पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता लाल किल्ल्यावर पराक्रम दिन सोहळ्यात सहभागी होतील.
स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या योगदानाचा यथोचित सन्मान करण्यासाठी पावले उचलण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला अनुसरत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती वर्ष 2021 पासून पराक्रम दिन म्हणून साजरी करण्यास सुरुवात झाली. या वर्षी लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात आलेला हा एक बहुआयामी सोहळा असेल ज्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक प्रतिबिंब आणि आपली विविधतेने नटलेली सांस्कृतिक अभिव्यक्ती एकत्रित विणले जाईल. या उपक्रमांतून नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना यांच्या सखोल वारशाचे दर्शन घडेल. इथे भेट देणाऱ्या व्यक्तींना,नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना यांचा उल्लेखनीय प्रवास उलगडणारी दुर्मिळ छायाचित्रे आणि दस्तऐवजांचे प्रदर्शन अनुभवण्याची संधी मिळेल. 31 जानेवारीपर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान 23 ते 31 जानेवारी दरम्यान आयोजित भारत पर्व चा शुभारंभ देखील करतील. भारत पर्व च्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाचे चित्ररथ आणि सांस्कृतिक प्रदर्शनांसह देशातील समृद्ध विविधतेचे दर्शन घडवले जाईल. यामध्ये नागरिक केंद्रित उपक्रम, व्होकल फॉर लोकल, वैविध्यपूर्ण पर्यटन स्थळांबाबत माहिती, यासह इतर उपक्रमांच्या माध्यमातून 26 मंत्रालये आणि विभागांच्या प्रयत्नांचे दर्शन घडवले जाईल.लाल किल्ल्यासमोरील राम लीला मैदान आणि माधव दास पार्क इथे हा कार्यक्रम होणार आहे.