पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 फेब्रुवारी 2021 ला दुपारी बारा वाजता दूरस्थ पद्धतीने ‘महाबाहू- ब्रह्मपुत्रा’ या प्रकल्पाचा आरंभ, धुब्री फुलबरी पुलाची पायाभरणी आणि आसाममधल्या माजुली पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन करतील. रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे केंद्रीय मंत्री, बंदरे नौवाहन आणि जलमार्ग खात्याचे राज्यमंत्री(स्वतंत्र कार्यभार) तसेच आसामचे मुख्यमंत्री या कार्यक्रमांना उपस्थित राहतील.
महाबाहू ब्रह्मपुत्रा
महाबाहू ब्रह्मपुत्रा उद्घाटनाचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी नियामती-मांजुली बेटे, उत्तर गुवाहाटी आणि दक्षिण गुवाहाटी तसेच धुब्री- हाटसिंगिमरी यामधील RO-Pax बोट वाहतूकीचे उद्घाटन, जोगीघोपा येथील आंतर्देशीय बोट वाहतुक स्थानकाचा शिलान्यास आणि ब्रम्हपुत्रेवरील विविध प्रवासी जेट्टी याशिवाय व्यवसाय सुलभतेच्या डिजिटल सुविधेचा आरंभ या कार्यक्रमांनी होईल.
रो-पॅक बोट सेवेमुळे वेगवेगळ्या किनाऱ्यांदरम्यानच्या प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होईल. नियामची व माजुली यामधील अंतर या सेवेमुळे 240 किलोमीटरवरून बारा किलोमीटरवर येईल. यासाठी राणी गैडीनलिऊ आणि सचिन देव बर्मन या दोन स्वदेशी रो-पॅक बोटी या सेवेसाठी कार्यरत असतील. उत्तर आणि दक्षिण गुवाहाटी मधील अंतर एम व्ही जे एस आर जेकब या रो-पॅक बोटी मुळे चाळीस किलोमीटरवरून तीन किलोमीटरवर येईल तर या सेवेमुळे धुब्री आणि हाटसिंगिमरी मधील प्रवासाचे अंतर 220 किलोमीटर वरून 28 किलोमीटर वर येईल. त्यामुळे प्रवासाचे अंतर व वेळही वाचेल.
या कार्यक्रमात नियामती, बिस्वनाथ घाट, पंडू आणि जोगीघोपा या चार प्रवासी बंदरांच्या बांधकामाचा शिलान्यास सुद्धा होईल. पर्यटन मंत्रालयाने दिलेल्या 9.41 कोटींच्या आर्थिक मदतीने ही प्रवासी बंदरे बांधली जाणार आहेत. या प्रवासी बंदरांमुळे रिव्हर क्रूझ टुरिझमला चालना मिळून स्थानिक रोजगार वाढतील तसेच स्थानिक व्यवसायांची भरभराट होईल.
स्थायी स्वरूपाचे अंतर्देशीय जल वाहतूक स्थानक जोगिघोपा येथे बांधले जाणार आहे. हे स्थानक जोगिघोपा येथील प्रस्तावित मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्कला जोडले जाणार आहे. या स्थानकामुळे कोलकाता आणि हल्दियाच्या दिशेने जाणारी सिलीगुडी कॉरिडॉर दरम्यानची वाहतूक रोडावेल. तसेच ईशान्येकडील मेघालय आणि त्रिपुरा सारख्या राज्यांकडे व तसेच भूतान आणि बांगलादेशकडे जाणारी मालवाहतूक पुराच्या मौसमातदेखील सुरळीत सुरू राहील.
व्यवसाय सुलभतेसाठी तयार केलेल्या दोन पोर्टलचे उद्घाटनसुद्धा यावेळी पंतप्रधान करतील. यापैकी Car-D (Cargo Data) म्हणजेच कार्गो डेटा हे पोर्टल कार्गो आणि क्रूज डेटा रियल टाइमवर गोळा करेल. PANI(portal for asset and navigation information) हे पोर्टल नदीतील वाहतूक आणि मूलभूत सुविधांविषयी संपूर्ण माहिती पुरवेल.
धुब्री फुलबरी पूल
पंतप्रधान ब्रह्मपुत्रेवरील धुब्री आणि फुलबरी यामधील चौपदरी पुलाची पायाभरणी करतील. राष्ट्रीय महामार्ग NH 127B वर हा पूल उभा राहणार असून, तो श्रीरामपूरपासून सुरू होऊन मेघालयातील नॉंग्स्टोईनपर्यंत जाणार आहे. आसाम मधल्या धुब्रीला फुलबरी, ट्युरा, रोंग्रम आणि मेघालयातील रोईंगेन यांना हा पूल जोडेल.
नदीच्या दोन्ही तीरादरम्यानच्या प्रवासासाठी संपूर्णपणे फेरी सेवेवर अवलंबून असलेल्या आसाम आणि मेघालयातील लोकांच्या बरेच वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागणीनुसार हा पुल सुमारे 4997 कोटी रुपये खर्चून बांधला जाणार आहे. यामुळे 205 किलोमीटरचे अंतर 19 किलोमीटरपर्यंत कमी होईल.
माजुली पुल
माजुली पूल ह्या ब्रह्मपुत्रेवरील माजुली आणि जोरहाट दरम्यानच्या दोन पदरी पुलाचे ही पंतप्रधान भूमिपूजन करतील. हा पूल निमती घाट आणि कमला बारी यांना जोडणारा असेल. आसामच्या मुख्य भूमीवर जाण्यासाठी पिढ्यांन् पिढ्या संपूर्णपणे फेरी बोटीवर अवलंबून असलेल्या माजुली येथील लोकांच्या बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या मागणीनुसार हा पूल बांधला जाणार आहे