पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली इथे 7 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता होणाऱ्या राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे हा कार्यक्रम होणार आहे.
देशातील कला आणि कारागिरीची समृद्ध परंपरा जिवंत ठेवणाऱ्या कलाकार आणि कारागिरांना प्रोत्साहन आणि धोरणात्मक पाठबळ दिले जावे या विचाराचा पंतप्रधानांनी नेहमीच खंदेपणाने पुरस्कार केला आहे. हा विचार पुढे नेण्यासाठीच सरकारने राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे पहिला राष्ट्रीय दिन 7 ऑगस्ट, 2015 रोजी साजरा झाला. ही तारीख 7 ऑगस्ट, 1905 रोजी सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीचा शुभारंभ म्हणून निवडण्यात आली होती आणि देशी उद्योग आणि विशेषतः हातमाग विणकरांना त्यामुळे प्रोत्साहन मिळाले.
यावर्षी नववा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जात आहे. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान “भारतीय वस्त्र एवं शिल्प कोष” (कापड आणि हस्तकलांचे भांडार) या ई-पोर्टलचे उद्घाटनही करणार आहेत. हे पोर्टल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) ने विकसित केले आहे.
या कार्यक्रमाला 3000 हून अधिक हातमाग आणि खादी विणकर, कारागीर तसेच वस्त्रोद्योग आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई ) क्षेत्रातील संबंधित प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संपूर्ण भारतातील हातमाग समूह, एनआयएफटी संकुले, विणकर सेवा केंद्रे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हँडलूम टेक्नॉलॉजी कॅम्पस, नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, हॅन्डलूम एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल, खादी आणि ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी) आणि विविध राज्य हातमाग विभाग एका छताखाली येतील.