पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर आणि राजस्थानमधील जयपूरला भेट देणार आहेत. बुलंदशहरमध्ये दुपारी पावणे दोनच्या सुमारास 19,100 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे पंतप्रधान उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू तसेच शहरी विकास आणि गृहनिर्माण यासारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित आहेत. पंतप्रधान, संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांचे जयपूरमध्ये स्वागत करतील. पंतप्रधान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासमवेत, जंतर मंतर आणि हवा महल यासह शहरातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या विविध ठिकाणांना भेट देतील.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर इथल्या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून दोन स्थानकांवरून मालगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून समर्पित मालवाहतूक मार्गिकेवरील (डी. एफ. सी.) नवीन खुर्जा-नवीन रेवाडी दरम्यानच्या 173 कि. मी. लांबीच्या दुहेरी मार्ग विद्युतीकृत मार्गाचे राष्ट्रार्पण करतील.
पश्चिम आणि पूर्व डी. एफ. सी. दरम्यान महत्त्वपूर्ण संपर्क स्थापित करत असल्याने हा नवीन डी. एफ. सी. विभाग महत्त्वाचा आहे. हा विभाग त्याच्या अभियांत्रिकीच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी देखील ओळखला जातो. त्यात 'उंचावरील विद्युतीकरणासह एक किलोमीटर लांबीचा दुहेरी रेल्वे बोगदा' आहे, जो जगातील अशा प्रकारचा पहिलाच बोगदा आहे. डबल-स्टॅक कंटेनर गाड्या अखंडपणे चालवण्यासाठी या बोगद्याची रचना करण्यात आली आहे. या नवीन डी. एफ. सी. विभागामुळे डी. एफ. सी. मार्गावर मालगाड्या हलवल्याने प्रवासी गाड्यांचे परिचालन सुधारण्यास मदत होईल.
मथुरा-पलवाल विभाग आणि चिपियाना बुजर्ग-दादरी विभागाला जोडणारा चौथा मार्गही पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील. या नवीन मार्गांमुळे राष्ट्रीय राजधानीची दक्षिण पश्चिम आणि पूर्व भारताशी असलेली रेल्वे संपर्क व्यवस्था सुधारेल.
पंतप्रधान रस्ते विकासाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करतील. प्रकल्पांमध्ये अलीगढ ते भादवास चौपदरी काम पॅकेज-1 (NH-34 च्या अलीगढ-कानपूर विभागाचा भाग); शामली (NH-709A) मार्गे मेरठ ते कर्नाल सीमेचे रुंदीकरण; आणि NH-709 AD पॅकेज-II च्या शामली-मुझफ्फरनगर विभागाचे चौपदरीकरण यांचा समावेश आहे. 5000 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित केलेल्या या रस्ते प्रकल्पांमुळे संपर्क यंत्रणेत सुधारणा होईल तसेच या भागातील आर्थिक विकासाला चालना मिळेल.
या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते इंडियन ऑइलच्या तुंडला-गवारिया पाइपलाइनचे उदघाटन केले जाणार आहे. सुमारे 700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या 255 किमी लांब पाईपलाईनचा हा प्रकल्प नियोजित वेळेच्या खूप आधीच पूर्ण झाला आहे. या प्रकल्पामुळे मथुरा आणि तुंडला येथे पंपिंग सुविधा उपलब्ध होतील तसेच तुंडला ते बरौनी-कानपूर पाईपलाईनच्या गवारिया टी-पॉइंटपर्यंत पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक सुलभ होईल आणि टुंडला, लखनौ आणि कानपूर येथे त्यांचे सहज वितरण करणे शक्य होईल.
पंतप्रधान ‘ग्रेटर नोएडा येथील एकात्मिक औद्योगिक वसाहत’ (IITGN) राष्ट्राला समर्पित करतील. ही वसाहत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील पी एम गतिशक्ति योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा जोडणी प्रकल्पांचे एकात्मिक नियोजन आणि समन्वयीत अंमलबजावणी या दृष्टिकोनातून विकसित केली आहे. 1,714 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा प्रकल्प, 747 एकर जागेवर पसरला असून दक्षिणेला इस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे आणि पूर्वेला दिल्ली-हावडा ब्रॉडगेज रेल्वे मार्गासह पूर्व आणि पश्चिम समर्पित फ्रेट कॉरिडॉर जिथे एकत्र येतात तिथे उभारण्यात आला आहे. IITGN चे धोरणात्मक स्थान उत्तम कनेक्टिव्हिटी प्रदान करते कारण या प्रकल्पाच्या परिसरात मल्टी मोडल कनेक्टिविटीच्या दृष्टीने आवश्यक अशा इतर सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवे (5 किमी), यमुना एक्सप्रेसवे (10 किमी), दिल्ली विमानतळ (60 किमी), जेवर विमानतळ (40 किमी), अजयपूर रेल्वे स्टेशन (0.5 किमी) आणि न्यू दादरी डीएफसीसी स्टेशन (10 किमी) इतक्या अंतरावर आहेत. हे प्रकल्प म्हणजे औद्योगिक विकासाला प्रोत्साहन, आर्थिक समृद्धी आणि या भागातील शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल असेल.
या कार्यक्रमादरम्यान, सुमारे 460 कोटी रुपये खर्चाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (STP) बांधकामासह नूतनीकरण केलेल्या मथुरा सांडपाणी योजनेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. या मध्ये मसानी येथे 30 MLD सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे बांधकाम, ट्रान्स यमुना येथे विद्यमान 30 MLD चे पुनर्वसन आणि मसानी येथे 6.8 MLD सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि 20 MLD TTRO प्लांटचे बांधकाम (टर्शरी ट्रीटमेंट आणि रिव्हर्स ऑस्मोसिस प्लांट) यांचा समावेश आहे. याशिवाय पंतप्रधान मुरादाबाद (रामगंगा) सीवरेज सिस्टीम आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या कामांचे (टप्पा I) उद्घाटन देखील करतील. सुमारे 330 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या प्रकल्पात मुरादाबाद येथील रामगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी 58 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्र, सुमारे 264 किमी सांडपाणी नेटवर्क आणि नऊ सांडपाणी पंपिंग स्टेशनचा समावेश आहे.