पंतप्रधान नरेंद्र मोदी, अहमदाबादमध्ये 14 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता होणाऱ्या प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत.
भारतातल्या आणि जगभरातल्या असंख्यलोकांवर प्रभाव पाडणारे परमपूज्य प्रमुख स्वामी महाराज हे एक मार्गदर्शक आणि गुरू होते. एक महान अध्यात्मिक नेता म्हणून त्यांनी मानसन्मान आणि कीर्ती प्राप्त केली आहे. त्यांचे जीवन अध्यात्म आणि मानवतेच्या सेवेसाठी समर्पित होते. बीएपीएस(बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था) स्वामीनारायण संस्थेचे नेते म्हणून, त्यांनी लाखो लोकांना दिलासा दिला आणि त्यांची काळजी घेऊन असंख्य सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रमांना प्रेरणा दिली.
प. पु. प्रमुख स्वामी महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जगभरातील लोक त्यांचे जीवन आणि कार्याचा उत्सव साजरा करत आहेत. वर्षभराच्या या जागतिक उत्सवाचा समारोप बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे जागतिक मुख्यालय असलेल्या शाहीबाग येथील बीएपीएस स्वामीनारायण मंदिराद्वारे आयोजित ‘प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सवा’मध्ये होईल. महिनाभर चालणारा हा महोत्सव 15 डिसेंबर 2022 ते 15 जानेवारी 2023 दरम्यान अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात दैनंदिन कार्यक्रम, संकल्पनेवर आधारित प्रदर्शने आणि विचारांना चालना देणारी आयोजन स्थळे (मंडप) असतील.
बीएपीएस स्वामीनारायण संस्थेची स्थापना शास्त्रीजी महाराजांनी 1907 मध्ये केली. वेदांच्या शिकवणींवर आणि व्यावहारिक अध्यात्माच्या आधारस्तंभांवर आधारित असलेली बीएपीएस, आजच्या आध्यात्मिक, नैतिक आणि सामाजिक आव्हानांचे निराकरण करण्यासाठी दूरदूरपर्यंत आपली सेवा देते. विश्वास, एकता आणि निःस्वार्थी सेवा या मूल्यांचे जतन करणे, हे बीएपीएसचे उद्दिष्ट असून, ही संस्था समाजाच्या सर्व स्तरांमधील लोकांच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, शारीरिक आणि भावनिक गरजा पूर्ण करते आणि जागतिक स्तरावरील उपक्रमांद्वारे, मानवतावादी कार्य करते.