पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 एप्रिल 2022 रोजी रात्री 9:15 वाजता नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर श्री गुरू तेग बहादूरजींच्या 400 व्या प्रकाश पर्व सोहळ्यात सहभागी होतील. ते या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करतील आणि गुरुंच्या स्मरणार्थ नाणे आणि टपाल तिकीटही जारी करतील.
दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने केंद्र सरकारने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या दोन दिवसीय (20 आणि 21 एप्रिल) कार्यक्रमात देशाच्या विविध भागातील रागी आणि मुले ‘शबद कीर्तन’मध्ये सहभागी होतील. गुरू तेग बहादूरजी यांच्या जीवनाचे चित्रण करणारा भव्य प्रकाश आणि ध्वनी सोहळा देखील यावेळी होणार आहे. याशिवाय शिखांची पारंपरिक युद्धकला (मार्शल आर्ट) 'गटका'चेही आयोजन केले आहे.
जगाच्या इतिहासातील धर्म आणि मानवी मूल्ये, आदर्श आणि तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे नववे शीख गुरू, गुरू तेग बहादूरजी यांच्या शिकवणुकीवर हा कार्यक्रम प्रकाश टाकणार आहे. काश्मिरी पंडितांच्या धार्मिक स्वातंत्र्याला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांना मुघल शासक औरंगजेबाच्या आदेशावरुन फाशी देण्यात आली. त्यांची पुण्यतिथी दरवर्षी 24 नोव्हेंबर रोजी शहीदी दिवस म्हणून साजरी केली जाते. दिल्लीतील गुरुद्वारा सिस गंज साहिब आणि गुरुद्वारा रकाब गंज हे त्यांच्या पवित्र बलिदानाशी संबंधित आहेत. त्यांचा वारसा राष्ट्रासाठी एक महान एकीकरण शक्ती आहे.