पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता उत्तर प्रदेशातील बलरामपूरला भेट देतील आणि शरयू बंधारा राष्ट्रीय प्रकल्पाचे उद्घाटन करतील.
प्रकल्पाचे काम 1978 मध्ये सुरू झाले, परंतु अर्थसंकल्पीय सहाय्य , आंतरविभागीय समन्वय आणि पुरेशा देखरेखीच्या अभावी त्याला विलंब झाला आणि सुमारे चार दशके उलटूनही ते पूर्ण झाले नाही. शेतकरी कल्याण आणि सक्षमीकरणाप्रति पंतप्रधानांची दूरदृष्टी आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रकल्पांना प्राधान्य देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेमुळे या प्रकल्पावर अधिक लक्ष दिले गेले. परिणामी, 2016 मध्ये, हा प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या उद्दिष्टासह प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत आणण्यात आला. या प्रयत्नादरम्यान , नवीन भूसंपादनासाठी , नवीन कालवे बांधण्यासाठी आणि प्रकल्पातील महत्त्वाची तफावत भरून काढण्यासाठी तसेच पूर्वीच्या भूसंपादनाशी संबंधित प्रलंबित खटल्यांचे निराकरण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यात आले. प्रकल्पावर नव्याने लक्ष केंद्रित केल्यामुळे हा प्रकल्प केवळ चार वर्षांत पूर्ण करण्यात आला आहे.
शरयू बंधारा राष्ट्रीय प्रकल्प एकूण 9800 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून बांधण्यात आला आहे., त्यापैकी 4600 कोटी रुपयांहून अधिक तरतूद गेल्या चार वर्षांत करण्यात आली. घाघरा, शरयू , राप्ती, बाणगंगा आणि रोहिणी या पाच नद्यांच्या आंतरजोडणीचाही या प्रकल्पात समावेश आहे, यामुळे प्रदेशातील जलस्रोतांचा योग्य वापर होईल.
या प्रकल्पामुळे 14 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीच्या सिंचनासाठी खात्रीशीर पाणी उपलब्ध होईल आणि 6200 हून अधिक गावांतील सुमारे 29 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. बहराइच, श्रवस्ती, बलरामपूर, गोंडा, सिद्धार्थनगर, बस्ती, संत कबीर नगर, गोरखपूर आणि महाराजगंज या पूर्व उत्तर प्रदेशातील नऊ जिल्ह्यांना याचा फायदा होईल. प्रकल्पातील अवास्तव दिरंगाईचा सर्वाधिक फटका बसलेल्या या भागातील शेतकऱ्यांना आता उन्नत सिंचन क्षमतेचा मोठा फायदा होणार आहे. ते आता मोठ्या प्रमाणावर पिके घेऊ शकतील आणि प्रदेशातील कृषी क्षमता वाढवू शकतील.