पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 28 एप्रिल 2022 रोजी आसामला भेट देणार आहेत. सकाळी 11.00 च्या सुमाराला पंतप्रधान आंगलाँग जिल्ह्यातल्या दिफू येथे ‘शांतता, एकता आणि विकास’ मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमामध्येच त्यांच्या हस्ते विविध शैक्षणिक प्रकल्पांची पायाभरणी करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 1.45 च्या सुमारास पंतप्रधान मोदी दिब्रुगड इथल्या आसाम वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पोहोचतील. यावेळी ते दिब्रुगड कर्करोग रूग्णालय राष्ट्राला समर्पित करतील. यानंतर पंतप्रधान दुपारी 3.00 च्या सुमाराला दिब्रुगडमधील खानीकर मैदानावर एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी त्यांच्या हस्ते आणखी सहा कर्करोग रूग्णालये राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहेत आणि सात नवीन कर्करोग रूग्णालयांचा शिलान्यास करण्यात येणार आहे.
दिफु, कारबी आंगलाँग येथे पंतप्रधान
प्रदेशामध्ये शांतता नांदावी आणि राज्याचा विकास व्हावा, यासाठी पंतप्रधान वचनबद्ध असून याचे उदाहरण म्हणजे, भारत सरकार आणि आसाम सरकारने कारबी अतिरेकी संघटनांबरोबर अलिकडेच सहा ‘मेमोरंडम ऑफ सेटलमेंट (एमओएस) केले. यामुळे या प्रदेशात शांततेच्या नवीन युगाला प्रारंभ झाला आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘शांतता, एकता आणि विकास’ मेळाव्यामध्ये पंतप्रधान मार्गदर्शनपर भाषण करणार असून त्यामुळे इथे राबविण्यात येत असलेल्या शांतता उपक्रमांना मोठी चालना मिळणार आहे.
या दौ-यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते दिफू येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय, पश्चिम कारबी आंगलाँग येथे पदवी महाविद्यालय आणि कोलोंगा पश्चिम कारबी आंगलाँग येथे कृषी महाविद्यालयाची पायाभरणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पांसाठी 500 कोटींपेक्षाही जास्त खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात कौशल्य आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते 2950 पेक्षा जास्त अमृत सरोवर प्रकल्पांचा शिलान्यासही करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 1150 कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे.
दिब्रुगडमध्ये पंतप्रधान
आसाम राज्य सरकार आणि टाटा न्यासाचा संयुक्त उपक्रम असलेल्या आसाम कर्करोग दक्षता प्रतिष्ठानच्यावतीने राज्यभरामध्ये 17 कर्करोग उपचार रूग्णालयासह दक्षिण अशियातल्या सर्वात मोठे आणि परवडणारे कर्करोग उपचार केंद्रांचे जाळे तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातल्या 10 रूग्णालयांपैकी सात रूग्णालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच तीन रूग्णालयांचे काम वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे. या प्रकल्पाच्या दुस-या टप्प्यात सात नवीन कर्करोग उपचार रूग्णालये बांधण्यात येणार आहेत.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेली सात कर्करोग उपचार रूग्णालये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहे. ही रूग्णालये दिब्रुगड, कोक्राझार, बारपेटा, दररांग, तेजपूर, लखिमपूर, आणि जोरहाट येथे उभारण्यात आली आहेत. प्रकल्पाच्या दुस-या टप्प्यात बांधण्यात येणा-या नवीन सात कर्करोग रूग्णालयांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात येणार आहे. ही रूग्णालये धुबरी, नलबारी, गोलपारा, नागाव, शिवसागर, तिनसुकिया आणि गोलाघाट येथे उभारण्यात येणार आहेत.