पंतप्रधान नरेंद्र मोदी इंदूर इथं येत्या 25 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता होणार असलेल्या 'मजदुरों का हित मजदुरों को समर्पित' या कार्यक्रमात दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. यावेळी ते इंदुरमधल्या हुकुमचंद गिरणी कामगारांच्या थकबाकीशी संबंधित सुमारे 224 कोटी रुपयांचा धनादेश अधिकृत अवसायक आणि कामगार संघटनेच्या प्रमुखांना सुपूर्द करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान हुकुमचंद गिरणी कामगारांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांचीही पूर्तता केली जाणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.
इंदूरमधील हुकुमचंद मिल 1992 मध्ये बंद झाली होती आणि त्यानंतर अवसायनात गेली. तेव्हापासून हुकुमचंद मिलचे कामगार आपली थकबाकी परत मिळवण्यासाठी प्रदीर्घ कायदेशीर लढा देत आले आहेत. अलीकडेच मध्य प्रदेश सरकारनं या प्रकरणासंदर्भात सकारात्मक पुढाकार घेत, देण्यांची रक्कम आणि मागण्यांसदर्भात सर्वमान्य होईल अशा तोडग्यावर यशस्वी वाटाघाटी केल्या होत्या. या तोडग्याला न्यायालयं, कामगार संघटना तसंच गिरणी कामगारांसह सर्व भागधारकांचीही मान्यता मिळाली. या तोडग्याअंतर्गत मध्य प्रदेश सरकारनं सर्व थकबाकी आगाऊ स्वरुपात अदा करणे, गिरणीची जमीन ताब्यात घेणे आणि या जमीनीचा निवासी आणि व्यावसायिक वापरासाठी विकास करणे अशा उपाययोजनांचा समावेश आहे.
यावेळी इंदूर महानगरपालिकेच्या वतीनं खरगोन जिल्ह्यातल्या सामराज आणि आशुखेडी या गावांमध्ये उभारल्या जाणाऱ्या 60 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचं भूमिपूजनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पांच्या उभारणीसाठी 308 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या नव्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीमुळे इंदूर महानगरपालिकेला वीज बिलांमध्ये दरमहा सुमारे चार कोटी रुपयांची बचत करणं शक्य होणार आहे. सौर प्रकल्पाच्या उभारणीसाठीचा निधी उभारण्याकरता इंदूर महानगरपालिकेनं 244 कोटी रुपयांचे हरीत रोखे जारी केले होते. अशा पद्धतीनं हरीत रोखे जारी करणारी ती देशातील पहिली नागरी स्वराज्य संस्थाही ठरली होती. इंदूर महानगरपालिकेच्या हरीत रोख्यांना देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, आणि 29 राज्यांमधल्या नागरिकांनी, रोखे जारी करतानाच्या मूळ मूल्याच्या तीप्पट म्हणजेच सुमारे 720 कोटी रुपयांची गुंतवणूकही केली.