पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 डिसेंबर 2023 रोजी रात्री 9:30 वाजता स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2023 च्या महाअंतिम फेरीच्या स्पर्धकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी पंतप्रधान स्पर्धकांना मार्गदर्शन करतील.
युवकांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हा सरकारची मंत्रालये आणि विभाग, उद्योग आणि इतर संस्थांच्या महत्त्वाच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा देशव्यापी उपक्रम आहे. 2017 मध्ये सुरू झालेले स्मार्ट इंडिया हॅकेथॉन युवा नवोन्मेषकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मागील पाच आवृत्त्यांमध्ये, विविध क्षेत्रांमध्ये अनेक अभिनव संशोधनपर उपाय पुढे आले आहेत आणि प्रस्थापित स्टार्टअप्स म्हणून मान्यता पावले आहेत.
यावर्षी, स्मार्ट हॅकेथॉनची अंतिम फेरी 19 ते 23 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. स्मार्ट हॅकेथॉन 2023 मध्ये, 44,000 संघांकडून 50,000 हून अधिक कल्पना प्राप्त झाल्या आहेत , ज्या पहिल्या स्मार्ट हॅकेथॉनच्या तुलनेत जवळपास सात पटीने अधिक आहेत. 12,000 हून अधिक स्पर्धक आणि 2500 हून अधिक मार्गदर्शक देशभरातील 48 नोडल केंद्रांवर आयोजित करण्यात येणाऱ्या महाअंतिम फेरीत भाग घेतील. अंतराळ तंत्रज्ञान , स्मार्ट शिक्षण , आपत्ती व्यवस्थापन , रोबोटिक्स आणि ड्रोन, वारसा आणि संस्कृती यांसह विविध संकल्पनांवर उपाय शोधून देण्यासाठी या वर्षी एकूण 1282 संघांची निवड करण्यात आली आहे.
सहभागी संघ 25 केंद्रीय मंत्रालये आणि राज्य सरकारांच्या 51 विभागांद्वारे नोंदवण्यात आलेल्या 231 समस्यांवर (176 सॉफ्टवेअर आणि 55 हार्डवेअर) उपाय शोधून देतील. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2023 ची एकूण बक्षीस रक्कम 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे आणि प्रत्येक विजेत्या संघाला प्रत्येक प्रश्नासाठी 1 लाख रुपये रोख बक्षीस दिले जाईल.