पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 2 जानेवारी 2022 रोजी मेरठला भेट देणार असून दुपारी 1 वाजता तेथील मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी करणार आहेत. मेरठमधील सरधना भागातील सलावा आणि कैली या गावांत सुमारे 700 कोटी रुपये खर्चून हे विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे.
क्रीडा संस्कृती रुजवणे आणि देशाच्या सर्व भागांमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत क्रीडा सुविधांची उभारणी करणे हे पंतप्रधानांच्या लक्ष्य केंद्रीत करण्याच्या महत्त्वपूर्ण उद्दिष्टांपैकी एक आहे. मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची स्थापना ही ते उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.
हे क्रीडा विद्यापीठ सिंथेटिक हॉकी मैदान, फुटबॉल मैदान, बास्केटबॉल/व्हॉलीबॉल/हँडबॉल/कबड्डी मैदान, लॉन टेनिस कोर्ट, जिम्नॅशियम हॉल, सिंथेटिक रनिंग स्टेडियम, जलतरण तलाव, बहुउद्देशीय हॉल आणि एक सायकलिंग वेलोड्रोम यासह आधुनिक आणि उत्तम पायाभूत क्रीडा सुविधांनी सुसज्ज असेल.तसेच विद्यापीठात नेमबाजी, स्क्वॉश,जिम्नॅस्टिक्स , वेटलिफ्टिंग, तिरंदाजी, कॅनोईंग आणि कयाकिंग अशा इतर सुविधाही उपलब्ध असतील. विद्यापीठात 540 महिला आणि 540 पुरुष खेळाडूंसह 1080 खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची क्षमता असेल.