पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीत पुसा इथे भारतीय कृषी संशोधन संस्थेत सशक्त नारी - विकसित भारत कार्यक्रमात सहभागी होतील आणि नमो ड्रोन दिदी सादर करणार असलेल्या कृषी ड्रोन प्रात्यक्षिकांना उपस्थित राहतील. देशभरातल्या विविध 11 ठिकाणांहून देखील नमो ड्रोन दिदी एकाचवेळी या ड्रोन प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी होतील. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान 1,000 नमो ड्रोन दिदींना ड्रोनसुद्धा हस्तांतरित करणार आहेत.
नमो दिदी आणि लखपती दिदी उपक्रम महिलांचे, विशेषतः ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सबलीकरण आणि आर्थिक स्वायत्तता बळकट करण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाचा अविभाज्य भाग म्हणून गणले जात आहेत. हा दृष्टीकोन अधिक व्यापक करण्याच्या हेतूने दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मोहिमेच्या सहाय्याने यश संपादन केलेल्या आणि इतर स्वयं सहाय्यता गटांच्या उत्थानासाठी सहाय्य करणाऱ्या प्रोत्साहन देणाऱ्या लखपती दिदींचा सत्कार पंतप्रधान करणार आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात बँकांनी उभारलेल्या बँक संलग्न कॅम्पच्या माध्यमातून पंतप्रधान स्वयं सहाय्यता गटांना (SHGs) सुमारे 8,000 कोटी रुपये बँक कर्जांचे अनुदानित व्याज दराने वितरण करणार आहेत. पंतप्रधान स्वयं सहाय्यता गटांना 2,000 कोटी रुपये भांडवली सहाय्य निधीचेही वितरण करणार आहेत.