पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘‘कोविड 19 शी लढण्याचे फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. 26 राज्यांमधील 111 प्रशिक्षण केंद्रांमध्ये या कार्यक्रमाची सुरूवात होईल. त्यानंतर पंतप्रधान संबोधित करतील. यावेळी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे उद्दिष्ट देशभरातील एक लाखाहून अधिक कोविड योद्धांचे कौशल्य वृद्धिंगत करणे हे आहे. कोविड योद्ध्यांना घरगुती सेवा (होम केअर सपोर्ट), मूलभूत सेवा (बेसिक केअर सपोर्ट), प्रगत सेवा (ऍडवान्सड केअर सपोर्ट) ,आपत्कालीन सेवा( इमर्जन्सी केअर सपोर्ट) , नमुना संकलन (सॅम्पल कलेक्शन सपोर्ट )आणि वैद्यकीय उपकरणे (मेडिकल इक्विपमेंट सपोर्ट ) या सहा रोजगार संबंधी क्षेत्रात प्रशिक्षण देण्यात येईल.
प्रधानमंत्री कौशल विकास योजना 3.0. च्या केंद्रीय घटकाअंतर्गत विशेष कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून या योजनेसाठी एकूण . 276 कोटी रुपये खर्च येणार आहे. या कार्यक्रमाद्वारे आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळाच्या विद्यमान आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी कुशल बिगर वैद्यकीय आरोग्यसेवा कर्मचारी तयार होतील.