पंतप्रधान नरेंद्र मोदी 21- 22 मार्च 2024 या कालावधीत भूतानचा दौरा करणार आहेत. भारत आणि भूतान यांच्यातील नियमित उच्चस्तरीय देवाणघेवाण आणि सरकारच्या 'शेजारी प्रथम' या धोरणावरील भर या अनुषंगाने हा दौरा आहे.
या भेटीदरम्यान भूतानचे राजे महामहीम जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि भूतानचे चौथे राजे महामहीम जिग्मे सिंग्ये वांगचुक यांना पंतप्रधान भेटतील. भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे यांच्याशी मोदी चर्चाही करणार आहेत.
परस्पर विश्वास, सामंजस्य आणि सद्भावना यावर आधारित अद्वितीय आणि चिरस्थायी अशी भागीदारी भारत आणि भूतान यांच्यात आहे.
उभयातांतील सामायिक आध्यात्मिक वारसा आणि लोकांमधील जिव्हाळ्याचे संबंध दोन्ही देशांमध्ये दृढता आणि चैतन्य वृद्धींगत करतात. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांना स्वारस्य असलेल्या द्विपक्षीय आणि प्रादेशिक बाबींवर विचारांची देवाणघेवाण करण्याची आणि आपल्या लोकांच्या फायद्यासाठी या भागीदारीचा विस्तार आणि ती अधिक घनिष्ठ करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्याची संधी मिळेल.