्तीसगड आणि तेलंगणाला भेट देणार आहेत.
पंतप्रधान, बस्तरमधील जगदलपूर येथे सकाळी 11 वाजता छत्तीसगडमधील 26,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि राष्ट्राला समर्पित करतील. यात नागरनार येथील NMDC स्टील लिमिटेडच्या पोलाद प्रकल्पाचाही समावेश आहे. पंतप्रधान, दुपारी 3 वाजता तेलंगणातील निजामाबाद येथे पोहोचतील, तिथे ते वीज, रेल्वे आणि आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील सुमारे 8000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि देशाला समर्पित करतील.
पंतप्रधानांचा छत्तीसगड दौरा
आत्मनिर्भर भारताच्या ध्येयदृष्टीला मोठी चालना देणाऱ्या टप्प्यात, बस्तर जिल्ह्यातील नागरनार येथे NMDC स्टील लिमिटेडचा पोलाद प्रकल्प पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील. 23,800 कोटींहून अधिक खर्च करून बांधलेला हा पोलाद प्रकल्प, ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे. तो उच्च दर्जाची पोलाद निर्मिती करेल. NMDC स्टील लिमिटेडचा नागरनार येथील पोलाद प्रकल्प, हा या प्रकल्पात तसेच यावर आधारित उद्योगांमध्ये हजारो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल. यामुळे बस्तर क्षेत्र जागतिक पोलाद नकाशावर येईल आणि या क्षेत्राच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देईल.
देशभरातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, यावेळी अनेक रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी केली जाईल आणि काही प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले जातील. अंतागड आणि तारोकी दरम्यान नवीन रेल्वे मार्ग आणि जगदलपूर आणि दंतेवाडा दरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण प्रकल्प पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील. अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत बोरीदंड-सूरजपूर रेल्वे मार्ग दुहेरीकरण प्रकल्प आणि जगदलपूर स्थानकाच्या पुनर्विकासाची ते पायाभरणी करतील. तारोकी-रायपूर डेमू ट्रेन सेवेलाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. या रेल्वे प्रकल्पांमुळे राज्यातल्या आदिवासी भागात संपर्क व्यवस्था वाढेल. सुधारित रेल्वे पायाभूत सुविधा आणि नवीन रेल्वे सेवेचा स्थानिक लोकांना फायदा होईल आणि याभागाच्या आर्थिक विकासाला मदत होईल.
पंतप्रधान, राष्ट्रीय महामार्ग-43 चा ‘कुंकुरी ते छत्तीसगड-झारखंड सीमा भागातील’ रस्ता अद्ययावतीकरण प्रकल्पही राष्ट्राला समर्पित करतील. नवीन रस्त्यामुळे रस्ते संपर्क व्यवस्था सुधारेल, त्याचा फायदा परिसरातील लोकांना होणार आहे.
पंतप्रधानांचा तेलंगणा दौरा
देशातील सुधारित ऊर्जा कार्यक्षमतेसह वीज निर्मिती वाढवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, एनटीपीसीच्या तेलंगणा सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 800 मेगावॅटचे युनिट राष्ट्राला समर्पित केले जाईल. ते तेलंगणाला कमी किमतीत वीज पुरवेल आणि राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देईल. देशातील पर्यावरणाशी सुसंगत वीज केंद्रांपैकी हे एक असेल.
पंतप्रधान विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि ते राष्ट्राला समर्पित करणार असल्याने तेलंगणाच्या रेल्वे पायाभूत सुविधांना चालना मिळेल. यात मनोहराबाद आणि सिद्धीपेट यांना जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गासह राष्ट्रीय रेल्वे प्रकल्प ते समर्पित करणार आहेत; धर्माबाद - मनोहराबाद आणि महबूबनगर - कुर्नूल दरम्यान विद्युतीकरण प्रकल्प यांचाही यात समावेश आहे. 76 किमी लांबीच्या मनोहराबाद-सिद्दीपेट रेल्वे मार्गामुळे प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल, विशेषत: मेडक आणि सिद्धीपेट जिल्ह्यांमध्ये याचा अधिक लाभ होईल. धर्माबाद - मनोहराबाद आणि महबूबनगर - कुरनूल दरम्यानच्या विद्युतीकरण प्रकल्पामुळे गाड्यांचा सरासरी वेग सुधारण्यास मदत होईल आणि या प्रदेशात पर्यावरणास अनुकूल रेल्वे वाहतूक होईल. सिद्दीपेट - सिकंदराबाद - सिद्धीपेट रेल्वे सेवेलाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. यामुळे या भागातील स्थानिक रेल्वे प्रवाशांना फायदा होईल.
तेलंगणातील आरोग्य पायाभूत सुविधा वाढवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, प्रधानमंत्री - आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानांतर्गत राज्यभरात 20 क्रिटिकल केअर ब्लॉक्सची (सीसीबी) पायाभरणी पंतप्रधान करतील. हे सीसीबी आदिलाबाद, भद्राद्री कोठागुडेम, जयशंकर भूपालपल्ली, जोगुलांबा गडवाल, हैदराबाद, खम्मम, कुमुराम भीम आसिफाबाद, मंचेरियल, महबूबनगर (बडेपल्ली), मुलुगु, नागरकुर्नूल, नलगोंडा, नारायणपेट, निर्मल, राजमन्ना, राजकुमार, नारायणपेठ, सूर्यापेट, पेड्डापल्ली, विकाराबाद आणि वारंगल (नरसंपेट) या जिल्ह्यांमध्ये बांधले जातील. या सीसीबीमुळे संपूर्ण तेलंगणातील जिल्हास्तरीय क्रिटिकल केअर पायाभूत सुविधा उंचावतील. राज्यातील लोकांना त्याचा फायदा होईल.