पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 16 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे स्वर्णिम विजय मशालीच्या अभिवादन आणि स्वागत समारंभात सहभागी होतील.
1971 च्या युद्धातील भारताच्या विजयाच्या आणि बांगलादेशच्या निर्मितीच्या 50 वर्षांच्या स्मरणार्थ स्वर्णिम विजय वर्ष सोहळ्याचा एक भाग म्हणून, गेल्या वर्षी 16 डिसेंबर रोजी पंतप्रधानांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे अखंड तेवणाऱ्या ज्योतीतून स्वर्णिम विजय मशाल प्रज्वलित केली. त्यांनी चार मशाली प्रज्वलित केल्या ज्या वेगवेगळ्या दिशेने मार्गक्रमण करणार होत्या. तेव्हापासून, या चार मशालींनी सियाचीन, कन्याकुमारी, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, लोंगेवाला, कच्छचे रण, आगरतळा इत्यादींसह देशभर प्रवास केला. या मशाली मुख्य युद्धक्षेत्रात आणि 1971 च्या युद्धातील शौर्य पुरस्कार विजेते आणि दिग्गजांच्या घरांमध्येही नेण्यात आल्या.
16 डिसेंबर 2021 रोजी, अभिवादन समारंभादरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते या चार मशाली राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे अखंड तेवणाऱ्या ज्योतीमध्ये विलीन केल्या जातील.