पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 जून 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे ‘उद्यमी भारत’ कार्यक्रमात सहभागी होतील. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान 'रेझिंग अँड एक्सेलरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स' (RAMP) योजना, 'पहिल्यांदाच एमएसएमई निर्यातदारांची क्षमता वाढवणे' (CBFTE) योजना आणि 'पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम' (PMEGP) च्या नवीन वैशिष्ट्यांचा शुभारंभ करतील.
वर्ष 2022-23 साठीच्या पीएमईजीपी योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते आर्थिक मदत डिजिटली हस्तांतरित केली जाईल. MSME आयडिया हॅकेथॉन 2022 चे निकाल ते जाहीर करतील. त्याशिवाय, राष्ट्रीय एमएसएमई पुरस्कार, 2022 चे वितरण त्यांच्या हस्ते होईल. तसेच,त्यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत निधीमध्ये 75 एमएमएमई उद्योगांना डिजिटल समभाग प्रमाणपत्रे वितरित केली जातील.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करण्यासाठी सरकारच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे प्रतिबिंब ‘उद्यमी भारत’ मध्ये आपल्याला बघायला मिळते. एमएसएमई क्षेत्राला आवश्यक असा आधार वेळीच देण्यासाठी मुद्रा योजना, आपत्कालीन पतहमी योजना, पारंपारिक उद्योगांना पुनरुज्जीवित करण्यासाठीच्या निधीची योजना (SFURTI) असे अनेक उपक्रम सरकारने वेळोवेळी सुरू केले आहेत, ज्याचा देशभरातल्या कोट्यवधी लोकांना फायदा झाला आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते, सुमारे 6000 कोटी रुपयांच्या निधीची ‘रेझिंग अँड एक्सेलरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स’ (RAMP)-म्हणजेच एमएसएमई क्षेत्राच्या कामगिरीत सुधारणा आणि वाढ करण्याच्या योजनेचा शुभारंभ होईल. सध्या असलेल्या एमएसएमई योजनेचा प्रभाव वाढवण्यासोबतच, राज्यांमधील एमएसएमईची अंमलबजावणी क्षमता आणि व्याप्ती वाढवणे हे या नव्या योजनेचे उद्दिष्ट आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला स्पर्धात्मक आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी नवोन्मेष, विचारांना प्रोत्साहन, नवीन व्यवसाय आणि उद्योजकता विकसित करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल. त्याशिवाय,उद्योगातील पद्धती आणि प्रक्रिया सुधारून, बाजारपेठेतील प्रवेश वाढवून, तांत्रिक साधने विकसित करत, तसेच चौथ्या औद्योगिक क्रांतीचा वापर करुन, एमएसएमई उद्योग अधिक स्वयंपूर्ण बनवले जातील.याद्वारे आत्मनिर्भर भारत अभियानाला बळ मिळेल.
तसेच, पहिल्यांदाच MSME निर्यातदार झालेल्यांची क्षमता वाढवणे’ ह्या (CBFTE) योजनेचा शुभारंभ करतील, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रांना जागतिक बाजारपेठेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादने आणि सेवा देण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. यामुळे जागतिक मूल्यसाखळीत भारतीय लघु उद्योगांचा सहभाग वाढेल आणि त्यांना त्यांची निर्यात क्षमता ओळखण्यासही मदत होईल.
‘पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम’ (PMEGP) च्या काही नव्या वैशिष्ट्टयांचा शुभारंभही पंतप्रधान करतील. यात उत्पादन क्षेत्रासाठी जास्तीत जास्त प्रकल्प खर्च रु. 50 लाख (रु. 25 लाखांवरून) आणि सेवाक्षेत्रासाठी 20 लाख (रु. 10 लाखांवरुन) पर्यंत वाढवण्याचा समावेश आहे. तसेच, आकांक्षी जिल्ह्यांमधले अर्जदार आणि तृतीयपंथियांचा विशेष श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. त्यांना अधिक अनुदान दिले जाणार आहे. त्याशिवाय, आवेदक/उद्योजकांना बँकांशी, तंत्रज्ञ आणि विपणन क्षेत्राशी जोडून घेत, त्यांना मदतीचा हात दिला जाणार आहे.
याच कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान एमएसएमई आयडिया हॅकेथॉन, 2022 चे निकाल जाहीर करतील. 10 मार्च 2022 रोजी सुरू झालेल्या या हॅकेथॉनचा उद्देश व्यक्तींच्या सुप्त सर्जनशीलतेला चालना देणे आणि त्यासाठी मदत करणे, नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आणि एमएसएमईमध्ये नवोन्मेष आणणे हे आहे. निवडक इनक्युबेशन कल्पनांना,मंजूर प्रती कल्पना, 15 लाख रुपयांपर्यंत निधी सहाय्य दिला जाईल.
त्याशिवाय, पंतप्रधानांच्या हस्ते, राष्ट्रीय एमएसएमई पुरस्कार 2022 चे वितरणही होईल. एमएसएमई उद्योग, राज्ये/केंद्रशासित प्रदेश, आकांक्षी जिल्हे आणि बँकांनी भारताच्या एमएसएमई क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानासाठी आणि विशेष उल्लेखनीय कार्यासाठी हे पुरस्कार दिले जाणार आहेत.