पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा- 2022 मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय पथकाशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधतील. या संवादाला सर्व खेळाडू तसेच त्यांचे प्रशिक्षक उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधानांचा हा संवाद म्हणजे प्रमुख क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याआधी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठीच्या सततच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. गेल्या वर्षी, पंतप्रधानांनी टोकियो 2020 ऑलिम्पिकसाठी सज्ज असलेल्या भारतीय खेळाडूंच्या पथकाशी तसेच टोकियो 2020 पॅरालिम्पिक खेळांसाठी भारतीय पॅरा-एथलीट्सच्या पथकाशी संवाद साधला होता.
या क्रीडा स्पर्धा सुरू असतांना देखील पंतप्रधान खेळाडूंची प्रगती जाणून घेतात. अनेकदा त्यांनी वैयक्तिकरित्या खेळाडूंना त्यांच्या यशाबद्दल आणि प्रामाणिक प्रयत्नांबद्दल अभिनंदन करण्यासाठी स्वतःहून दूरध्वनीद्वारे संवाद साधला आणि त्यांना अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित केले. शिवाय खेळाडूंचे पथक देशात परतल्यानंतर पंतप्रधान त्यांची भेट घेतात आणि संवाद साधतात.
राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा 2022 बर्मिंगहॅम येथे 28 जुलै ते 08 ऑगस्ट 2022 यादरम्यान होणार आहे. एकूण 215 क्रीडापटू, 19 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांच्या 141 स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील.