पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 मार्च 2024 रोजी दुपारी 4 वाजता वंचित घटकांना कर्ज सहाय्य देण्याच्या उद्देशाने आयोजित देशव्यापी संपर्क कार्यक्रमात दूरदृश्य प्रणाली द्वारे सहभागी होतील. पंतप्रधान पीएम-सूरज, अर्थात राष्ट्रीय सामाजिक उत्थान आणि रोजगार आधारित जनकल्याण (PM-SURAJ) पोर्टलचा शुभारंभ करतील आणि देशातील वंचित गटातील एक लाख उद्योजकांना कर्ज सहाय्य मंजूर करतील. याशिवाय, अनुसूचित जाती, मागासवर्गीय आणि स्वच्छता सेवकांसह वंचित गटांतील विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान संवाद साधतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करतील.
वंचित घटकांना कर्ज सहाय्य देणारे पीएम-सूरज राष्ट्रीय पोर्टल, वंचितों को वरीयता, अर्थात वंचितांना प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेला मूर्त रूप देते. हा एक परिवर्तनकारी उपक्रम असून, समाजातील सर्वात उपेक्षित घटकांचे उत्थान करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. या पोर्टलच्या मदतीने बँका, NBFC-MFIs आणि इतर संस्थांच्या माध्यमातून देशभरातील पात्र व्यक्तींना कर्ज सहाय्य प्रदान केले जाईल. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान, नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम (NAMASTE) अंतर्गत सफाई मित्रांना (गटार आणि सेप्टिक टँक कामगार) आयुष्मान हेल्थ कार्ड्स आणि PPE किटचे वाटप करतील. हा उपक्रम आव्हानात्मक परिस्थितीत सेवा देणाऱ्या आघाडीच्या कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे. या कार्यक्रमात वंचित गटातील विविध सरकारी योजनांचे सुमारे 3 लाख लाभार्थी सहभागी होतील, जे देशभरातील 500 हून अधिक जिल्ह्यांमधून कार्यक्रमात सामील होतील.