पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.15 च्या सुमारास साहिबाबाद RapidX स्थानक येथे दिल्ली-गाझियाबाद-मेरठ आर आर टी एस कॉरिडॉर या प्राधान्य क्षेत्राचे उद्घाटन करणार आहेत. याशिवाय ते साहिबाबाद ते दुहाई डेपोला जोडणाऱ्या RapidX ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून देशातील प्रादेशिक जलद वाहतूक प्रणालीचे उदघाटन देखील करणार आहेत. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ते साहिबाबाद येथे प्रादेशिक जलद वाहतूक प्रणालीच्या उद्घाटनानिमित्त आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. तसेच ते बेंगळुरू मेट्रोच्या पूर्व पश्चिम कॉरिडॉरचे दोन भाग राष्ट्राला समर्पित करतील.
दिल्ली-गाझियाबाद-मेरठ आर आर टी एस कॉरिडॉरचे उद्घाटन
दिल्ली-गाझियाबाद-मेरठ आर आर टी एस हा 17 किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर, साहिबादला ते ‘दुहाई डेपो’ ला गाझियाबाद, गुलधर आणि दुहाई या स्थानकांसह जोडेल. दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडॉरची पायाभरणी 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली होती.
जागतिक दर्जाच्या नवीन वाहतूक पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे देशातील प्रादेशिक दळणवळण व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेशी अनुरूप प्रादेशिक जलद वाहतूक प्रणाली (आरआरटीएस) प्रकल्प विकसित केला जात आहे. आरआरटीएस ही एक नवीन रेल्वे-आधारित, अर्ध-जलद -वेग, उच्च-वारंवारिता असलेली प्रवासी वाहतूक प्रणाली आहे. ताशी 180 किलोमीटरच्या गतीसह, आरआरटीएस हा एक परिवर्तनात्मक, प्रादेशिक विकास उपक्रम आहे, ज्याची रचना दर 15 मिनिटांनी इंटरसिटी प्रवासासाठी अतिजलद रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केली आहे, जी आवश्यकतेनुसार दर 5 मिनिटांच्या वारंवारतेपर्यंत जाऊ शकते.
एनसीआर मध्ये एकूण आठ आरआरटीएस कॉरिडॉर विकसित केले जाणार आहेत, त्यापैकी दिल्ली – गाझियाबाद – मेरठ कॉरिडॉर, दिल्ली– गुरुग्राम – एसएनबी – अल्वर कॉरिडॉर; आणि दिल्ली-पानिपत कॉरिडॉरसह तीन कॉरिडॉर पहिल्या टप्प्यात कार्यान्वित करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. दिल्ली-गाझियाबाद-मेरठ आरआरटीएस 30,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित केला जात आहे आणि गाझियाबाद, मुरादनगर आणि मोदीनगर या शहरी भागातून जात एका तासापेक्षा कमी वेळेत दिल्लीला मेरठशी जोडेल.
देशात विकसित होत असलेली आरआरटीएस ही एक अत्याधुनिक प्रादेशिक मोबिलिटी सुविधा आहे आणि तिची तुलना जगातील सर्वोत्कृष्ट सुविधेशी करता येऊ शकते. ही देशातील सुरक्षित, विश्वासार्ह आणि आधुनिक इंटरसिटी प्रवास सुविधा प्रदान करेल. पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याच्या अनुषंगाने, आरआरटीएस नेटवर्कमध्ये रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके, बस सेवा यांसह व्यापक मल्टी-मोडल-एकत्रीकरण असेल. या परिवर्तनात्मक प्रादेशिक गतिशीलता सुविधेमुळे प्रदेशात आर्थिक घडामोडीना चालना मिळेल; रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सेवा संधी अधिक सुलभपणे उपलब्ध होतील; आणि वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी करण्यात मदत होईल.
बंगळुरू मेट्रो
पंतप्रधानांकडून औपचारिकपणे राष्ट्राला समर्पित केले जाणारे दोन मेट्रो मार्ग बैयप्पनहल्लीला कृष्णराजपुराशी आणि केंगेरीला चल्लाघट्टाशी जोडतील. या कॉरिडॉरवर जनतेची प्रवासाची सोय व्हावी यासाठी, औपचारिक उद्घाटनाची वाट न पाहता हे दोन मेट्रो मार्ग 9 ऑक्टोबर 2023 पासून सार्वजनिक सेवेसाठी खुले करण्यात आले आहेत.