पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 मे रोजी दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे ओदिशातील 8000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील.
या कार्यक्रमादरम्यान, पुरी आणि हावडा दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. ही रेल्वे ओदिशातील खोरधा, कटक, जाजपूर, भद्रक, बालासोर जिल्ह्यांमधून तर पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर, पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातून जाईल. ही रेल्वे प्रवाशांना जलद, आरामदायी आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव देईल तसेच पर्यटनाला आणि या भागातील आर्थिक विकासाला चालना देईल.
पंतप्रधान यावेळी पुरी आणि कटक रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी देखील करतील. पुनर्विकसित स्थानकांमध्ये रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव देणाऱ्या सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध असतील.
पंतप्रधान ओदिशातील रेल्वे मार्गाचे 100% विद्युतीकरण प्रकल्प देखील समर्पित करतील. यामुळे कार्यान्वयन आणि देखभाल खर्च कमी होईल , तसेच आयात करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी होईल.
पंतप्रधान संबलपूर-तितलागड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे लोकार्पण तसेच अंगुल - सुकिंदा दरम्यान नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग; मनोहरपूर - रौरकेला - झारसुगुडा - जामगा यांना जोडणारी तिसरी लाईन तसेच बिच्छुपली - झरतारभा दरम्यान नवीन ब्रॉडगेज लाईन यांचेही लोकार्पण करतील.ओदिशातील पोलाद, उर्जा आणि खाण क्षेत्रातील जलद औद्योगिक विकासाचा परिणाम म्हणून वाढलेल्या रहदारीला यामुळे दिलासा मिळेल तसेच या रेल्वे विभागामधील प्रवासी वाहतुकीवरील ताण कमी करण्यासही मदत करतील.